दादा..! भाग-१८

*दादा..!*

*भाग -१८*

   अक्कल काय खात असंल? दादांच्या प्रश्नानं आम्ही सगळे बुचकळ्यात पडलो.

मग दादाच म्हणाले, *"अक्कल दम खाते !"*

"म्हणजे???" सगळ्यांनी एकदम विचारलं.

"घर बांधायचं आहे, शेतात पाणी करायचं आहे, तुम्हाला शिकवायचं आहे... सगळी कामं खर्चाचीच ! हळूहळू करावी लागतील, एकदम करता येतील का?" दादा.

"नाही...", आम्ही.

*"तुमचं शिक्षण सगळ्यात महत्त्वाचं आहे, गावात सातवी झाली की तुम्हाला शिकायला दुसरीकडं पाठवावं लागेल, खर्च वाढेल. शेतीच्या उत्पन्नाचा काही भरवसा नाही, दुधाच्या, भट्टीच्या पैशावर काय काय करायचं?"*

आम्ही गप्प....

"यंदा पावसापाण्यानं साथ दिली आणि उत्पन्न चांगलं निघालं तर विचार करू आणि दिवाळी झाली की धरू विहीर. *पण घाई कामाची नाही, 'दम' धरुन काम करावं लागेल !"*

आम्ही माना डोलावल्या...

*लोक म्हणतात, "ज्याला अक्कल आहे, तो योग्य वेळ येईपर्यंत दम खातो. मग मला सांगा, "अक्कल काय खाते?*

*"दम..."*

  दादा कमालीचे संयमी होते, तितकेच सहनशील होते. खूप दमाचे होते.. धीराचे होते. काम सुरु करताना दादा वेळ लावत, परिणामांचा विचार करत. आबांशी चर्चा करत, आणि मगच निर्णय घेत.

दादा कारभारी होते.
*उत्पन्न आणि खर्चाचा मेळ घालता घालता कारभाऱ्याची किती ओढाताण होते, दमछाक होते. तो सगळ्यांना समजून घेतो, पण त्याला?*

*क्रमशः..*

               *श्री राजेंद्र गिते, बार्शी.*