योद्धा..!!
योद्धा...!
~~~~~
कोव्हीड -19 विरुद्ध लढा,
मा.मुख्यमंत्री
उद्धवसाहेब ठाकरे
"संघर्ष जितना कठीण होता है
जीत उतनी ही शानदार होती है!"
'चंद्र आणि मंगळावर जीवन शोधणारा माणूस आज पृथ्वीवर स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी तडफडतोय'. कोरोनानं संपूर्ण जगालाच वेठीला धरलंय. दुर्दैवाने आपल्या देशावर आणि महाराष्ट्र राज्यावरही कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होतो आहे. शासनाची आणि प्रशासनाची झोप उडाली आहे. पोलीस, डॉक्टर्स, आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून लढत आहेत. आरोग्यमंत्री मा. राजेश टोपे साहेब स्वतःच्या आईचं दुखणं बाजूला ठेवून मैदानात उतरले आहेत. मा.मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचं तर कर्तृव आणि नेतृत्व पणाला लागलं आहे... पण उद्धवजी...
"झेंडा भल्या कामाचा
तुम्ही घेऊन निघाला...
काटंकुटं वाटांमधी,
बोचतील तुम्हाला...
रगत निघल,
तरी बी हसल,
शाबास त्येची..!
तुम्ही चाला पुढं,
तुम्हाला गड्या...
भीती कशाची,
पर्वा बी कुणाची..!"
प्रबोधनकार ठाकरे यांच्या 'क्रांतिकारी विचारसरणीचा वसा' आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हिंदुत्ववादी विचारांचा वारसा' ज्यांनी आजपर्यंत समर्थपणे जपला, त्याच उद्धवसाहेब ठाकरेंनी मराठी माणसांच्या न्याय आणि हक्कासाठी लढणाऱ्या सेनेचं शिवधनुष्यही समर्थपणे पेललं.
बाळासाहेबांच्या आचार-विचारांचा प्रचार आणि प्रसार करताना ज्यांनी कधीही तत्त्वांशी तडजोड केली नाही, त्याच उद्धवसाहेबांनी बाळासाहेबांच्या नंतरही शिवसेना टिकवली आणि वाढवली. 'त्यामुळे लढणं त्यांच्या रक्तातच आहे'. शिवसेना संपली म्हणणाऱ्यांना त्यांनी संपवलं आणि महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा... ही बाळासाहेबांची इच्छाही त्यांनी पूर्ण केली..!
आमदारकी पाठीशी नसताना आणि प्रशासन चालविण्याचा अनुभव गाठीशी नसताना उद्धवसाहेब थेट 'महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री' झाले. सत्तेवर येताच राज्यातील शेतकऱ्यांचं दोन लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करुन त्यांनी कामाची दिशाही स्पष्ट केली पण अचानक कोरोनाची महामारी आली...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विरोधात 22 मार्च 2020 ला 'जनता कर्फ्यू' घोषित केला. दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'महाराष्ट्रात लॉकडाउनचं रणशिंग फुंकलं' आणि नेतृत्वाची दूरदृष्टी देशाला दाखवून दिली.
"खुल जायेंगे सभी रास्ते
रुकावटों से लड तो सही
सब होगा हासिल...
तू जिद पर अड तो सही"
हाच बाणा अंगी घेवून आणि...
दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रचंड आत्मविश्वास आणि संकटाला थेट भिडण्याची तयारी ठेवून उद्धवसाहेबांनी जनतेला कोव्हीड-19 विरुद्ध लढण्यासाठी बळ दिलं.
'तुम्ही खबरदारी घ्या.. आम्ही जबाबदारी घेतो..!' असं सांगत कोरोनाची धास्ती घेतलेल्या जनतेला सरकार खंबीरपणे पाठीशी उभं असल्याची खात्री दिली. लोकांनी स्वतःची काळजी कशी घ्यावी? ते मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी जनतेशी संवाद साधून आणि स्वतःच्या कृतीतून दाखवून दिलं. उद्धवजींच्या वागण्यातील आणि बोलण्यातील 'खरेपणा, प्रामाणिकपणा आणि साधेपणा' लोकांना अधिक भावला.
