स्मृतिगंध..!
स्मृतिगंध..!!
वासोट्याच्या वाटेवर त्या,
कास पठारी तळे होते.!
जागोजागी लाल, हिरवे,
स्ट्रॉबेरीचेच मळे होते.!!
डोंगर, दऱ्या, कडे, कपारी,
वनराजीने खुलली होती.!
दुर्मिळ फुले सुकलेली पण,
मने मात्र फुलली होती.!!
डोंगराच्या छातीवरती,
बंगला होता भारलेला.!
आभाळाच्या पंखांखाली,
तंबू होता उभारलेला.!!
सागराच्या कुशीमधली,
रात्र कशी क्षणात सरली.!
आठवणींची लाट मात्र,
प्रत्येकाच्या मनात उरली.!!
निळी निळाई शिवसागराची,
पाण्यामधला प्रवास होता.!
निळे डोंगर, जंगल, झाडी,
रसिकांचा सहवास होता.!!
लाटांवरती स्वार बोट ती,
जाई खाली, येई वरती.!
मन पाखरु घेई भरारी,
आनंदाला येई भरती.!!
वाट चढाची, व्याघ्रगडाची,
आधाराला काठी होती.!
गाळण झाली भल्याभल्यांची,
साथ एकमेकांसाठी होती.!!
शिवमंदिर, हनुमान मूर्ती,
राजवाड्याचे अवशेष होते.!
बाबूकड्याचे उंच कातळ,
निसर्ग सौंदर्य विशेष होते.!!
पायांमध्ये भरे कापरे,
उतरताना नकोच घाई.!
संयमाची खरी परीक्षा,
नजर हटता, तोल जाई.!!
मावळतीच्या रंगांसोबत,
अंगांमधला शीण विरला.!
दोन दिसांची साथ-संगत,
त्या स्मृतींचा गंध उरला.!!
◆◆◆◆◆
-- राजेंद्र गिते, बार्शी