जखमी वाघीण!
जखमी वाघीण..!
गेल्या वर्षीचा प्रसंग. शनिवार होता. मित्रांसोबत सकाळी रोडनं फिरायला गेलो होतो. घाई असल्यानं आम्ही तलावकडील मधल्या रस्त्यानं येत होतो. एका पत्र्याच्या शेडपुढं अठरा वीस वर्षांचा एक मुलगा नागडा-उघडा उभा दिसला. आम्हाला पाहून चपापला. खांद्यावरचा टॉवेल कमरेभोवती आडवा धरुन शेडमध्ये घुसला. चुलीपुढं म्हातारी आणि बाजूला एक बाई होती. ती बहुधा त्याची आई असावी. त्यानंतर आम्ही या रस्त्यानं यायचं टाळलं.
कोरोनाची साथ आली, लॉकडाऊन झालं. आमचं रोडला जाणंही बंद झालं. मग आम्हाला तलावकडील त्याच रस्त्यानं फिरायला जाण्याशिवाय पर्याय उरला नाही.
कॉलनीच्या पश्चिमेकडील हा भाग. कुठंतरी एखादं घर, मग तलाव, त्याच्या दोन्ही बाजूला मोकळं मैदान आणि त्यापुढं बायपासपर्यंत हिरवी हिरवी शेतं. तलाव तसा मध्यमच, दरवर्षी उन्हाळ्यात आटतो, पण यंदा त्याच्यात कुकडीतून पाणी सोडलं, त्यामुळं आटला नाही. त्याच्या भरावाची भिंतही रुंद आणि मजबूत. भिंतीच्या आतील बाजूनं दगडांची सुंदर पिचिंग केलेली. त्यावर निवांत बसून तलावाचं सौंदर्य डोळ्यात साठवता येतं, आणि मावळत्या सूर्याचं पाण्यातलं सोनेरी प्रतिबिंब मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैदही करता येतं.
तलावात मोजकेच पक्षी, पण त्यांचा विहार डोळ्यांना आनंद देतो, तर वाऱ्याच्या झोतांनं पाण्यावर उठणाऱ्या लहरी मनाला उभारी देतात.
टायरवर बसून जाळ्यात अडकलेले मासे काढणाऱ्या कोळ्याची कसरत पाहणं काही लोकांचा छंद..! तर पिचिंगच्या दगडांवर बसल्या बसल्या पाण्यात खडा भिरकावून उठलेले तरंग मोजणं काही शौकिनांचा शौक.
लॉकडाउनच्या काळात हा सगळा परिसर पिकनिक पॉईंट बनला, जो अजूनही आहे.
तलावाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानाभोवती आम्ही चढाओढीनं भरभर चालतो, धावतो आणि मग तिथंच निवांत बसून गप्पागोष्टीही करतो.
मैदानाला लागूनच ते शेड आहे. आम्हाला त्या मुलाविषयी जाणून घेण्याची इच्छा झाली. मग आम्ही पुन्हा पुन्हा त्यांच्याकडं गेलो. सगळ्यांशी बोललो, त्यांनाही बोलतं केलं, आणि त्यांची कर्मकाहानी जाणून घेतली...
ती सिंधुबाई. आईवडीलांना एकटीच. तिच्या लग्नानंतर काही दिवसांत वडील वारले, त्यामुळं आईला जवळचं कुणी उरलं नाही. सासर आणि माहेर एकाच गावात असल्यानं थकलेल्या आईचाही मग तीच आधार बनली.
खूप दिवस तिला मूलबाळ झालं नाही. उपवास केले, देव-देवऋषी केले, नवस केले, दोनदा गुजरातलाही जाऊन आली पण उपयोग झाला नाही.
नवऱ्यानं दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतला. तिचाही नाइलाज झाला, पण जीवाला आधार म्हणून अडीच एकर जमीन नावावर करुन घेतली. नात्यातलीच एक मुलगी सवत झाली. पाच वर्षे लोटली, आणि बघता बघता त्यांना दोन मुलंही झाली.
बाईचं बाईपण आई होण्यात असतं! सिंधु सैरभैर होती, तिलाही आई व्हायचं होतं. आता तिनं डॉक्टरांचा सल्ला घेतला, उपचारही घेतले... आणि सिंधुचं स्वप्न पूर्ण झालं. ती आई झाली. तिला खूप आनंद झाला. तिनं मुलाचं नावच आनंद ठेवलं, पण तिचा हा आनंद फार काळ टिकला नाही. वर्षभरात सगळ्यांच्या लक्षात आलं की बाळ मतिमंद आहे. त्याच्या लहान मेंदूला रक्तपुरवठा सुरळीत होत नसल्यानं आनंदला फीट यायला लागली आणि मग त्या मायलेकरांची फरफट सुरु झाली.
आनंद अचानक डोळे गरगर फिरवायचा, चक्कर येवून पडायचा, हातपाय ताणायचा आणि जमिनीवर आपटायचा. त्यामुळे सिंधु त्याला कधीही नजरेआड होऊ दयायची नाही. कसाही असला तरी पोटचा गोळा होता तो..! तिनं तो जीवापाड जपला, आणि लहानाचा मोठा केला.
