मंगळी..!
मंगळी..!
सोलापूर, बार्शीहून - बीड, औरंगाबादकडं जाताना सगळ्या गाड्या, बसगाड्या सरमकुंडी फाट्यावर थांबतात. तिथं मिळणारे कुंथलगिरीचे पेढे सुप्रसिद्ध आहेत. जे हॉटेल मालक ड्रायव्हर - कंडक्टरच्या चहापाण्याची, नाष्टा, जेवणाची खास सोय करतात, गाडी तिथंच थांबते. प्रवासीही उतरतात. चहापाणी करतात. पेढे खातातही आणि पार्सल घेतातही. अख्या महाराष्ट्रात कुंथलगिरीचे पेढे न खाल्लेला माणूस शोधूनही सापडायचा नाही. दुधापासून खवा आणि खव्यापासून तयार केलेल्या तिथल्या पेढ्यांना राज्यभर मागणी आहे. त्यात कंदी पेढे, मलाई पेढे, मावा पेढे असे कितीतरी प्रकार. वाशी, कुंथलगिरी, सरमकुंडी परिसरातील लोकांना या उद्योगानं बरकत दिली आणि मोठी प्रसिद्धीही दिली.
खूप वर्षांपासून आमच्याही गावात दुधापासून खवा तयार करण्याचा धंदा जोरात चालू आहे. त्यातच तीस वर्षापूर्वी पुण्याच्या एका मोठ्या व्यापाऱ्यानं गावात जागा घेऊन खवा तयार करण्याची भट्टी सुरु केली. उत्तर प्रदेशातल्या एका विश्वासू माणसावर तिथंली सगळी जबाबदारी सोपवली. त्यानंही मालकाचा विश्वास सार्थ ठरवत खव्याचा धंदा टिकवला आणि वाढवलाही. त्यामुळं आमचं राजेगाव बीड जिल्ह्यातलं खव्याचं प्रमुख केंद्र बनलं. पण दळणवळणाच्या साधनांचा अभाव आणि बाजारपेठ उपलब्ध नसल्यानं खव्यापासून पदार्थ बनवून विकणं जसं सरमकुंडीकरांना जमलं तसं आम्हाला जमलं नाही. परिसरातील सगळा खवा आमच्या गावात गोळा केला जातो आणि स्पेशल वाहनांनं रोज पुण्याला पाठवला जातो.
आमच्या घरीही खव्याची भट्टी होती. आमच्या कुटुंबाचा प्रमुख आधारच. दुष्काळ किंवा नैसर्गिक आपत्तीच्या काळातही आमच्या घराचा डोलारा कोसळला नाही तो खव्याच्या भट्टीमुळेच.
मी लहान असताना आमच्या घरी दुधासाठी म्हशी असत. दादा-आबांनी कितीतरी म्हशी घेतल्या, मायेनं सांभाळल्या, पिळल्या आणि विकल्याही. आमच्या कायम लक्षात राहिलेल्या म्हशी म्हणजे मंगळी आणि लाडकी. लाडकीपेक्षा मंगळी थोडी मोठी होती, शरीरानं आणि वयानंही.
मंगळी छोट्या हत्तीसारखी दिसायची. तिचं पोट डबरं आणि पाठ लांबरुंद होती. सुट्टीच्या दिवशी आम्ही मंगळीच्या पाठीवर बसूनच सगळ्या गुरांना आणि त्यांच्या रेडकांना चारायला घेऊन जायचो. मंगळी सावकाश चालायची, त्यामुळं लहान मुलंही तिच्या पाठीवर बिनधास्त बसायची. तिची शिंगं पीळदार आणि खाली जमिनीकडे वळलेली होती. त्यामुळं ती भुंडी दिसायची. तिला टक्कर खेळायला किंवा शिंगांनी मारायला जमत नव्हतं. एखादेवेळी खूपच चिडली तर फक्त डोक्यानं ढुसण्या दयायची. चरताना किंवा खुराक खाताना तिची शिंगं जमिनीला खरडायची. खरं तर शिंगांचा तिला त्रास व्हायचा पण इलाजही नव्हता. मंगळीला खायला पण खूप लागायचं. कितीही खायला घातलं तरी मंगळीचं पोट आणि मन कधीच भरायचं नाही. दिवसभर चरुन आली तरी गोठ्यात दावणीला बांधल्यावरही खायला शोधायची. गोठ्याच्या बाजूलाच एक लहान खोली होती. तिला दरवाजा नव्हता. आम्ही त्या खोलीत भट्टीतून निघालेलं लाकडाचं कोळसं ठेवलं होतं. मंगळी अधूनमधून दावं तोडून कोळसं खायची. एवढंच नाही, रांजण आणि माठाची खापरंही खायची. कधी कधी तिला चामड्याच्या वहाणा चघळतानाही आम्ही पाहिलं होतं. त्यात तिला काय चव सापडली होती? तिलाच माहीत.
लाडकी दिसायला देखणी होती. हाडापेरानं भरलेली आणि मजबूत बांध्याची. शिंगेही कशी डौलदार... खिल्लाऱ्या खोंडासारखी. बघाताक्षणी मनात भरावी इतकी सुंदर, म्हणूनच तिचं नाव लाडकी ठेवलं असेल कदाचित.
