दादा..! भाग-१३

*दादा..!*

*भाग -१३*

  *"हिकडून दोनदा, अन तिकडून दोनदा दातावरुन बोटं फिरवली की बास करीत जावा... उगं कवरबी दाबाडात बोटं घालून बसत जाऊ नाही"!*

आबांनी षटकार मारला, तसं मी हातावरची राख झटकली. तांब्यात पाणी घेतलं, दोन-तीनदा चूळ भरली, जिभेवर, दातांवर बोटं आणि तोंडावर हात फिरवला. म्हातारी बाई वाटीत चहा ओतून वाटच बघत होती. चहासोबत तीन बटरं खाल्ली. काकूनं बादलीत पाणी काढून ठेवलं होतं. मी हात घालून बघितलं. गरम वाटलं म्हणून दोन मग गार पाणी घालून बादली उचलली.

*"थांब जरा, आज मी अंघोळ घालते, हात, पाय बघ, कसले झालेत? दगडानं घासते जरा."*

काकूचा 'तयारी' बघून मी बादली खाली टेकवली.

  आज चौथी बोर्डाच्या परीक्षेला जायचं होतं. परीक्षा काळेगाव केंद्रावर होती. मी रात्रीच पेटी भरून ठेवली होती. चादर, सतरंजी, टॉवेल, एक ड्रेस, पुस्तकं, नवनीतचं गाईड, आरसा, कंगवा सगळं भरुन ठेवलं होतं. *चौथी बोर्डाची परीक्षा असल्यामुळं धाकधूक होती, पण चार दिवस बाहेरगावला राहायचं, याची उत्सुकताही होती.*

काकूंनं चोळून मोळून अंघोळ घातली. चपचप खोबऱ्याचं तेल लावलं, भांग पाडला. *रोज लहान पोरांच्या डोक्याला गोडं तेलच असायचं, केसं चिकट व्हायची. आज खोबऱ्याचं तेल लावल्यानं मोकळी मोकळी वाटत होती !*

  दादांनी भट्टी पेटवली होती, आबा आम्हाला सोडायला येणार होते. माझं उरकलं होतं. भीमा सावंत आणि रामू कोळ्याकडं जाऊन आलो. त्यांनाही लवकर उरकायचं सांगितलं, त्यांच्याकडं बैलगाडी नसल्यानं ती दोघं आमच्याच गाडीत येणार होती.

आमच्या सोबत आमचे चौथीचे गोरख गिरी गुरुजी येणार होते. ते गावातलेच असल्यामुळं सगळे त्यांना गोरख गुरुजी म्हणायचे.. आम्हीही !
*सांगितलेला अभ्यास केला नाही, खोड्या केल्या किंवा त्यांच्या मनाविरुद्ध काही घडलं की गोरख गुरुजी हातानं किंवा छडीनं मारीत नसत. कान पिरगाळायचे, एखाद्यानं कान हाती लागू दिला नाही, तर बेंबीजवळ असा काही चिमटा काढत.. पोरं वाकून जात, कानातून मुंग्या निघत.*

  आईनं चपात्या केल्या, दाळ मिरचू केलं, ते एका डब्यात भरलं. दुपारी आणि रात्रीच्याला पुरतील इतक्या चपात्या, तेलचटणी, आंब्याचं लोणचं घालून सगळं धोतराचा फडक्यात बांधलं. मी पेटी उघडून बघितली, जेवणाचं गठुडं ठेवायला जागा दिसेना, कसंतरी चोपून बसवलं आणि पेटीला कुलूप घातलं...

*क्रमशः..*

               *श्री राजेंद्र गिते, बार्शी.*