आमची आमराई..!!

   आमची आमराई..!!
                  (भाग -२)

   उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे जल्लोष असायचा. आंब्याला पाड लागायला सुरुवात व्हायची. आम्ही मुलं फक्त झोपण्यापुरतंच घरी यायचो. उजाडलं की आंब्याखाली. पहिलं काम पाड गोळा करायचं. तीन हिस्से करायचे, आम्हाला दोन भाऊला एक.
   चांगला पाड लागला की आंबे उतरायचे. खूप आंबे यायचे. खाली - वर उसाचं पाचट घालून आंबे पिकू घालायचे. घरात पाय ठेवायला जागा राहायची नाही. घरभर अढी लागायची.आठवड्याभरात आंबे रसाला यायचे. मग काय? कुठंही हात घाला हाताला सोनंच लागायचं..!

  घरात जागा झाल्याशिवाय दुसरा आंबा उतरता येत नव्हता. मग पाड खूप पडायचे. रोज पोतं-पोतं पाड पडायचे. दिवसभर पाड खायचे, खाताना रस हातावरुन ओघळून शर्टावर पडायचा. तोंड शर्टाच्या बाहीला अन हात चड्डीला पुसायचे. कपडे बघण्यासारखे व्हायचे.. एकदम कडक ! संध्याकाळी पुन्हा रस. नको नको व्हायचं. हे कमी की काय आजी उरलेला रस प्यायला द्यायची. नको म्हणलं की म्हणायची, "एवढीच वेळेस पी गं माय, उद्या नाही देत." 

    आम्ही रसाचे आंबे विकायचो, भरपूर पैसे मिळायचे. बाकीचे आंबे लोभातील माणसांच्या घरी वाटायचो. तसा अर्धा गाव लोभाचाच होता म्हणा..!
   आमच्या आंब्याकडं आलेला माणूस आम्ही कधीच रिकाम्या हाताने जाऊ दिला नाही. तरीही चांगला आंबा उतरायला उशीर झाला की भुरटे चोर लक्ष ठेवून डाका घालायचे. हो डाकाच. आमचे रसाचे आंबे सोन्या-नाण्यायेक्षा कमी नव्हते..!

  एका वर्षी मोठी खैर झाली. मी चौथी- पाचवीला असेन. साखऱ्या उतरायचा आला होता. गावातला आंबा उतरणारा आला होता. दादा आबा त्याला मदत करत होते. ते दोघे एकाच फांदीवर होते, मीही मागून त्याच फांदीवर गेलो, आंब्याचं ओझं आणि आमच्या तिघांचं ओझं, फांदीला सोसलं नाही, अचानक फांदी मोडली. खालच्या फांदीवर आदळली, आम्ही तिघेही खाली पडलो आणि वरुन ती फांदी अंगावर पडली. भरदिवसा देव दिसले, डोळ्यांपुढे काजवे चमकले. मुका मार लई लागला, पण मोडतोड झाली नाही.

  कधी-कधी शेताचे बांध, जनावरे आणि आंबे यावरुन बायामाणसांची चकमक व्हायची, ठिणग्या पडायच्या. भांडणं विकोपाला गेली की एकमेकांचं बोलणं बंद व्हायचं. दोन्ही घरातलं आंब्याकडं कोणी फिरकत नसे. सगळ्या झाडाखाली आंब्याची परपंड व्हायची. येणाऱ्या जाणाऱ्यांची चंगळ व्हायची. तीन-चार वर्षांतून असा प्रसंग यायचाच.

   भाऊ समजदार होते, आमच्या घरात दादा शांत, संयमी होते आणि आबा जरा तापट होते पण तिघा भावात विचार होता.    
    1990 साल असेल. जोरदार भांडणं झाली. उचल-पटक झाली, परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी तिघा भावांची बैठक झाली आणि जे व्हायला नको होतं तेच झालं. भांडणाचं खापर आंब्यावर फोडून उभी झाडंच तोडायचं ठरलं. झाडं भांडणं लावतात काय? कुणी सांगायचं?

    केजचा व्यापारी आला, सौदा झाला आणि उभ्या झाडांची कत्तल सुरु झाली. संकटकाळात ज्या झाडांनी आम्हाला आधार दिला, ज्या झाडांच्या मागं आम्ही लपलो त्या झाडांच्या बुंध्यावरच आम्ही घाव घातला. ज्या झाडांच्या अंगाखांद्यावर आम्ही खेळलो, बागडलो, हसलो, रडलो ज्यांच्या सावलीत आम्ही वाढलो, त्यांच्याच अंगावर आम्ही कुऱ्हाड चालवली. ज्या झाडांच्या सावलीत पंगती झडल्या, ज्या झाडांच्या सावलीत मैफली सजल्या, ज्या आंब्याच्या झाडांनी आम्हाला सावली दिली, फळं दिली, आनंद दिला, बरकत दिली, आमचे संसार उभे केले त्यांचाच आम्ही खून केला.

   पंधरा दिवसांत होत्याचं नव्हतं झालं...

 सौभाग्यनं नटलेलं आमचं शेत रंडकं-बोडकं झालं. हिरवागार शालू नेसलेल्या शेतीच्या कपाळावरचं ठसठशीत कुंकू गेलं. आमच्या शिवाराचं वैभव गेलं..!

  तीस वर्षे झाली, आजही शेतात गेलं की पोटात गोळा येतो, काळजाला चरे पडतात. दिसेल त्या झाडाला कवटाळून मोठ्यानं ओरडावं वाटतं, मनातलं सगळं सांगावं वाटतं. ज्यांनी झाडं तोडली त्यांचे खांदे गदगदा हलवून त्यांना विचारावं वाटतं, "झाडं तुम्ही लावली नव्हती मग तोडली कशी? 

           ◆◆◆◆◆
         ...श्री.राजेंद्र गिते,बार्शी.

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य