दादा..! भाग- २३
*दादा..!*
*भाग -२३*
*तेव्हा गावांत जिल्हा परिषदेची सातवीपर्यंत शाळा होती. ती दोन सत्रांत भरायची. सकाळी आठ ते अकरा आणि दुपारी दोन ते पाच. सात वर्ग आणि चार शिक्षक अशी एकंदरीत परिस्थिती होती.* वाघेबाभूळगावचे भिमराव जाधव गुरुजी मुख्याध्यापक होते. त्यांची शिस्त खूप कडक होती. ते शाळेतच राहात, वर्गाच्या एका कोपऱ्यात त्यांचं गरजेपुरतं सामान होतं, हातानंच करुन खात. सोमवारी शाळेला यायचे, शनिवारी परत गावी जायचे. *आम्हाला पाचवी ते सातवी जाधव गुरुजींनीच इंग्रजी शिकवलं. त्यावेळी त्यांनी अक्षरांचे 'गट' करुन ज्या इंग्रजी शब्दांचं स्पेलिंग पाठ करून घेतलं, ते अजूनही विसरलं नाही.*
नाहोलीच्या त्रिंबक बिक्कड गुरुजींचा तर सगळा कार्यकाळ राजेगावातच गेला. त्यांना सगळं गाव 'तिरमक गुरुजी' म्हणायचं. नाहोली ते राजेगाव हे अंतर फक्त तीन किलोमीटरचं. गुरुजी चालतच यायचे. धोतर, टोपी, पांढराशुभ्र नेहरू शर्ट, कॉलरला पाठीमागं छत्री लटकवलेली आणि हातात जेवणाच्या डब्याची पिशवी अशा रुबाबातले मध्यम उंचीचे, गोरेपान, गुबगुबीत तिरमक गुरुजी लांबूनच ओळखू येत. मुलांना त्यांचा धाक वाटायचा. *त्यांनी ज्यांना ज्यांना शिकवलं, त्यातल्या बऱ्याच जणांच्या मुलांनाही त्यांनीच शिकवलं. त्यावेळी बदलीचे काही नियम होते की नाही? हाही एक प्रश्नच आहे ! त्यांच्याकडं कायम पहिली असायची. गावातले लोकं अजूनही म्हणतात, "पहिली शिकवावी तर तिरमक गुरुजींनीच !"*
१ ते १० अंकांतले बरेचसे अंक, बरेच दिवस मला वळणावर काढता येत नव्हते. मी सरळ सरळ काढायचो, अंकाला 'वळण' देता येत नव्हतं. काकुला काही ते आवडत नव्हतं ! भाकरी करायला बसलं की ती मला जवळ बसवायची. पाटीवर एक अंक काढून द्यायची आणि गिरवायला लावायची. पुन्हा दुसरीकडं काढायला लावायची. तिला जेव्हा गोड दिसंल तेव्हाच गिरवायचं बंद ! असं अनेक बाबतीत व्हायचं !!
गोरख गुरुजी तर गावातलेच होते. त्यांना तसं कोणत्याच विषयाचं वावडं नव्हतं, पण त्यांची शिक्षा करण्याची पद्धत अजब होती. जवळ बोलावून कान पिरगाळत, नाहीतर बेंबीजवळ चिमटा काढत. चौथे होते देशपांडे गुरुजी. गणित शिकविण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांनी ज्या पद्धतीनं गणितं शिकवली, त्याचाच अंमल अजून चालू आहे. किती वर्षे झाली? किती प्रशिक्षणं घेतली? पण बदल झाला नाही.
*माणूस कितीही शिकला, सवरला, मोठा झाला तरी तो आपल्या प्राथमिक शिक्षकांना विसरत नाही, हेच खरं !*
अकरा ते दोन या मधल्या सुट्टीत गुरुजींची जेवणं व्हायची, मस्त आराम व्हायचा. मुलंही जेवायला घरी यायची. जेवायला घरी आलेली मुलं पुन्हा दुपारच्या शाळेला जातीलच असं नाही. आमचीही तीच गत होती.
एके दिवशी आम्ही शाळेत असताना दादा तिथं आले. मधली सुट्टी व्हायला अजून बराच वेळ होता. ते गुरुजींशी काहीतरी बोलले आणि आम्हाला घरी घेऊन आले. घरी मोहन मामा, प्रभू जाधव, सुरेश कोळी, अशोक मेटे अशी लोभातली काही माणसं जमलेली होती.
*क्रमशः..*
*श्री राजेंद्र गिते, बार्शी.*