दादा..! भाग - ३३

*दादा..!*

*भाग - ३३*

  मंगळवारी नांदूरचा आठवडी बाजार भरतो. चौसाळा, नेकनूर, केज, कळंबचे व्यापारी आपापली दुकानं बाजारात थाटतात. आसपासच्या वीस पंचवीस खेड्यातल्या लोकांचा हा सगळ्यात मोठा बाजार !

  दर आठवडी आमची बैलगाडी बाजारला जायची. पान, सुपारी, तंबाखू, भाजीपाला, शेवचिवडा, जिलेबी, केळी, मटण आणि पेंडीचं पोतं हा आमचा ठरलेला बाजार ! *'हिऱ्या आणि हौश्या' नावाची बैलं आमच्याकडं खूप दिवस होती. शेतीची कामं असोत की बैलगाडीची, बैलं अंगाला टिपरू लागून घेत नव्हती. त्यांच्या गळ्यात 'चंगाळी' बांधलेली असत. त्यातली घुंगरं एका लयीत वाजत. तो आवाज आम्हाला लांबूनच ओळखू येई. आम्ही वाटच बघत थांबायचो. गाडी आली की धावत जायचो, बाजारची पिसवी घेऊन 'मटण आणलंय का नाही' ते हळूच चापून बघायचो.*

   मंगळवारी दुपारी शाळेला बाजारची सुट्टी असायची. कधी कधी आम्ही बाजाराला जायचो. बाजारात आमची उठबस नागू भोयाच्या हॉटेलात असायची. नागू भोई कळंबचा होता. नांदूरच्या बाजारात पाल ठोकायचा. शेवचिवडा तयार करुन आणायचा, भजी आणि जिलेबी तिथंच तळायचा. पालात बाजूला थोडी जागा असायची, गिऱ्हाईकं तिथंच बसून खात. बाजारात गेलं की पहिल्यांदा आम्ही गरमागरम भजी, जिलेबी आणि शेवचिवडा टच्चून खायचो.

  एके दिवशी नागू भोई आबांना म्हणाला, "मला दुधासाठी म्हैस घ्यायची आहे. तुमच्याकडं खात्रीच्या म्हशी आहेत. मला तुमच्याकडचीच एक म्हैस दया."

आबांनी स्पष्ट नकार दिला...

मग नागूनं दादांना गळ घातली. दादांचा स्वभाव भिडस्त होता. 'नाही' हा शब्दच त्यांच्याकडं नव्हता, त्यात नागू लोभातला माणूस ! तरीही त्यांनी टाळाटाळ केली. बघतो.. सांगतो म्हणत दोन आठवडे घालवले, नागू काही ऐकेना ! दादांचा नाइलाज झाला..
ते आबांना म्हणाले, "नामदेव, आता तूच ऐक, नागुला लाडकी देऊ, आपण दुसरी घेऊ..."

...आणि लाडकी नागूला दिली. भरल्या दावणीवरची लाडाची लाडकी गेली. मंगळीच्या जीवाची जिवलग मैत्रीण गेली. मंगळी आणि लाडकीची ताटातूट झाली.

लाडकी दिसेना, तेव्हा मंगळी सैरभैर झाली, झुरणी लागली. *मंगळी आणि लाडकीच्या मैत्रीच्या सुरील्या तारा जुळल्या होत्या की जीवनधारा? त्या दोघींनाच माहीत !*
हळूहळू मंगळीची पोटाची हाव थांबली, धावाधाव थांबली. तिनं खाणंपिणंच बंद केलं. पेंडीच्या टोपल्याकडंही ती बघेना. *तिचा मुका जीव उन्हात बसून शून्यात बघायचा, तेव्हा त्याचा अर्थ तरी कसा शोधावा?*

जनावराच्या डॉक्टरांना बोलावलं, त्यांनी तपासलं. पण त्यांनाही मंगळीच्या रोगाचं निदान झालं नाही. *डोळ्यांच्या धारा दिसत, पण मनाचं रुदन कसं दिसेल?*
 
  *जवळपास तीन महिने गेले. दुधाच्या धारा आधीच आटल्या होत्या. आता मंगळीच्या डोळ्यांच्या धाराही थांबल्या. मंगळीनं प्राण सोडला, आणि सगळ्या घरादाराच्या डोळ्यांना धारा लागल्या...*

*मंगळीनं मैत्रीखातर जीवाची कुर्बानी दिली असेल का? मग लाडकीनं तरी दुसरं काय केलं असेल?*

*क्रमशः..*

               *श्री राजेंद्र गिते, बार्शी.*

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य