दादा..! भाग - ८३
*दादा..!*
*भाग - ८३*
मी करमाळा पहिल्यांदाच बघितला होता. तालुक्यातली कोणती गावं कशी आहेत? कोणत्या गावात 'जागा' आहेत, यातलं काहीच माहीत नव्हतं. त्यामुळं 'हे गाव द्या, ते गाव द्या' अशी कुणाकडं मागणी करण्याचा, कुणाला शिफारस करायला लावण्याचा विषय नव्हता...
*जामखेड किंवा परंडा तालुक्याला लागून असलेलं गाव मिळावं म्हणजे शनिवारी गावाकडं जायला आणि सोमवारी शाळेला यायला सोपं जाईल, असं मला वाटायचं !*
पण *करमाळ्याच्या जवळचं गाव मिळालं तर करमाळ्यात "घर" करायचं, लांबचं मिळालं तर त्या गावात घर करायचं.. असा 'घर'चा सूर होता !*
*सगळं स्थिरस्थावर होईपर्यंत एकट्यानं राहायचं आणि हातानं करून खायचं यावर सगळ्यांचं एकमत होतं !*
सोमवारी सकाळी लवकर निघायचं होतं. सामानाची भराभरी चालू होती, पण दिवस मावळायच्या टायमाला थोडीशी बुरबुर आली आणि लाईट गायब झाली. चिमणीच्या मिणमिणत्या उजेडातच काकूनं स्टोव्ह, भांडी एका मोठ्या पोत्यात भरली. बाईनं काळं तिखट, लाल तिखट, तूरदाळ, बेसनपीठ, सांडगं अशा सामानाच्या छोट्या छोट्या पिशव्या भरून ठेवल्या होत्या, त्याही काकूनं पोत्यात भरल्या. आबानं चादर, सतरंजीची बारीक घडी करून लोखंडी पेटीत ठेवली. *धुळीनं मळकट झालेली शबनम तिनं स्वच्छ धुवून काढली. फुफाट्यानं कळकट झालेली निळी पॅरागॉन मी निरम्यानं चकाचक केली !*
लाईट अजून आली नव्हती...
आईनं चिमणीच्या अंधूक प्रकाशातच स्वयंपाक उरकला.
*बाभळीच्या लाकडाच्या रसरशीत आरानं चूल अर्धी भरली होती. काळ्याकुट्ट ढगातून लालबुंद सूर्य अर्धा बाहेर यावा, तशी ती दिसत होती !* बाईनं त्या चुलीवर दूध तापायला ठेवलं होतं आणि ते उतू जाऊ नये म्हणून त्याला राखण बसली होती.
मी घरातली कोळशाची इस्त्री काढली. सांडशीनं चुलीतले आठ-दहा फुललेले निखारे त्यात घातले. माझा हेतू लक्षात येताच तिनं माझे तीन पांढरे शर्ट आणि काळ्या पॅन्टी माझ्याजवळ आणून ठेवल्या. *लग्नात अनेकांनी मला सफारी शिवण्याचा सल्ला दिला होता, पण मी कुणाचंच ऐकलं नव्हतं. पांढरा शर्ट आणि काळी पॅन्टच आपल्याला 'शोभून' दिसते, असं माझं ठाम मत होतं !*
सकाळी लवकरच आबानं बैलगाडी आणून दारात उभी केली. सामानानं भरलेलं पोतं, कपड्याची पेटी दादांनी फरशीवर आणून ठेवली होती. ओझं सोबत असल्यानं दादा सोबत येणार होते ! गळ्यात शबनम लटकवून मी तयार होतो. आबा "उरका..उरका" म्हणत होते, पण *आईची अजून लगबग चालूच होती. तिनं घरातून धोतराचं एक पांढरंशुभ्र फडकं आणलं. ते नीट पसरवलं, पाच चपात्या मोजून त्या एकावर एक रचल्या. वरच्या चपातीवर तीन चमचे लाल चटणी घातली. बोटानं त्या चटणीला गोल आळं केलं, त्या आळ्यात तेलाची धार सोडली. तेल-चटणी बोटानं कालवली. बाजूला लोणच्याच्या दोन फोडी ठेवून त्यावर दोन चपात्या पालथ्या घातल्या. फडक्याचं कोपरं ताणून गठुडं बांधलं आणि माझ्याकडं दिलं...*
निघायच्या आधी मी दादा, आबा, बाई, काकू आणि आईच्या पाया पडलो. बाईनं नेहमीसारखा डोक्यावरुन हात फिरवला. कानाजवळ बोटं मुडपून कडाकडा मोडली, आणि तोंडातल्या तोंडात पुटपुटली,"इठूबाला पावू द्या.. म्हातारंss व्हा !"
बाई नेहमी असाच आशीर्वाद द्यायची !
काकूनं गालावरुन हात फिरवून मुका घेतला. *दारात उभी राहून 'ती' निर्विकारपणे सगळं बघत होती. भावनांचे आभाळ पापण्यांवर पेलणं तिला आता जड जात होतं. डोळं भरून आलं होतं. "शनिवारी परत येतो," असं म्हणून मी गाडीत बसलो तसा तिनं डोळ्याला पदर लावला...*
शिरूर, मांजरसुंभा, जामखेड अशी तीनदा गाडी बदलावी लागली. सामानाची चढउतार करताना आमची दमछाक व्हायची. *खांद्यावर पोत्याचं ओझं घेऊन दादा गर्दीतून पुढं वाट काढायचे. हातात पेटी, गळ्यात शबनम लटकावून मी मागं मागं चालयचो !*
करमाळ्यात पोचायला आम्हाला चांगली दुपार झाली. सामान रिक्षात घालून आम्ही थेट दिलीप भुजबळांच्या झेरॉक्सकडे गेलो. बुड टेकायला आम्हाला तेव्हा तेवढाच एक आधार होता. भुजबळ म्हणाले, "आपल्या इथं ऐसपैस जागा आहे. गाव मिळेपर्यंत सामान इथंच राहू द्या..काही काळजी करू नका !"
तिथंच बाजूला बसून आम्ही जेवणं केली...
दादांनी भुजबळांसोबत थोडं हितगुज केलं. पंचायत समितीपर्यंत माझ्या सोबत आले, थोडं थांबले आणि परत फिरले.
*खांद्यावरचं मोठं ओझं उतरल्यानं दादांना आता हलकं हलकं वाटत होतं !*
*क्रमशः..*
*श्री राजेंद्र गिते, बार्शी.*