कोरोनाविरोधातील लढा अधिक आक्रमकपणे लढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील नामवंत आणि तज्ञ डॉक्टर्सचा 'टास्क फोर्स' तयार केला. राज्यभरातील कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना हॉटलाईनच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यासाठी या टास्क फोर्सचा उपयोग केला.
"घरातच रहा - कोरोनाला हरवा" असा संदेश देणारे जॅकेट घालून नागरिकांमध्ये जनजागृती करणाऱ्या कोव्हीड योध्यांची फौजही मुख्यमंत्र्यांनी उभी केली. महामारीच्या संकटकाळात या योध्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता समाजासाठी मदतकार्य केलं.
महाराष्ट्रासारख्या मोठ्या आणि प्रगत राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतरही उद्धवसाहेबांच्या वागण्या-बोलण्यात कुठंही अहंकार दिसला नाही की दिमतीला मोठा फौजफाटा दिसला नाही. त्यांनी कामाच्या खोट्या जाहिरातीही केल्या नाहीत आणि विरोधकांचा द्वेषही केला नाही. कोरोना संसर्गाचा ठपका विशिष्ट समाजावर ठेवला जात असताना सर्व समाज बांधवांचं आणि त्यांच्या नेत्यांचं नेतृत्व करण्याचं कौशल्यही त्यांनी पार पाडलं. त्यावेळी अवघ्या महाराष्ट्राला दिसलं ते 'त्यांचं साधं राहणं, स्पष्ट बोलणं...'
विनाकारण घराबाहेर पडू नका. तोंडाला मास्क लावा. सॅनिटाईजरचा वापर करा. 'सोशल नाही तर फिजिकल डिस्टन्सिंग पाळा'. घाबरुन जाऊ नका, दुखणं अंगावर काढू नका, काही त्रास होत असेल तर डॉक्टरांना दाखवा... काळजी करु नका, पण काळजी घ्या हे त्यांनी वारंवार लोकांना सांगितलं, आणि कोरोनाचा समूह संसर्ग होण्यापासून महाराष्ट्राला वाचवलं...! यातून सगळ्यांना राज्याचे मुख्यमंत्री आपल्या 'कुटुंबाचेच एक सदस्य' वाटले
मागील तीन-चार महिन्याच्या काळात कोव्हीड -19 शी लढताना कुठल्याही पोकळ पॅकेजची घोषणा आणि बोगस आकड्यांचा खेळ न करता त्यांनी आरोग्याच्या प्रत्यक्ष सोयी, सुविधा उभ्या करण्यावर भर दिला. राज्यात केवळ दोन ठिकाणी असलेल्या कोरोना चाचणी केंद्राची संख्या 77 पर्यंत वाढवली. आयसोलेशन हॉस्पिटल्स केवळ तीन होते ते अडीच हजार केले आणि त्यातील बेड्सची क्षमताही अडीच लाखापर्यंत वाढवली. तसेच संपूर्ण राज्यात ICU ची सुविधा देणारे बेड्सही फक्त 250 होते, ते आता 8500 इतके केले.
वेगवेगळ्या जिल्ह्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील मजूरांसोबतच परप्रांतीय मजूरांनाही आहे त्याच ठिकाणी थांबायला सांगून त्यांच्या खाण्यापिण्याची आणि औषधपाण्याची सोय केली. परंतु हाताला काहीच काम नसल्याने मजूरांना आपापल्या गावी जाण्याची ओढ लागली. कोरोना विरुद्धची लढाईही इतक्यात संपणारी नाही, हे लक्षात येताच लॉकडाउन चे नियम शिथील करुन राज्यातील जवळजवळ साडेपाच लाख मजूरांना ST बसने त्यांच्या गावापर्यंत सुरक्षित सोडलं. परराज्यातील 11 लाख मजूरांना केंद्र सरकारच्या मदतीने रेल्वेतून त्यांच्या त्यांच्या राज्यात धाडलं. उत्तर प्रदेशातील मजूरांनी त्यांच्या राज्यात सुरक्षित पोचल्यावर "उद्धव ठाकरे... जिंदाबाद" च्या घोषणा दिल्या, तेव्हा कुठलाही दुजाभाव न करणारं उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व उजळून निघालं.
