मी सोलापूरकर!
मी सोलापूरकर...!
"सोडिले सर्व घरदार,
त्यागिला सुखी संसार,
ज्योतिसम जीवन जगले,
ते अमर हुतात्मे झाले"...!
भारतीय स्वातंत्र्यपूर्वीच मे 1930 मध्ये 'तीन दिवस' स्वातंत्र्य उपभोगणारा 'सोलापूर' हा देशातील एकमेव जिल्हा आहे. त्यानंतर श्रीकिसन सारडा, मल्लाप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसेन आणि जगन्नाथ शिंदे यांना ब्रिटिशांनी फाशी दिली. त्यांच्या बलिदानानं आणि 'श्री.शिवयोगी सिद्धेश्वराच्या' पदस्पर्शानं पावन झालेल्या माझ्या सोलापूरच्या भूमीला त्रिवार वंदन..!!!
सोलापूर जिल्हा म्हणजे रत्नांची खाणच. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात चिनी सैनिक रुग्णांची सेवा करुन भारताचं नाव जगभर उज्वल करणारे 'डॉ. द्वारकानाथ कोटणीस' तसेच...
"तो शूरपणा आता,
रणात कसा नाही |
इतिहास मराठयांचा,
स्मरणात कसा नाही" ||
अशा प्रखर कविता व सुंदर भावगीतं लिहिणारे 'कवी संजीव' आणि...
"मनी धीर धरी,
शोक आवरी, जननी,
भेटेन नऊ महिन्यांनी"
ही अजरामर कविता लिहिणारे कवी 'कुंजविहारी' सोलापूरचेच...
"जन्माशी येऊनी, पहा रे पंढरी"
असं म्हणतात ते उगीच नाही...!
अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या आणि दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूरला आषाढी- कार्तिकीला लाखो वारकरी येतात. विठ्ठलाला 'याची देही याची डोळा' पाहून दर्शन घेतात, धन्य होतात, आणि द्वादशीला देशातील एकमेव श्रीविष्णूचं प्राचीन मंदिर असलेल्या बार्शीच्या "भगवंताचं" दर्शन घेऊन परत जातात.
"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे"
असा भक्तांना आधार देणारे अक्कलकोटचे 'स्वामी समर्थ', आणि सज्जनांना वेचणाऱ्या आणि दुर्जनांना ठेचणाऱ्या 'करमाळ्याची कमलाई' आणि 'अकलूजची अकलाई' सोलापूर जिल्ह्यातच आहेत.
सुप्रसिद्ध गायक प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं...
"गौरवशाली महाराष्ट्राची,
मंगळवेढे भूमी संतांची."
हे त्यांच्या जन्मभूमीचं गौरवगीत किती सार्थ वाटतं बघा...
दुष्काळात अन्नान्न दशा झालेल्या लोकांसाठी पातशहाची धान्याची कोठारं खुली करणारे 'संत दमाजीपंत',
"ऊस डोंगा परी, रस नोहें डोंगा"
म्हणणारे 'संत चोखामेळा', आणि 'संत कान्होपात्रा' यांची जन्मभूमी मंगळवेढा, आणि मोहोळच्या 'अरण' गावात
"कांदा, मुळा, भाजी,
अवघी विठाई माझी"
म्हणत भक्तीचा मळा फुलवणारे 'संत सावता माळीही' सोलापूर जिल्ह्यातलेच.
सोलापूर शहराला आणि जिल्ह्याला सांस्कृतिक वसा आणि ऐतिहासिक वारसा लाभला आहे. महानगरपालिकेची भव्यदिव्य 'इंद्रभुवन' इमारत, देशातलं चौथ्या क्रमांकाचं स्वच्छ आणि सुंदर 'रेल्वे स्टेशन', बहामनी राजवटीत बांधलेला 'भुईकोट किल्ला', आणि दुर्मिळ पक्ष्यांसाठी नंदनवन असलेला 'संभाजी(कंबर) तलाव' सोलापूर शहराचं वैभवच.
माळशिरस तालुक्यातील सरसेनापती संताजी घोरपडे यांचं 'समाधीस्थळ', अकलूजची 'शिवसृष्टी', वेळापूरचं हेमाडपंथी 'अर्धनारीनटेश्वराचं मंदिर', भीमा सीना संगमावरील प्राचीन 'संगमेश्वर मंदिर', बार्शीचं 'भगवंत मंदिर', करमाळ्यातील 'कमलाभवानीचं मंदिर' आणि 'अष्टकोनी विहीर' हे स्थापत्यशैलीचे सुंदर नमुने म्हणजे जिल्ह्याचा संपन्न वारसाच.
नान्नजचं 'माळढोक पक्षी अभयारण्य', अकलूजचं 'सयाजीराजे वॉटर पार्क', सोलापूरची 'गड्ड्याची यात्रा', 'सोलापुरी चादरी', सांगोला, माळशिरस तालुक्यात मेंढ्यांच्या लोकरीपासून विणल्या जाणाऱ्या 'घोंगड्या' जिल्हाच्या लौकिकात भरच घालतात.
भीमा, सीना, नीरा, भोगावती या मुख्य नद्या म्हणजे जिल्ह्याच्या रक्तवाहिन्याच. भीमा नदीवरील 'उजनी धरण' तर पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीसाठी वरदान ठरलं आहे. 'ज्वारीचं कोठार' म्हणून ओळखला जाणारा सोलापूर जिल्हा अन्नधान्ये, फळे व जीवनावश्यक वस्तूंच्या उत्पादनात कुठंही मागं नाही. सांगोल्याच्या डाळींबांना आणि बार्शीच्या सिताफळांना देशात तसेच परदेशातही प्रचंड मागणी आहे.
संत, महंत, कलावंत, विचारवंत आणि साहित्यिक यांनीही सोलापूरचं नाव मोठं केलं. शुभराय महाराज, लावणीकार रामजोशी, शाहीर अमर शेख, प्रख्यात चित्रकार एम. एफ. हुसेन, दिग्दर्शक जब्बार पटेल, लेखक अच्युत गोडबोले, पक्षीतज्ञ मारुती चित्तमपल्ली, साहित्य सम्राट न.चिं. केळकर, नवकवितेचे प्रवर्तक बा.सी.मर्ढेकर, समीक्षक गो. मा. पवार, प्रभावी वक्ते निर्मलकुमार फडकुले, आपल्या नावापुढं अभिमानानं आईचं नाव लावणारे "कोल्हाट्याचं पोर" चे लेखक डॉ.किशोर शांताबाई काळे, अभिनेते अतुल कुलकर्णी, अभिनेत्री शशिकला आणि सरला येवलेकर याही सोलापूरच्याच.
'अक्करमाशी' या कादंबरीतील वास्तवदर्शी लेखनातून सगळ्या महाराष्ट्राला हादरवून टाकणारे शरणकुमार लिंबाळे आणि 'सैराट' चित्रपटानं सगळ्या जगाला वेड लावणारे दिग्दर्शक नागराज मंजुळेही सोलापूर जिल्ह्यातलेच.
इतका संपन्न आणि समृद्ध जिल्हा महाराष्ट्रात दुसरा नाही, म्हणूनच म्हणावंसं वाटतं...
"माझं सोलापूर.. माझा स्वाभिमान,
मी सोलापूरकर.. मला अभिमान...!"
◆◆◆◆◆
श्री. राजेंद्र गिते, बार्शी.