तंबाखुमुक्त शाळा.. शिक्षकांची भूमिका.
'तंबाखुमुक्त शाळा'..
शिक्षकांची भूमिका !
हम सबका, यही है सपना |
नशा मुक्त हो, भारत अपना ||
भारत हा तरुणांचा देश आहे. 'तरुणांची शक्ती' हीच राष्ट्राची संपत्ती असते. तरुणांच्या 'नेतृत्वामुळे आणि कर्तृत्वामुळेच' देश घडतो, पण आळशी तरुण आणि भ्रष्ट यंत्रणेमुळे देश बिघडतो. तरुण सैनिक देशासाठी लढतो, पण सुशिक्षित बेकार व्यसनातच सडतो. व्यसन कोणतंही असो, त्याचे परिणाम वाईटच होतात..!
'व्यसन म्हणजे जिवंत मरण,'
'स्वतःच स्वतःसाठी रचलेलं सरण.'
बेरोजगार तरुण..
मित्रांच्या संगतीत आणि मोबाईल मधील गंमतीत मन गुंतवित आहेत. कौटुंबिक ताणाने आणि नात्यांमधील तणावाने आयुष्य संपवित आहेत. व्यसनी प्रौढांच्या अनुकरणाने लीन होत आहेत. पाश्चात्य संस्कृतीच्या अनुसरणाने दीन होत आहेत. चित्रपट व जाहिरातींच्या मोहात पडत आहेत. दारू, गांजा, तंबाखू आणि सिगारेटच्या डोहात सडत आहेत.
राष्ट्राची ही संपत्ती कॅन्सरच्या व्याधीत सापडत आहे, ही खरी शोकांतिका आहे..!
तंबाखुचे सेवन अनेक स्वरूपात केले जाते. चुन्याने मळून तंबाखू खाल्ली जाते. विडी, सिगारेट, चिरुट, हुक्का, मावा, तपकीर, मशेरी आणि गुटखा यांतही सर्रास वापरली जाते.
तंबाखुमध्ये निकोटीन हे हानिकारक रसायन असते. तंबाखू खाल्ल्याने हे रसायन वेगाने शरीरात मिसळते. धुम्रपानांमुळे ते रक्तात मिसळते. निकोटीन मानवाच्या लहान मेंदूवर परिणाम करते, आणि त्याला सवयीत बांधून ठेवते. तंबाखुमधील निकोटीन रक्तप्रवाहात मिसळले की शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याची भावना निर्माण होते. तात्पुरती नशा येते. ही नशा पुन्हा मिळविण्यासाठी पुन्हा तंबाखुचे सेवन केले जाते. सवय लागते.. यातूनच व्यसन जडते. सवयींचे चक्र आणि व्यसनांचे चक्रव्यूह भेदणे कठीण आहे..!
तंबाखुची सवय आणि व्यसनांची नशा,
सुंदर जीवनाची करते दुर्दशा..!
तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने शरीरावर आणि मनावर अनेक दुष्परिणाम होतात. चघळायच्या तंबाखुमुळे तोंडाचा, जिभेचा, घशाचा कॅन्सर होतो. धुम्रपानांमुळे फुफ्फुसाचा कॅन्सर होतो. 'तंबाखू' हेच कॅन्सरच्या वाढत्या प्रमाणाचे मुख्य कारण आहे. तंबाखूच्या पॅकिंगवर 'तंबाखुमुळे कॅन्सर होतो.' सिगारेटच्या पॉकेटवर 'Cigarette smoking is injuries to health.' असे ठळकपणे लिहिलेले असते..
सगळे वाचतात.. समजून कुणीच घेत नाही..!
सगळ्यांना कळते.. वागता कुणालाच येत नाही..!!
प्रबळ इच्छाशक्ती आणि काही घरगुती उपाय केल्यास तंबाखू, गुटख्यापासून दूर जाता येईल. खरंतर तंबाखू ही अमेरिकेतील एक वनस्पती, पोर्तुगीजांनी ती भारतात आणली. सध्या भारतात 10 टक्के क्षेत्रात तंबाखुचे उत्पादन घेतले जाते. तंबाखुचे 'उत्पादन व सेवन' करण्यात भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. अंदाजे 2 कोटी लोक तंबाखू आणि विडी उद्योग क्षेत्रात काम करीत आहेत. विविध सर्वेक्षणानुसार देशात 50 टक्क्यांपेक्षा अधिक लोक तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करत आहेत. कॅन्सर, हृदयरोग, मुखरोग, गँगरीन, नपुंसकता, गर्भपात तसेच पोटाच्या, फुफ्फुसाच्या आणि किडनीच्या आजाराने लाखो लोक मरत आहेत.
