दादा..! भाग- ३६

*दादा..!*

*भाग - ३६*

*घर असावे घरासारखे,*
*नकोत नुसत्या भिंती !*
*इथे असावा प्रेम-जिव्हाळा,*
*नकोत नुसती नाती !!*

  कवितेच्या या सुंदर ओळी आठवण्याचं कारण म्हणजे त्यावेळी आमच्या एकत्र कुटुंबात प्रेम, जिव्हाळा तर खूप होता, पण घर अगदीच साधं होतं, पत्र्याचं. त्याही फक्त दोन खोल्या. सणावाराला आई पाटीत पांढरी माती घ्यायची, त्यात पाणी घालायची आणि पोताऱ्यानं भिंती सारवायची. तोपर्यंत काकू शेणानं परवर सारवून घ्यायची. चुलीला मात्र रोज पोतारा दिला जायचा. बाहेरची चार माणसं आली, की अवघडल्यासारखं व्हायचं. दादा, आबांना कमीपणा वाटे, पण इलाजही नव्हता. सगळी सोंगं करता येतात, पण पैशाचं सोंग करता येत नाही म्हणतात, ते काही खोटं नाही. *उत्पन्न कमी आणि खाणारी तोंडं जास्त असली की मोठ्या घरालाही घरघर लागते.* पण आमची जमेची बाजू अशी होती की, आता विहिरीचं काम झालं होतं. शेतात पाणी आलं होतं.

कुठं काय पेरायचं?
पेरणीच्या वेळी किंवा महत्वाचं काम असलं की दादा, आबा दोघंच बसत, विचार करून निर्णय घेत. *भावाभावांत विचार होता, म्हणून गावातही भाव होता.* त्यांचं ठरलं ! ठरल्याप्रमाणे वाळसऱ्याला विहिरीच्या पाण्यावर ऊस लावला. ४१९ जातीच्या ऊसाची लागवड केली. तेव्हा ४१९ आणि ८६०३२ या ऊसाच्या जाती आमच्याकडं खूप प्रसिद्ध होत्या.

     पाऊस वेळेवर आणि चांगला पडला. मोरवंडीला धनं पेरलं आणि माळावर सूर्यफूल. कमी काळात जास्त फायदा देणारी पिकं म्हणून त्यावेळी धने आणि सूर्यफूलाकडं बघितलं जायचं. *धन्याला तर 'धन'च मानत !* सुर्यफुलाचं 'महिको' वाणाचं बियाणं भरवशाचं होतं. महिकोची बॅग मिळविण्यासाठी शेतकरी जीवाचा आटापिटा करत, चढ्या दरानं खरेदी करत, पण महिकोच पेरत. हौशी शेतकरी तर महिकोचं बी ठराविक अंतरानं डोबत. त्याला पाणी देत, आणि विक्रमी उत्पन्न काढत. *गावोगावी मोठ्या प्रमाणात सूर्यफूल पेरलं जाई. मग काय, श्रावण महिन्यात सकाळच्या वेळी सुर्यफुलाची नाजूक, पिवळी, सुंदर सुंदर फुलं सुर्याकडं तोंड करुन फुलत. सूर्याची कोवळी, सोनेरी किरणं त्या फुलांवर पसरत, तेव्हा काळ्या मातीतून फुलांच्या रुपात असंख्य सूर्य प्रकाशित झाल्यासारखं वाटे !*

  धने आणि सूर्यफूल ही जेमतेम तीन महिन्यांची पिकं. दिवाळीच्या आधीच त्यांचे पैसे हातात आले. *ऊसही जोमदार होता, त्याचं हिरवंगार, तजेलदार शेत बघून मन प्रसन्न होई. त्याची तलवारीसारखी धारदार पाती वाऱ्याच्या झुळकेनं लवलव करीत. त्या पात्यांसोबत बघणाऱ्याचं मनही झोके घेई.* अनेकदा मी ऊसाची दारी धरली होती. पाणी आवरत नव्हतं, चिखलानं हात, पाय, कपडे भरत. पण त्यातही खूप आनंद होता. *ऊस पाणी पीत होता, पेरापेरात साखर भरत होती, आणि आमच्या मनात हर्ष दाटत होता. ऊसाकडं बघत दादा एकदा म्हणाले, "खरंच, ज्याच्या शेतात पाणी.. त्याच्या मनगटात पाणी !*

धनं, सूर्यफूल आणि ऊसावर आपलं घराचं स्वप्न पूर्ण होईल, असं सगळ्यांनाच वाटू लागलं...

*...आणि दिवाळीच्या पाडव्याला भूमिपूजन करून पाया खोदायचं काम सुरू झालं.*

*क्रमशः..*

               *श्री राजेंद्र गिते, बार्शी.*


Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य