दादा..! भाग- ४२

*दादा..!*

*भाग - ४२*

बीडला गावातून गाडी नव्हती, शिरूरपर्यंत पाच किलोमीटर चालत नाहीतर बैलगाडीनं जावं लागायचं. तिथून सकाळी साडेसात आणि दुपारी अडीच वाजता गाडी असायची. रविवारी अडीचच्या गाडीनं आमचं बीडला जायचं ठरलं. दादा आम्हाला सोडवायला येणार होते.

   सकाळी लवकर उठून आवरायचं होतं, म्हणून मी शनिवारी थोडं लवकरच झोपलो. कशीबशी एक झोप झाली, अचानक जाग आली. पुन्हा काही झोप लागेना. *नांदूर पेक्षा मोठं गाव कधी बघितलं नव्हतं. आता 'बीडला शिकायला जायचंय', याचा आनंद पोटात मावत नव्हता, पण डोक्यातले विचारही थांबत नव्हते...*

*कसं असेल बीड?*
*मनात कुतूहल होतं, बीड बघण्याची उत्सुकता होती. पण कधी कधी वाटायचं, साध्या पिंपरीच्या यात्रेत आपल्याला खालतं-वरतं कळत नाही.. एवढ्या मोठ्या बिडात आपण चुकायचो तर नाही. आपला अवतार बघून शहरातली पोरं खेड्यातलं येडं म्हणून चिडवायची तर नाहीत?*
जाताना गणवेश घालावा की साधे कपडे? हा प्रश्नही काही केल्या सुटत नव्हता. नाहोलीला आठवीत असताना पांढरा शर्ट आणि खाकी पॅन्ट असा गणवेश होता. बुधवारी गणवेशाला सुट्टी असायची, त्या दिवशी वर्गातली काही मुलं फुल पॅन्ट, शर्ट घालून रुबाबात शाळेत यायची. माझा गणवेश आणि साधे कपडेही हापच होते. *हाफ कपडे घालायची लाज वाटायची, पण 'लाज वाटतीय' हे सांगायचीही लाज वाटायची. फूल पॅन्ट घ्या.. फूल पॅन्ट घ्या, म्हणून दोन तीन आठवडे दादांच्या मागं लागलो, तेव्हा त्यांनी नांदूरच्या बाजारातून कृष्णाला आणि मला पँटीचं कापड आणलं. ते ताडपत्री सारखं कडक होतं. सत्तार भई आमचे टेलर होते. त्यावेळी दिवार खूप गाजला होता. बेल बॉटमची चलती होती. अमिताभच्या पॅन्टसारखी पॅन्ट शिवली. ती पॅन्ट घालून चालताना 'खड खड' असा आवाज यायचा. हाफ कपड्यांची लाज वाटायची आणि फूल पॅन्ट चालताना वाजायची ! काय करावं?*

पहाटंच उठून बसलो, तेव्हा विचारचक्र थांबलं.

  काकूनं दगडानं हातपाय घासून अंघोळ घातली. आईनं गव्हाच्या पिठाचा मोठा उंडा तिंबला होता, आणि ती चपात्या करीत होती.
चौथीच्या आणि सातवीच्या परीक्षेला जाताना जी पेटी माझ्या सोबत होती, तीच पेटी मी भरायला घेतली. चादर, सतरंजी, कपडे ठेवले. ( 'ती' पेटी माझ्याजवळ अजूनही आहे.) तेवढ्यात *बाई एक गोधडी घेऊन आली. माझ्या तोंडापुढं धरून म्हणाली, "ही गोधडी ठीव पिटीत."*

*"ही कशाला?" मी विचारलं.*

*"हिवाळ्यात पांघरायला..." बाई म्हणाली.*

*मी वैतागानं म्हणालो, "बाई, शहरातली लोकं नावं ठेवतील."*

*"शहरातल्या लोकांना हीव वाजत नाही व्हय?" बाई काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.*
मी मुकाट्यानं गोधडी पेटीत ठेवली. *जुनी लुगडी आणि धोतरं एकावर एक जोडून बाई हातानं गोधडी शिवायची. त्या गोधडीच्या रुपानं तिनं 'मायेची ऊब' आमच्या सोबत दिली होती !*

  एका पिशवीत भांडी भरली होती. दुसऱ्या पिशवीत बाईनं ज्वारीचं पीठ, बेसन पीठ, लाल तिखट, काळं तिखट, सांडगं, तूरडाळ, हरभऱ्याची भाजी असं सामान भरलं होतं.

निघायची वेळ झाली होती, दादा बैलगाडी घेऊन आले. पेटी, पिशव्या गाडीत ठेवल्या. सगळ्यांच्या पाया पडून आम्ही गाडीत बसलो. अचानक बाईच्या काहीतरी लक्षात आलं. "थोडं थांब रं भिमा", असं म्हणून ती तरातरा घरात गेली. उतरंडी उतरल्या. *वायरची पिशवी भरून पापड्या, कुरडया आणि भुईमुगाच्या शेंगा घेऊन आली.*

*"बाई, असलं कशाला देती?" मला राहवलं नाही.*

*बाई म्हणाली, "असू दे, दुपारच्याला भूक लागली तर कुणाला सांगताल, तिथं पर मुलखात कोण आहे आपलं?"*

*बाईचं डोळं डबडबलं होतं !*

*क्रमशः..*

               *श्री राजेंद्र गिते, बार्शी.*



Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

१६९) कायद्याचे राज्य