31 मे हा दिवस 'तंबाखू सेवन विरोधी दिन' म्हणून पाळला जातो.
महाराष्ट्रात 'टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल परळ, मुंबई' आणि 'नर्गिस दत्त कॅन्सर हॉस्पिटल बार्शी, सोलापूर' येथे कॅन्सरवर अत्यल्प दरात उपचार केले जातात.
बालवयातच मुलांवर चांगले संस्कार व्हावेत. विद्यार्थ्यांमध्ये जागृती यावी. गावांगावात जनजागृती व्हावी. युवा पिढी तंबाखुपासून दूर राहावी. राज्यातील शैक्षणिक संस्था आणि त्यांचे परिसर तंबाखुमुक्त व्हावेत, यासाठी महाराष्ट्र राज्याचा शालेय शिक्षण विभाग 'तंबाखुमुक्त शाळा अभियान' राबवित आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाला 'सलाम मुंबई फाउंडेशन' ही संस्था सहकार्य करीत आहे.
'तंबाखुमुक्त शाळा' करण्यासाठी शिक्षकाची भूमिका महत्त्वाची आहे. म्हणून शिक्षण विभाग आणि सलाम मुंबई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा आयोजित केली जाते. शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाते, आणि निकष पूर्ण करणाऱ्या शाळेला 'तंबाखुमुक्त शाळा' म्हणून घोषित केले जाते.
विद्यार्थ्यांना घडविणारे, समाजाला दिशा देणारे आणि राष्ट्रीय कार्यात नेहमी अग्रभागी असणारे शिक्षकच 'तंबाखुमुक्त शाळा' करु शकतात. निरोगी, सुदृढ, व्यसनमुक्त आणि बलशाली भारत घडवू शकतात.
घरांघरात स्वच्छतेचा,
मंत्र उच्चारला जावा..!
शाळांमधून आरोग्याचा
पाढा वाचला जावा..!!
तंबाखूमुक्तीचा धडा,
रोज गिरविला जावा..!
व्यसनांवर वरवंटा,
रोज फिरविला जावा..!!
आता शिक्षकांना जबाबदारी घ्यावी लागेल, मनापासून योगदान द्यावे लागेल, आणि तंबाखुमुक्त शाळा करावी लागेल. यासाठी शिक्षकांनी शाळेत 'तंबाखू नियंत्रण समिती' ची स्थापना करावी. गावात रॅली काढून जनजागृती करावी, व्याख्याने आयोजित करावीत. शालेय स्तरावर विद्यार्थी किंवा हौशी कलाकारांच्या मदतीने तंबाखुविरोधी पथनाट्ये सादर करावीत. शाळेत वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आयोजित कराव्यात. शाळेच्या 100 यार्ड परिसरात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ विकणे, सेवन करणे, धूम्रपान करणे कायद्याने गुन्हा आहे, असे फलक लावावेत. तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रत शाळेत ठेवावी. शाळेत 'तंबाखुचे दुष्परिणाम' दाखविणारे पोस्टर्स लावावेत. शाळेच्या आरोग्य उपक्रमात तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा समावेश करावा.
दर तीन महिन्याला तंबाखू नियंत्रण समितीची आढावा बैठक घ्यावी. व्यसन सोडणाऱ्या, व्यसन सोडण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या, प्रोत्साहन देणाऱ्या, तंबाखुमुक्त शाळा करण्यासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षक, पालक, समाजसेवक आणि विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार करावा. तंबाखू नियंत्रणासाठी नियुक्त केलेल्या राज्य सल्लागार प्रतिनिधी, वैद्यकीय अधिकारी यांची वेळोवेळी मदत घ्यावी. मार्गदर्शन घ्यावे. तंबाखू विरोधी संदेश शालेय साहित्य, रजिस्टर्सवर डकवावेत. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ 'तंबाखुमुक्त शाळा' असा फलक लावावा.
तंबाखुच्या व्यसनाने.. शरीर खंगते, मन भंगते आणि जीवन दुभंगते..!
म्हणून...
तंबाखू आणि धूम्रपान सोडा,
शुद्ध, मोकळा श्वास घ्या..!
व्यसन सोडा, आरोग्य जोडा,
सुखी जीवनाचा ध्यास घ्या..!!
■■■■■
नाव - श्री राजेंद्र भिमराव गिते
हुद्दा - उपशिक्षक
पत्ता - जि.प.प्राथ.शाळा रस्तापूर
पो.सुर्डी ता.बार्शी जि. सोलापूर
मो.नं -9881131509
Email - rajendragite8891@gmail.com
■■■■■