आता आनंद सहा वर्षांचा झाला, त्याचं शाळेतही नाव घातलं. कधीमधी सिंधू त्याला शाळेत घेऊन जायची आणि सोबतच घेऊन यायची. काळ पुढे सरकत गेला, आणि आनंद चौथी पास झाला.
आपल्याला अन्नातून विषबाधा केल्याची आणि आनंदच्याही जिवाला धोका असल्याची सिंधुला शंका येवू लागली. तिच्या मनात भीती निर्माण झाली, आणि एका रात्री तिनं आनंदला घेऊन घर सोडलं. कुठे जायचं? कुठं रहायचं? काही ठरलं नाही, इथं राहायचं नाही हे मात्र तिनं पक्कं ठरवलं.
रात्रीच्या अंधारात ती चालत राहिली, हायवेला आली. मिळेल त्या वाहनानं तिनं टेंभुर्णी गाठली. तोपर्यंत चांगलं उजाडलं होतं. तिच्या काळजात आग पडली होती...
रस्त्याच्या बाजूला एका मोठ्या झाडाखाली ती थांबली. आनंदला चहा बिस्किटं खाऊ घातली, तिनंही चहा घेतला. दोघांनाही बरं वाटलं. मग तिनं तिथंच बस्तान बसवलं. काही दिवस भीक मागितली, मग मजूरी केली, मिळेल ते कामही केलं. अशीच उणीपुरी दोन वर्षे गेली.
एके दिवशी कामाहून येताना गावच्या माणसानं तिला पाहिलं, मग दुसऱ्या दिवशी तिनं अकलूज गाठलं. तिथंच काम शोधलं, एका बागायतदाच्या मळ्यात तिला काम मिळालं. थोडा निवांतपणाही मिळाला. खर्च कमी असल्यानं चार पैसेही साठले. अकलूजच्या मातीनं या मायलेकरांचा तीन वर्षे सांभाळ केला. आता आनंद मोठा झाला होता, पण फक्त शरीरानं.. बुध्दीनं नाही!
एकाच ठिकाणी खूप दिवस राहणं तिला धोक्याचं वाटलं, पण जाणार कुठं?
आनंदला घेऊन ती निघाली. दिवसभर चालायचं, एखाद्या गावात आसरा शोधायचा, चार घरं मागायची, आणि मिळेल ते दोघांनी खायचं.
आठवडाभर त्यांनी पायपीट केली, आणि ती शंभू महादेवाच्या शिंगणापूरात आली. शिखर शिंगणापूरच्या परिसरात ती अडीच वर्षे भटकली. पण तिला तिथं मनाजोगं काम मिळालं नाही. तिनं महादेवाला साकडं घातलं..
माझं काय चुकलं..
आता खेळ थांबव..
खूप हाल झाले...
तरी देवा सरं ना ह्यो भोग कशापायी
हरवली वाट दिशा अंधारल्या दाही
ववाळुनी उधळते, जीव मायबापा
वणवा ह्यो उरी पेटला...
भोळ्या शंभुला त्या माऊलीनं आर्त हाक दिली...
नऊ वर्षांत किती कठीण प्रसंग आले? तिनं धैर्याने तोंड दिलं. आपल्या पाडसाला पोटाशी कवटाळून ती हरिणी धावत राहिली, ऊन, वारा, पाऊस झेलत राहिली. कितीदा पडली, पुन्हा उठली, पुन्हा धावली पण हार मानली नाही. ती लढली... ती झगडली... पोटासाठी आणि पोटच्या लेकरासाठी.
आता ती थकली.. घायाळ झाली.. पण क्षणभरच..!
ती पुन्हा सावरली, जखमी वाघीण बनली... आणि चवताळून उठली..! मनाचा पक्का निर्धार केला, आणि थेट गाव गाठलं. नावावर असलेल्या अडीच एकर जमीनीचा सौदा केला. पैसे घेतलं, म्हाताऱ्या आईलाही सोबत घेतलं, आणि आलेल्या पैशाचा प्लॉट घेऊन शेड उभारलं.
पण इथंही दुर्दैवी नशिबानं तिची पाठ सोडली नाही. ती पाणी आणायला गेली, आणि इकडं आनंद फीट येवून कोसळला. त्याचा एक पाय चुलीत पडला... पेटलेलं लाकूड दुसऱ्या पायावर पडलं... आणि दोन्ही पाय भाजले. वर्षभर तो भोळा भाबडा जीव त्या जखमांचा दाह सोसत राहिला...
आनंद आता उपचारानं बरा होतोय, त्याच्या जखमाही भरल्या आहेत. सिंधुच्या हातालाही आता काम मिळालं आहे. तिच्या पिल्ल्यासाठी ती आता नवं घर बांधतेय...
नव्या जोमानं, नव्या उमेदीनं आणि नव्या ध्येयानं ती पुन्हा उठली आहे... ती आता रडणार नाही... लढणार..! आनंदसाठी... तिच्या बछड्यासाठी... आता ती वाघीण बनली आहे..!
श्री.राजेंद्र गिते, बार्शी.