दादा..! भाग- २४

*दादा..!*

*भाग - २४*

  आबांच्या हातात पूजेचं ताट होतं. ताटात नारळ, साखर, उदबत्ती आणि हळदीकुंकू घेतलं होतं. दुसऱ्या हातात पाण्याचा तांब्या होता. दादांनी टिकाव, कुदळ, खोरे, पाट्या यांची आधीच जमवाजमव करुन ठेवली होती. सगळे आमचीच वाट बघत होते.
*आबा म्हणाले, "चला रानात, आपल्याला हीर खांदायचीय".*

आम्हाला खूप आनंद झाला.
एकदमच म्हणालो, "कुठं?*

"मोरवंडीला..."

"मोरवंडीला कुठं?" कृष्णानं विचारलं.

"तुम्ही सांगाल तिथं, त्याच्यासाठीच तुम्हाला बोलवून आणलंय", दादा नेमकं बोलले.

  आम्ही दप्तरं घरात ठेवली आणि थेट शेतात धूम ठोकली. *आमच्या पायात काहीच नव्हतं, पण आता त्याचं आम्हाला भान नव्हतं. आज काटंकुटंही टोचणार नव्हतं, आणि टोचलं तरी कळणार नव्हतं...*
*'आपल्याला विहीर खोदायचीय', एवढंच आमच्या डोक्यात होतं !*

  घरची माणसं गावाच्या बाहेर निघेपर्यंत मी आणि कृष्णानं मोरवंडी गाठली. तसंच पुढं वाळसऱ्याला गेलो. वाळसरा म्हणजे मोरवंडीचं सगळ्यात वरचं टुकडं. माळावरच्या लोकांच्या शेतातलं पावसाचं पाणी वाहून आमच्या वरच्या टुकड्यात यायचं. त्या पाण्यानं त्यातली वरची वरची माती वाहून गेली होती. वर वाळूसारखं पांढरं खडं दिसायचं, म्हणून त्या टुकड्याचं नाव 'वाळसरा' पडलं होतं.

  वाळसऱ्यात भाऊंच्या आणि आमच्या बांधावर एक मोठी बाभळ होती. सकाळी सकाळी तिची सावली लांबवर पडली होती. त्या सावलीत आम्ही मांड्या घालून बसलो. *दादांनी आणि मोहन मामांनी येतायेताच हातात दगडं आणली होती. आम्ही बसलो, त्या जागेवरच त्यांनी पाच दगडं ओळीत मांडली. मधला दगड जरा मोठा होता. आबानं ती सगळी दगडं धुतली. त्यांना हळदीकुंकू वाहिलं. पुढं उदबत्ती लावली, हात जोडलं आणि नारळ फोडला. तोपर्यंत आई, काकू आणि भामाआत्या आल्या. आम्ही सगळ्यांनी त्या 'पाणदेवाचं' दर्शन घेतलं.* बप्पानं सगळ्यांना गंध लावला. तोपर्यंत आबांनी अडकित्यानं नारळाचं तुकडं केलं होतं. मी नारळ वाटला, कृष्णानं साखर वाटली. सुरेश कोळ्यानं पाणदेव उचलून बाजूला ठेवले. दादानं हाताचं माप टाकून दोरी आणली होती. त्या दोरीनं विहिरीसाठी जागा आखली. दगडाच्या खुणा केल्या, आणि कुदळ मारली...
*विहीर खोदायला सुरुवात झाली !*

कुणी कुदळीनं, कुणी टिकावानं पुढं खणत होते, कुणी मोकळी झालेली माती खोऱ्यानं पाट्यांत भरीत होते. डोक्यावर 'चुंबळ' घेतलेल्या बाया मातीची पाटी लांब नेऊन फेकीत होत्या. *सगळीकडं चैतन्य पसरलं होतं, सगळ्यांच्या हालचालीत उत्साह दिसत होता, कामात आनंद होता, म्हणून कुणालाही कामाचा त्रास वाटत नव्हता !*

*क्रमशः..*

               *श्री राजेंद्र गिते, बार्शी.*

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य