दादा..! भाग- ४१
*दादा..!*
*भाग - ४१*
आमराई होती तेव्हा उन्हाळ्यात आंबे विक्रीला येत, आम्ही फक्त रसाचे आंबे विकायचो, बाकीचे वाटायचो, तरीही प्रपंचाला मोठा हातभार लागायचा. खव्याची भट्टी होती, तेव्हा आठवड्याला कमिशन मिळे, त्यावर किराणा, भाजीपाला भागायचा. भावकीच्या भांडणात आमराई गेली आणि खव्याच्या स्पर्धेत भट्टी मोडली. आता सगळी मदार शेती आणि म्हशींच्या दुधावर होती.
दादानं धाडसानं विहीर खोदली, ती लाकडानं बांधली. त्या खर्चातून सावरण्याच्या आधीच त्यांनी घराचं बांधकाम सुरू केलं. घराचा खर्च वाढत गेला. काम पूर्ण झालं, पण अनेक लोकांचे पैसे देणे बाकी राहिले. त्यातच आम्ही 'बीडला शिकायला जायचंय' याची सकाळ - संध्याकाळ दादांना आठवण करून देत होतो...
दादा म्हणत, "पाठवतो, शाळा तर सुरू होऊ द्या."
*ऊन, वारा आणि पावसाचे तडाखे सोशीत झाडं सावली देत उभी असतात, तसे दादा सर्वांना तोंड देत घरासाठी आणि घरातल्या प्रत्येकासाठी पाय रोवून उभे होते.*
कृष्णाची सातवी झाली होती, आठवीचं वर्ष मी नाइलाजानं नाहोलीत काढलं. बीडला शिकायला घातलं तर आम्हाला हातानं स्वयंपाक करून खावं लागणार होतं. म्हणून उन्हाळ्याच्या सुट्टीतच काकूनं आम्हाला स्टोह पेटवायला, भाकरी करायला शिकविल्या. एका भाकरीइतकं अंदाजे पीठ घेणं, ते एका हातानं मळणं आणि गोलाकार भाकरी थापणं आठवड्याभरात चांगलं जमलं, पण थापलेली भाकरी तव्यावर टाकताना गडबड व्हायची, भाकरी मोडायची. तिला पाणी लावून, भाजून होईपर्यंत दुसरी भाकरी तयार करणं जमत नव्हतं.
*ग्रामीण भागातला अस्सल, गावरान मेनू म्हणजे बेसन, भाकरी आणि कांदा ! तव्यातलं गरम गरम, झणझणीत बेसन आणि कडक आरावर भाजलेली ज्वारीची भाकरी असली की माणूस अर्धी तरी जास्तच खातो.* बेसन म्हणजेच पिठलं. पिठलं करायला सोपं आणि झटपट व्हायचं. घरात भाजीला काही नसलं, की कधी पिठलं तर कधी हरभऱ्याची भाजी हाटली जायची. पिठलं आणि हरभऱ्याची भाजी करायलाही काकूनं शिकवलं. फुलं लागायच्या आधीच आई, काकू हरभऱ्याची भाजी खुडत, संध्याकाळी 'घोळाना' करत. घोळाना बघूनच तोंडाला पाणी सुटे. आमच्यासाठी त्यांनी थोडी जास्त भाजी खुडली. वाळवून ठेवली. *थोडीशी डाळ, ओबडधोबड कुटलेलं शेंगदाणं आणि थोडं बेसनपीठ मिसळून हाटलेल्या हरभऱ्याच्या भाजीची चव वर्णन करून कशी समजेल?*
शाळा सुरू होऊन आठवडा झाला होता. एका दिवशी शिरूरच्या साडेसातच्या गाडीनं दादा बीडला गेले, भगवान विद्यालयात आमची नावं घातली. संध्याकाळी परत आले. कारंजाजवळ, गिराम गल्लीत कचरुलाल बोरा यांच्या वाड्यात किरायानं खोली केल्याचं आणि महिन्याला अडीचशे रुपये भाडं ठरल्याचं त्यांनी सांगितलं.
*क्रमशः..*
*श्री राजेंद्र गिते, बार्शी.*