दादा..! भाग -४९

*दादा..!*

*भाग -४९*

   *दोन दिवस राहून दादा गावाकडं गेले. कृष्णाला करमेनासं झालं. तो सारखं रडत बसायचा, गावाकडं जायचं म्हणायचा. तसं तर मलाही करमत नव्हतं, पण दादांनी सांगितलं होतं, "अक्कल 'दम' खाते !"*

आठवड्याभरात कृष्णानं गाव गाठलं..
दादा त्याला घेऊन आले...
आठ - दहा दिवस झाले की तो पुन्हा गावाकडं जायचा. दादा पुन्हा त्याला घेऊन यायचे..
दोन महिन्यांत तो तीनदा गावाकडं गेला.
मी मात्र तग धरून राहिलो...

  आमच्या रूमला लागून जिजाजींचं पत्र्याचं छोटंसं शेड होतं. *दोन माणसं मांडी घालून जेवायला बसू शकतील किंवा खाली स्टोव्ह मांडून एकजण स्वयंपाक करू शकेल.. एवढंच होतं ते !*

त्या शेडमध्ये पाटोदा तालुक्यातले सुमनताई आणि राजू खेडकर हे बहीणभाऊ राहात. त्यांच्याकडं सामानही गराजेपुरतंच होतं. चार - पाच सामानाच्या बरण्या, स्टोव्ह, हंडा, बादली आणि मोजकी भांडी...
त्यांनी त्या शेडमध्ये एका बाजूला एक लाकडी फळी आडवी मांडली होती, त्यावर सगळं सामान बसायचं...
त्यांना महिन्याला ५० रुपये भाडं होतं. त्या शेडचा वापर ते फक्त स्वयंपाक करण्यापुरताच करत, बाकी त्यांचा सगळा वावर आमच्यातच असे. दोघंही आमच्यापेक्षा मोठी होती, आणि खूप समजदारही होती...

*त्यावेळी डी एड ला खूप महत्त्व आलं होतं..*
*दहावीनंतर डी एड.. लगेच नोकरी.. लग्न.. संसार सुरू !*
असाच काहीसा फॉर्म्युला सगळीकडं लोकप्रिय होता...

खर्चिक आणि मोठं शिक्षण आपल्याला घेता येणार नाही, याची जाणीव ठेवून राजूनं डी एड ला प्रवेश घेतला होता..

*गरिबी माणसाला शहाणपण शिकवते !* याचा परिचय त्यांच्या चालण्यातून, बोलण्यातून, राहण्यातून आणि वागण्यातून सतत यायचा...
*राजू म्हणायचाही, "आपण आपली परिस्थिती बघून राहिलं पाहिजे, जगाकडं बघत बसलं तर दुःखच वाट्याला यायचं !*

  कृष्णा आठवीला आणि मी नववीला होतो. आम्हाला त्यांचं बोलणं तितकंसं समजत नव्हतं, पण *कठीण परिस्थितीत कसं राहावं, कमी खर्चात कसं भागवावं.. याचं शिक्षण आम्हाला त्यांच्या सहवासातच मिळालं !*

  *कधी कधी राजू खूप छान बोलायचा, आम्हाला परिस्थितीची जाणीव करून द्यायचा. म्हणायचा, "खूप दिवस शिकण्यासारखी आपली आर्थिक परिस्थिती नाही. नोकरी लागली, आपण आपल्या पायावर उभं राहिलं की मग पुढं शिकता येईल, पण शिक्षण चालू आहे, तोपर्यंत गरजा मर्यादित ठेवल्या, तर खर्च आटोक्यात राहील. दहावीनंतर तुम्हीही डी एड करा, आणि बायका सुध्दा डी एड च्याच करा."*

सुमनताईचं मत थोडं वेगळं होतं...
*तिला प्राध्यापिका व्हायचं होतं. ती म्हणायची, "डी एड केलं.. नोकरी मिळाली की, पाहुणे रावळे थांबू देणार नाहीत. घरचेही थांबणार नाहीत, लग्न उरकतील. एकदा संसारात अडकलं की मग मनासारखं शिकता यायचं नाही."*

*मग प्रश्न पडायचा.. कुणाचं ऐकायचं?*

*क्रमशः..*

               *श्री राजेंद्र गिते, बार्शी.*

  

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य