दादा..! भाग- ३४

*दादा..!*

*भाग - ३४*

  पावसाळा तोंडावर आला होता. तीन परुस विहीर लाकडानं बांधून झाली होती. अजून दोन परुस बांधायची होती, पण लाकडं संपल्यानं दादांनी काम थांबवलं होतं.

  साडेचार परसाच्या आसपास काळ्या मातीतच थोडं पाणी लागलं. त्यामुळं गाळ उपसणं खूप जड गेलं. *तळाच्या गड्यानं पातळ गाळाची भरुन दिलेली पाटी वर येईपर्यंत अर्धीही राहत नसे. सगळे गडी गाळानं लिडबीड होत.* खाली मांजऱ्या खडक लागला. त्या खडकाच्या पाटीवर चांगलं पाणी लागलं. *पहारीनं मांजऱ्या खडक फोडताना गडी घामानं उभं न्हात. दात ओठ खावून मारलेली पहार खन्न आवाज करत टनकन वर उडे. कातळ फोडणाऱ्या गड्यांच्या डोळ्यांपुढं भरदिवसा काजवं चमकत. कसाबसा अर्धा परुस खडक फोडला. खाली तांबूस रंगाचा, जरासा ठिसूळ खडक लागला. त्या खडकातले झुळझुळ झरे बघून आमचे सगळ्यांचे डोळे सुखावले. रात्रीत परुस दीड परुस पाणी येई, मात्र मातीच्या पोटाला पाणी लागलं की काळ्या मातीची मोठी मोठी ढेकळं पाण्यात उड्या घेत.* रोज सकाळी इंजिनानं पाणी उपसावं लागे...

*उन्हातान्हाची तमा न करता टिकावानं धरणीचं पोट फोडताना गड्यांच्या घशाला कोरड पडली, तोल सांभाळत.. ठेप्यावर उभं राहून मातीच्या पाट्या झेलल्यानं बायकांच्या हाताला घटं पडले, पण मनासारखं पाणी लागल्यानं सगळ्यांचा शीण कुठच्या कुठं पळून गेला. कष्टाचं चीज झालं, घामाचे मोती झाले. दादा आबांच्या डोळ्यांत आनंदानं पाणी आले !*

त्या आनंदातच आमच्या विहिरीचं 'पाणी पूजन' पार पडलं. त्याच पाण्यानं पाणदेवांना अंघोळ घातली. साती आसरा शांत केल्या. कामगार, बाळगोपाळ गोडधोड खाऊन तृप्त झाले...

  *सहसा घर न सोडणारी म्हातारी बाईही त्या दिवशी विहिरीवर आली.* आजीला आम्ही सगळे 'बाई' म्हणायचो. आम्हा सगळ्या नातवंडांवर तिचं जीवापाड प्रेम होतं. *माणसं मुलांपेक्षा नातवंडावर जास्त प्रेम करतात, असं माझं निरीक्षण आहे !*
गुडघे दुखत असल्यानं बाई घरी बसून बसून फक्त जेवणं वाढण्याचं काम करायची. आमच्या ताटात भाकरी, भाजी असली तरी भाकरी मोडून पुढं धरायची.
*कधी कधी मी वैतागाणं म्हणे, "बाई, ही बघ की, भाकरी हाय अजून."*

*"लावून लावून काय खातो, चुरुन खा की, चुरुन खाल्लं तर जास्त अंगी लागतं." बाई सल्ला द्यायची.*

   जेवताना बाजारातून आणलेला खाऊ बाई सगळ्यांना थोडा थोडा दयायची, जे जेवायला नाहीत त्यांच्यासाठी बाजूला काढून, गाडग्यात घालून ठेवायची.

 बाईजवळ एक पिशवी होती, ती पिशवी नेहमी तिच्या कमरेला खोचलेली असायची. त्या पिशवीला चार कप्पे होते. घराच्या चाव्या, २५, ५० पैशांची नाणी, चार चार घड्या करुन ठेवलेल्या पाच-दहा रुपयांच्या नोटा, एखाद- दुसरा बिब्बा, सुईदोरा, तपकिरीची डब्बी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेटीची चावी. इतकं सगळं सामान त्या पिशवीत असायचं.

    घरात एक मोठी पेटी होती. त्या पेटीला एक जाडजूड कुलूप लावलेलं असायचं. पिशवीत पेटीची चावी असल्यानं बाई पिशवीला हात लावू देत नसे.

बाईच्या जवळ बसून मी विचारायचो,
*"बाई, पेटीत काय आहे ते सांगकी?"*

बाई म्हणायची, *"काही नाही राजा, माझं किडूक मिडूक अन शे-पाचशे रुपये असतील."*

*क्रमशः..*

               *श्री राजेंद्र गिते, बार्शी.*

 

              






Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य