मंगळी आणि लाडकी गुण्यागोविंदानं राहायच्या. कधी भांडणं नाही की कधी मारामारी नाही. एका टोपलीत खुराक दिला तरी दोघी मिळून खायच्या. टोपली टोपली खुराक खायच्या आणि बादली बादली दूध दयायच्या. संगतीनं राहायच्या आणि सोबतीनं जगायच्या. दोघी वेगवेगळ्या घरातून आल्या पण एक होऊन गेल्या. कुणाला सख्या बहिणी वाटल्या तर कुणाला जिवलग मैत्रिणी.
आबांचा म्हशींवर खूप जीव होता. त्यांचं बोलणं म्हशींना थोडंतरी समजत असावं. कारण आबांनी, "मंगssळी य्य..." म्हणून बोलवलं की मंगळी यायची. मागं मागं लाडकीही यायची. मग आबा त्यांच्या दोन्ही शिंगांच्या मध्ये, मानेला खाजवत, त्याही हाताला चाटत अगदी, तोंडाला फेस येईपर्यंत. मुक्या प्राण्यांना आपण जितका जीव लावू ते व्याजासह परतफेड करतात.
लाडकीच्या दुधाचा खवा केला जायचा आणि मंगळीचं दूध खायला. तिचं दूध कसं घट्ट आणि चवदार होतं. दूध कसलं... अमृतच. संध्याकाळी सगळ्यांनी दूध खायचंच असा जणू नियमच होता. चुलीवर चांगलं गरम केलेलं मंगळीचं दूध पितळी ताटात घ्यायचं. टरारुन फुगलेली ज्वारीची भाकरी त्यात कुस्करायची आणि पोट भरेपर्यंत दुधकाला ओरपायचा. ती मज्जा काही औरच होती.
आम्हाला आठवडी बाजार नांदूरचा. स्थानिक दुकानांबरोबरच चौसाळा, नेकनूर, केज, कळंबचे व्यापारी आपापली दुकानं बाजारात थाटतात. आसपासच्या वीस पंचवीस खेड्यातील लोकांचा हा सगळ्यात मोठा बाजार. बाजारात जशी सगळ्या प्रकारची दुकानं तशीच सगळ्या प्रकारची माणसंही. कुणी हौसे, कुणी गवसे आणि बाकीचे संसारी. आठवडाभर राबून बायकोनं कमावलेल्या पैशांवर मंगळवारी हौशांची मौज होते, बाजाराची पिशवीही धड घरापर्यंत येत नाही. कष्ट न करता गवसे मजा करतात आणि बाजारही करतात. संसारी मात्र आठवडाभराची कमाई इमाने-इतबारे आपल्या कुटुंबासाठी खर्च करतात.
बाजारामुळं शाळेला मंगळवारी दुपारी सुट्टी असायची. कधीमधी आम्ही बाजाराला जायचो. बाजारात आमची उठबस नागू भोयाच्या हॉटेलात असायची. नागू भोई कळंबचा. नांदूरच्या बाजारात पाल उभा करायचा, शेवचिवडा तयार करुन आणायचा. भजी आणि जिलेबी तिथंच तयार करायचा. पालात बाजूलाच बसून खायला जागा असायची. मग काय? बाजारात गेल्या गेल्या शेवचिवड्यासोबत गरमागरम भजी आणि जिलेबीचा बेत भारी व्हायचा.
एके दिवशी नागू भोई आबांना म्हणाला, "मला दुधासाठी म्हैस घ्यायची आहे. तुमच्याकडं खात्रीच्या म्हशी आहेत. तर मला तुमच्याकडचीच एक म्हैस दया." आबा राजी झालं नाहीत. मग नागूनं दादांना गळ घातली. हो-नाही करता करता सौदा झाला. लाडकी नागूला विकली. भरल्या दावणीवरची लाडकी गेली. मंगळीच्या जीवाची जिवलग मैत्रीण गेली. मुक्या प्राण्यांचं मन माणसांना कधी कळत नाही आणि कळलं तरी माणूस त्यांना छळायचं थांबवत नाही.
मंगळी आणि लाडकीची ताटातूट झाली. मैत्री तुटली. मैत्री तुटताना आवाज तर होत नाही पण हृदयाला किती जखमा होतात? सांगताही येत नाही. डोळ्यांच्या धारा दिसतील पण मनाचं रुदन दिसेल काय...?
मंगळी आणि लाडकीच्या मैत्रीच्या सुरील्या तारा जुळल्या होत्या की जीवनधारा जुळल्या होत्या? ते त्या दोघींनाच माहीत. मंगळीचा मुका जीव जेव्हा उन्हात बसून शून्यात पहायचा... तेव्हा त्याचा अर्थ तरी कसा शोधायचा?
अर्थही कळला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. लाडकीच्या विरहानं मंगळी झुरणी लागली होती. हळूहळू तिनं अन्नपाणी कमी केलं होतं. दिसेल ते खाणारी मंगळी ओला चारा, खुराकही खाईना, सोन्यासारख्या घासाकडंही पाहिना.
दुधाच्या धारा आधीच आटल्या होत्या. आता डोळ्यांच्या धाराही थांबल्या. लाडकी गेल्यानंतर तीन महिन्याच्या आत मंगळीनं जीव दिला. मंगळीनं मैत्रीखातर जीवाची कुर्बानी दिली. मंगळी अमर झाली. लाडकीनं तरी दुसरं काय केलं असेल?
◆◆◆◆◆