सुटका..!!

     सुटका..!

     2011 ची गोष्ट. त्यावेळी आम्ही शाहूनगर मध्ये राहात होतो. शाहूनगर म्हणजे शहरालगत झालेली शंभरावर घरांची नवी वस्ती. घरासमोरील अंतर्गत रस्त्यानं सरळ जावून उजवीकडे वळलं की शहारातून आलेला व कमलादेवीच्या मंदिराकडे जाणारा रस्ता लागतो.  बायपास क्रॉस केला की समोरच कमलाभवानीचं भव्य मंदिर. आमचा तर तो नित्याचाच रस्ता होता. देवीच्या दर्शनाला, सकाळी फिरायला किंवा गावी जायचं असेल तरी याच रस्त्यानं जावं लागे.

   रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी ठरावीक अंतरावर नगर पालिकेनं झाडं लावली होती. त्यात कुठं चिंचेची तर कुठं जंगली झाडं होती. या देवीच्या रस्त्याला लहानमोठी पंधरा वीस तरी चिंचेची आणि तितकीच लिंबाची झाडं असतील. या झाडांच्या सावलीनं कितीतरी लोकांना आसरा दिला, कितीतरी लोकांना कामधंद्याला लावलं आणि त्यांचे संसार उभे केले.

   अशाच एका चिंचेच्या मोठ्या झाडाखाली दोन भावांनी वडापाव चा धंदा सुरु केला. भाऊ भाऊ चवदार वडे बनवत. एक गणेश आणि दुसरा संतोष. दोन्ही भावांच्या बोलण्यात आणि वागण्यात नम्रता असल्यानं धंदा तेजीत चालायचा. डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर असेल तर धंद्यात कोणीही यशस्वी होईल..!

 दुसऱ्या एका झाडाखाली चहा आणि मिसळचं छोटसं हॉटेल होतं. मोकळ्या वेळात आम्ही काही शिक्षक तिथं बसायचो. हळूहळू आमचं चहा पिण्याचं आणि एकमेकांना भेटण्याचं ते प्रमुख  ठिकाण  बनलं, चिंचेखाली ते हॉटेल असल्यानं आम्ही गमतीनं त्याला 'चिंचोका हॉटेल' म्हणायचो. पुढं त्याला हेच नाव पडलं. घरापासून अगदी जवळ असल्यानं टाईमपास म्हणूनही खूप वेळा मी इथं बसायचो. मित्रांसोबत चहा व्हायचा, गप्पा व्हायच्या आणि एकमेकांची सुखदुःखही कळायची.

    घराकडं जायच्या रस्त्याला वळणावर चिंचेचं आणखी एक छोटंच पण डेरेदार झाड होतं, पाडाला आलेल्या चिंचांनी झाड लगडून गेलं होतं. जाता-येता सहज हातांनी तोडता येतील अशा चिंचा लोकांनी तोडल्या आणि खाल्ल्या. आता खालच्या फांद्यांना चिंचा राहिल्या नव्हत्या. भंगार गोळा करणारी मुलं पिकलेल्या चिंचा झाडावर चढून काढत आणि शुक्रवारी बाजारात किंवा फडीवर विकत. मोसमात कधी कधी त्या मुलांना भंगारापेक्षा चिंचा विकून जास्त पैसे मिळत. यातूनच त्या मुलांना झाडावर चढून चिंचा काढण्याची व विकून पैसे मिळवण्याची लालच लागली.

    अनेक वेळा गल्लीत भंगार गोळा करताना पाहिल्यामुळं दोन तीन मुलांचे चेहरे ओळखीचे झाले होते. ज्या वयात शाळेत जायचं, हसत-खेळत शिक्षण घ्यायचं, रुसायचं-फुगायचं, हट्ट पुरवून घ्यायचे त्या वयात या मुलांचा जगण्यासाठी संघर्ष सुरु होता.

 एकदा मला गल्लीत पाण्याच्या, कोल्ड्रिंक्सच्या रिकाम्या बाटल्या, पत्र्याचे डबे, लहान मोठे पाईप असं भंगार सामान गोळा करताना एक मुलगा दिसला. मी सहज चौकशी केली. ऐकून खूप वाईट वाटलं. तो मधू होता. उड्डाण पुलाच्या बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये राहायचा. जेमतेम नऊ वर्षांचा असेल. दोन वर्षांपूर्वी तो दुसरीला असताना त्याची आई कॅन्सरनं गेली, आणि त्याच्या वडिलांचं व्यसन वाढलं. चौथीत शिकणाऱ्या सखूची आणि मधुची परवड सुरु झाली. घरकामाची जबाबदारी सखुवर आणि घर सावरण्याची जबाबदारी मधुवर पडली. सखू घरातील धुणी-भांडी आणि स्वयंपाक करायची तर मधू भंगार गोळा करायचा.

 जबाबदार माणसं बेजबाबदार वागायला लागली तर विनाश कुणी रोखायचा?

   वडील काम शोधण्यासाठी सकाळीच जेवणाचा डबा हातात घेऊन चौकात उभं राहायचे. काम मिळालं तर करायचे नाही मिळालं की तंद्रीत दिवसभर घरी झोपायचे.
   कधी कधी बिगारी काम मिळायचं. कामावरुन सुटताना मजुरी मिळायची, मग त्यांचा मुक्काम बाहेरच असायचा. अशा नाजूक परिस्थितीत आणि कठीण प्रसंगात कोण कुणाला सावरीत होतं? हेच कळत नव्हतं.

     शनिवारचा दिवस होता. सकाळची शाळा आटोपून मी घरी जात होतो. दुपारच्या बारा वाजल्या असतील. घराकडं जाताना त्या चिंचेच्या झाडाजवळ चपला दिसल्या. बाजूलाच भंगार सामानाची झोळी ठेवलेली होती. आसपास कुणीच दिसेना म्हणून मी बाजूला गाडी उभी केली. इकडं तिकडं पाहिलं, तरीही कुणी दिसेना. झाडाजवळ गेलो. मान वर करुन पाहिलं. झाडाच्या शेंड्याकडं एक मुलगा दिसला. मधुच होता तो. मी हाका मारल्या. फांद्या बाजूला सारुन नीट पाहिलं. चिंचा काढण्यासाठी गेलेला मधू झाडातून गेलेल्या लाईटच्या तारेला चिकटला होता. करपलेला शरीराचा सांगाडा झाडाला तसाच लटकत होता. मधू.. मधू.. म्हणून कितीतरी हाका मारल्या. मधू काहीच बोलला नाही. तो शांत आणि निवांत झाला होता. त्याला आता काहीच ऐकू येत नव्हतं. 

मधुच्या जगण्याचा संघर्ष आता संपला होता. मृत्यूनं त्याची 'सुटका ' केली होती. सुरेश भट म्हणतात, 
"मरणाने केली सुटका, 
   जगण्याने छळले होते". 
         मधुचं तसंच झालं.

            ◆◆◆◆◆
           श्री राजेंद्र गिते, बार्शी
    
    
  

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य