दादा..! भाग - ५७

*दादा..!*

*भाग - ५७*

  रविवारची सुट्टी होती. राजू आम्हाला जुन्या बीडमधल्या कंकालेश्वराच्या दर्शनाला घेवून गेला. जाताना अधून मधून तो बीडची माहिती सांगत होता, *"हा सुभाष रोड.. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांचा बीडमधल्या तरुणांवर मोठा पगडा होता. ते बीडला येणार होते. ज्या रस्त्यानं त्यांची मिरवणूक निघणार होती, लोक त्याला 'सुभाष रोड' म्हणू लागले ! पलीकडं 'नेताजी मैदान' आहे, तिथं त्यांची सभा होणार होती. काही कारणानं ते येवू शकले नाहीत.. पण त्यांची नावं कायम राहिली !"*

  जुना पूल ओलांडून आम्ही जुन्या बीडमध्ये गेलो...
*बिंदुसरा नदीच्या काठावर एका जलकुंडात, सोन्यासारखं चमकणारं, अतिशय देखणं कंकालेश्वराचं मंदिर दिसलं. चारही बाजूंनी पाणी.. मध्यभागी दगडी, भक्कम, कोरीव खांबावर उभं असलेलं शिवमंदिर म्हणजे हेमाडपंथी बांधकामाचा उत्कृष्ट नमुना आहे ! मावळतीला गेलेल्या सूर्याच्या तांबूस उन्हात, मंदिराचं पाण्यात पडलेलं प्रतिबिंब अधिकच सुंदर दिसत होतं. मंदिराचं ते सौंदर्य आम्ही डोळ्यांत साठवीत होतो, राजू माहिती सांगत होता, "चालुक्य राजा विक्रमादित्य सहावा यानं १० ते ११ व्या शतकात हे दशावतारी मंदिर बांधलं. चालुक्य काळातील स्त्रिया लढाईत प्रत्यक्ष भाग घ्यायच्या, त्यामुळं मंदिरावर लढणाऱ्या स्त्रियांची शिल्पं कोरली आहेत. ग्रीक शिल्पकलेची छाप आणि स्टार फिशसारखा आकार असलेल्या या मंदिरात अत्री ऋषी आणि अनुसया यांनी अभिषेक केल्याची आख्यायिका सांगितली जाते. या मंदिराच्या मंडपाखाली एक गर्भगृह आहे. ते पाचशे वर्षांपासून बंद आहे. निजामानं महाशिवरात्रीच्या यात्रेलाही बंदी घातली होती, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनापासून हे मंदिर खऱ्या अर्थानं मुक्त झालं !*

  बीडचं हे वैभव बघून आम्ही परत आलो. दादा, आबा आधीच खोलीवर आले होते. दोघांना अचानक आलेलं पाहून आम्ही चकित झालो. दीड-दोन महिन्यापूर्वीच तर आम्ही गावाकडून आलो होतो. अचानक का आले असतील दोघे? आम्हाला काही कळेनासं झालं...

आबा म्हणाले, "नेकनूरच्या बाजारला आलो होतोत.. म्हणलं, चला पोरांची गाठ घिवून येऊ."

"बाजारला...???"

"तसं काही काम नव्हतं, सहजच आलो होतोत..."
दादानं सारवासारव केली..."

  *संध्याकाळी मी भाकरी केल्या, कृष्णानं पिठलं केलं.. दादा, आबा आमची 'स्वयंपाक कला' कौतुकानं बघत होते.. चौघांनी मिळून जेवणं केली !*
"घरचे सगळे कसे आहेत?" मी सहज विचारलं.

"सगळे चांगले आहेत", दादा म्हणाले.

*"विहिरीला पाणी किती आलंय?"*

*दादा थोडं चाचपडलं, मी पुन्हा विचारलं, तेव्हा त्यांनी सांगितलं, "गेल्या आठवड्यात गावाकडं जोराचा अवकाळी पाऊस झाला. सगळं नदी नालं एक झालं.. दोन परुस लाकडानं बांधलेली आपली विहीर गाळानं बुजली, तिच्यातला गाळ काढायचा आहे. दोन म्हशीतली गाभण म्हैस आज विकली.. ती जवळ आली होती !*

खूप वाईट वाटलं...
*वरचेवर आमचा पाय अधिकच गाळात चालला होता...*

*क्रमशः..*

               *श्री राजेंद्र गिते, बार्शी.*

 


Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य