गळफास..!!

गळफास..!!
साधु-संतांची ही भूमी,
माणसंही साधी भोळी !
झगडणं.. दुष्काळाशी,
कोरलं का? त्यांच्या भाळी !!

जीव होतो कासावीस,
चैत्र आणि वैशाखात ! 
भेगाळून जाते माता,
आग लागे काळजात !!
पाणी शोधीत शोधीत,
घार हिंडते आभाळी..
झगडणं...

येता भरून आभाळ,
आनंदून जाते माती !
बिया घेऊन पोटात,
भरी कणसात मोती !!
ऐन भरात सुगीच्या,
कसा येतो? अवकाळी..
झगडणं...

हाती घेऊनि कोयता,
ज्याने ओलांडल्या वेशी !
घाव घालूनी घालूनी,
लढला जो दारिद्र्याशी !!
रीन फेडूनी नव्यानं,
भाग्य लिहितो कपाळी..
झगडणं...

सरकारी.. सावकारी,
आवळले जिथे फास !
ज्याला सोसेना मुजोरी,
लावितो तो गळफास !!
किती करावा आकांत,
नाही ऐकू जात हाळी..
झगडणं...

           ◆◆◆◆◆
           राजेंद्र गिते, बार्शी.

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य