रेशनकार्ड असणाऱ्यांना आणि नसणाऱ्यांनाही जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला. तसेच शिवभोजन थाळीची किंमत दहा रुपयांवरुन पाच रुपये केल्यामुळं अडचणीच्या काळात गोरगरिबांना खूप मोठा आधार मिळाला आणि सरकारला जनतेचे आशीर्वाद मिळाले...
मधल्या काळात राज्यात कोरोना सोबतच विरोधकांनीही कहर केला. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात मुख्यमंत्र्यांना अपयश आल्याचा ठपका ठेवून आंदोलन केलं. आमदार नसल्यानं मुख्यमंत्री पदही धोक्यात आलं. या सगळ्या काळात उद्धवसाहेबांनी विधानपरिषद निवडणूक बिनविरोध करताना दाखविलेला संयम आणि कौशल्यानं हाताळलेली परिस्थिती त्यांची राजकीय परिपक्वता सिद्ध करणारी होती.
कोरोनाशी लढा चालू असतानाच निसर्ग वादळानं कोकण किनारपट्टीच्या काही भागाला तडाखा दिला. NDRF च्या मदतीनं ठाकरे सरकारनं लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं. त्यामुळं वित्तहानी झाली पण जीवितहानी टळली. वादळ शमल्यानंतर लगेच आदित्यसाहेबांना सोबत घेऊन कोकणचा पाहणी दौरा केला. कोकणवासीयांच्या घरांचं आणि फळबागांचं प्रचंड नुकसान झालं होतं. त्यांना पुन्हा उभं करण्यासाठी तात्काळ 100 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. कठीण काळात लोकांना हात जोडून विनंती करणारे आणि कोकणच्या जनतेवर जिवापाड प्रेम करणारे 'एक हळवे मुख्यमंत्री' अवघ्या देशानं पाहीले.
नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धवसाहेब ठाकरे यांनी पाचवं स्थान मिळवलं. तेव्हा, "लोकप्रियतेत माझा नंबर येण्यापेक्षा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचं राज्य करणं हेच ध्येय आहे." असं नम्रपणे सांगून त्यांनी राज्यातील जनतेशी असलेली बांधीलकी दाखवून दिली. अवघ्या सहा महिन्यांत घेतलेली ही गरुडझेप प्रत्येकाला अभिमान वाटणारी आहे, आणि उद्धवजींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणारी आहे.
वेळ लागेल पण संकटाचे हे दिवसही जातील. *एक ना एक दिवस महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकाचं राज्य नक्की बनेल. कारण महाराष्ट्रात सक्षम नेतृत्व आहे ते... मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं, आणि म्हणूनच वाटतं...
"अभी तो इस बाँज की
असली उडान बाकी है...
अभी तो इस परिंदे का
इम्तिहान बाकी हैं...
अभी अभी तो इन्होंने
लांघा समुंदर को
अभी तो पूरा
आसमाँ बाकी हैं..!"
'उद्धवसाहेब ठाकरे यांच्या दमदार कर्तृवाला, खंबीर नेतृत्वाला... आणि त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नाला... मनापासून सलाम..!!'
मा.उद्धवजी,
महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी आई तुळजाभवानी तुम्हाला उदंड, निरोगी आयुष्य आणि शक्ती देवो..!
तुम्हाला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा...!!!
~~~~~~~~~~~~~~~~~
श्री.राजेंद्र गिते,बार्शी.