गावाकडची दिवाळी !

*शैक्षणिक दीपस्तंभ "दीपोत्सव"*
          *दिवाळी विशेषांक २०२३ साठी*

*विभाग १ - लेख विभाग*

*गावाकडची दिवाळी !*
----------------------------

*दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण,*
*दिवाळी म्हणजे आनंदाची उधळण !*
*दिवाळी म्हणजे नात्यांचा उत्सव,*
*दिवाळी म्हणजे भावनांचा महोत्सव !!*

दसरा झाला की चाहूल लागते ती दिवाळीची...
*दसरा घरातल्या जाळ्या, दारातला कचरा आणि माणसांच्या मनातली जळमटं दूर करतो तर दिवाळीचा गोड फराळ नात्यांमधला गोडवा वाढवतो !*

खरंच,
*दसरा म्हणजे सृष्टीच्या कणाकणांत चैतन्य भरणारा क्षण आणि दिवाळी म्हणजे तन, मन उत्साहानं भारणारा सण !*

  लहानपणी गावाकडच्या दिवाळीची मजा काही औरच होती ! काही दिवस आधीच शाळेला 'दिवाळीची सुट्टी' लागायची. आमचं एकत्रित कुटुंब होतं. दादा, आबा, आई, काकू, आजी, सख्खी-चुलत भावंडं अशी घरात लहानमोठी जवळपास दीड डझन माणसं होती. आत्याची मुलंही दिवाळीला आमच्याकडं यायची, त्यामुळं घर कसं गोकुळासारखं फुलून जायचं. दिवाळीत सर्वांना नवीन कपडे मिळतीलच असं नव्हतं, पण जे कपडे असत त्यातही आनंद कमी नसायचा !

  आम्हाला आठवडी बाजार होता नांदूरचा, तो मंगळवारी भरायचा. दिवाळीच्या आधीच्या मंगळवारी दादा 'दिवाळीचा बाजार' करत. किराणा सामानासोबतच टिकल्या, फुलबाजे, कावळे, भुईचक्र, नागाच्या गोळ्या आणि रेघाळी फटाकड्या आवर्जून आणत. *आमच्या भागात त्यावेळी तेरखेड्याचा तोटा खूप प्रसिद्ध होता. 'तेरखडी तोट्या'चा आवाज सगळी गल्ली दणाणून सोडायचा, म्हणून त्याच्या खरेदी शिवाय दिवाळीचा बाजार अपूर्ण असायचा !* त्या तेरखडी तोट्याची किमान चार पाकिटं तरी दादा आणत, पण त्यात लहान मुलांना वाटा मिळत नसायचा.

*दिवाळी जवळ आली की आम्हाला आकाशकंदील बनविण्याचे वेध लागायचे. बांबू फोडून त्याच्या कामट्या काढणं, त्या दोऱ्यानं बांधणं, गव्हाच्या पिठाची खळ करणं आणि त्याला रंगीत कागद डकवून "आकाशकंदील" बनवणं हाही एक छोटा उत्सवच असायचा. तो 'कंदील' दिव्यानं उजळला की आम्हाला 'आकाश' ठेंगणं झाल्यासारखं वाटायचं ! स्वनिर्मितीचा आनंद काही वेगळाच असतो, नाही का?*

*प्रत्येकानं आपापल्या घरांपुढं लावलेले आकाशकंदील, भिंतींवर लावलेल्या पणत्या आणि केलेल्या दिव्यांच्या रोषणाईनं सगळं गाव उजळून निघायचं. रात्रीचा अंधार कुठल्या कुठं पळून जायचा, तेव्हा आमचं राजेगाव जणू "राजाचं गाव" असल्यासारखं भासायचं !*

  आमची खरी धांदल उडायची ती नरकचतुर्दशीच्या आदल्या रात्री ! आपल्याला आवडणाऱ्या, गोड दिसणाऱ्या ड्रेसला तांब्यानं इस्त्री करणं, त्याची व्यवस्थित घडी घालणं आणि आपल्या वाटणीचे फटाके 'सुरक्षित' जागी ठेवणं मोठं जिकिरीचं काम असायचं. सकाळी लवकर जाग यावी म्हणून रात्री लवकर झोपण्याची घाई असायची, पण 'पहिल्या अंघोळीची ओढ' लवकर झोप लागू देत नसायची.

*सणासुदीच्या काळात बायकांच्या अंगात तर दोन हत्तीचं बळ संचारायचं ! अर्ध्या रात्रीपासून ढणढणत्या चुलीपुढं बसून आई आणि काकू फराळाच्या मागं 'हात धुवून' लागायच्या. पहाट होता होता लाडू, करंज्यांचा मंद, गोड वास घरभर दरवळायचा. चकल्या, चिवड्याचा हलकासा तिखट सुवास त्यात हळूच मिसळायचा. फराळाच्या त्या घमघमाटात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर दादांनी लावलेलं नरकासूर वधाचं कीर्तनही विरघळून जायचं !*

बोचऱ्या थंडीत म्हातारी बाई (आजी) एकेकाला आंघोळीला उठवायची. तारा अक्का कोमट तेलाचे दोन दोन थेंब कानांत सोडून गरम पाण्यानं आणि मोती साबणानं चोळून मोळून अंघोळ घालायची, निरांजनीच्या मंद प्रकाशात ओवाळायची आणि मग सुरू व्हायची आमची दिवाळी !
दिवस चांगला वर येईपर्यंत दगडानं टिकल्या वाजवणं, दोन बोटांच्या चिमटीत कोपरा पकडून कावळा उडवणं, नागाच्या गोळीची गंमत बघणं, उदबत्तीनं फटकडी पेटवून दूर पळून जाणं तसेच रात्रीच्या अंधारात फुलबाजे नाचवणं आणि टोपलीत भुईचक्राला गोल गोल फिरताना पाहणं खूप मजेशीर असायचं.

खरंच, *दिवाळीच्या चार दिवसांत गावाकडं फटाके फोडून आणि मिळून मिसळून फराळ झोडून मिळालेला आनंद वर्षभर पुरायचा !*

          *श्री. राजेंद्र भिमराव गिते*
                           *उपशिक्षक*
          *जि.प.प्रा.शाळा रस्तापूर*
          *ता. बार्शी, जि. सोलापूर*
          *मो. नं. 9881131509*





Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य