लॉकडाउन.. संधी की क्षती !

लॉकडाउन.. संधी की क्षती..!
~~~~~~~~~~~~~~~

वक्त से लडकर..
जो नशीब बदल दे,
इन्सान वही..
जो अपनी तकदीर बदल दे!
कल क्या होगा..
कभी मत सोचो,
क्या पता कल..
'वक्त' खुद अपनी तसवीर बदल दे!

  चिनी लोकांच्या विचित्र जीवन पद्धतीमुळे 'कोरोना व्हायरस 2019' (कोव्हीड 19) हा 'संसर्गजन्य रोग' निर्माण झाला. संपर्कामुळे संसर्ग वाढला आणि बघता बघता हा रोग जगभर पसरला.

    लोक भयभीत झाले.. लाखो बाधित झाले.. हजारो मृत्युमुखी पडले. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला 'जागतिक महामारी' घोषित केले, तेव्हा.. 
चंद्र आणि मंगळावर जीवन शोधणारा माणूस पृथ्वीवरील अस्तित्व टिकवण्यासाठी तडफडू लागला.

  फेब्रुवारी-मार्चच्या सुमारास कोरोना भारतात आला. शासनाची झोप उडाली, प्रशासन हतबल झाले, कोरोनावर कोणतीही लस उपलब्ध नसल्याने लोकांमध्ये दहशत निर्माण झाली.

   कोव्हीड 19 च्या संसर्गापासून वाचण्यासाठी "गर्दी टाळणे" हाच एकमेव उपाय दिसला. 
म्हणून शासनाने सगळा देश लॉकडाऊन केला.

   सण उत्सवावर बंदी आली, वाहनांना जिल्हाबंदी आणि माणसांना संचारबंदी केली. लग्न, समारंभावर मर्यादा आल्या आणि अंत्यसंस्कार तर परस्पर झाले.

   शाळा, कॉलेजेस बंद केले. कंपन्या, कारखाने बंद झाले.. कामगार बेरोजगार झाले. उद्योग बंद पडले, धंदे बुडाले, मजुरांचे रोजगार गेले.. छोटे व्यावसायिक उध्वस्त झाले.. हातावर पोट असणारे उपाशी मरू लागले..
 नाइलाजास्तव सगळे गावी आले.

   परराज्यातील कामगारांचे आणि मजुरांचे तर अतोनात हाल झाले..
'जमेल तसे' तेही आपापल्या राज्यात गेले.

     भारत 'मेक इन इंडियातून स्वयंपूर्ण' आणि 'डिजिटल इंडियातून कॅशलेस' होत होता. महाराष्ट्राची परिवर्तनाकडे दौड चालू होती.. भारताची जागतिक महासत्तेच्या दिशेने घौडदौड चालू होती. कोरोना गतिरोधक बनला. सगळे व्यवहार ठप्प झाले..
 गतीचे चक्र आणि प्रगतीचे अर्थचक्र थांबले.
पण..

अंधाराची कितीही युगे आली तरी, माणूस प्रकाशवाट शोधीत असतो..!

आत्ताही तेच झाले..

   पोलीस, डॉक्टर्स, आरोग्य अधिकारी आणि सफाई कर्मचारी यांनी जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा केली, करीत आहेत.

   शासनाने लोकांना धीर दिला, खंबीरपणे पाठिशी उभे राहिले. गर्दी करु नका.. सोशल डिस्टन्स पाळा. मास्क घाला.. सॅनिटायझरचा वापर करा. नियमित हात धुवा..
 "घरीच राहा.. सुरक्षित राहा"
 वेळोवेळी अशा सूचना दिल्या.

    लोक घरी थांबल्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी घडल्या. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे.. मोजकी साधनं आणि कमी पैशांत माणसं जगायला शिकली. मद्य, तंबाखू, गुटखा यांवर बंदी केल्यामुळे अनेकांनी व्यसनं सोडली. लग्न, सण, उत्सव आणि महोत्सवावरील अनाठायी खर्च व अनावश्यक लोकांची गर्दी कमी झाली.
 "मानवाच्या जगण्यात आणि वागण्यात शिस्त निर्माण झाली."

   वायु प्रदूषण थांबलं.. हवा शुद्ध झाली. ध्वनी प्रदूषण कमी झालं. पाणी प्रदूषण कमी झालं. इतर आजारांचे प्रमाण घटलं. अपघाताचे प्रमाण घटलं, गुन्हेगारी कमी झाली. 
कोरोनावर विजय मिळविणाऱ्यांनी नव्याने जीवन स्टार्ट केलं तर प्रदूषण घटल्याने सगळं जगच रिस्टार्ट झालं.

"कोरोनाने मानवाला घरात लोटलं आणि निसर्गाची साफ सफाई केली."

   या काळात लोकांनी मनसोक्त आराम केला. कुटुंबाला भरपूर वेळ दिला, त्यामुळे कौटुंबिक स्नेह, जिव्हाळा वाढला. एकोपा निर्माण झाला. काही जणांनी वाचन केलं, लेखन केलं. कला जपल्या, छंद जोपासले. आवडीचे पदार्थ शिकण्याचा.. करण्याचा आणि खाण्याचा आनंद घेतला. वेळेअभावी वर्षानुवर्षे अपूर्ण राहिलेल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण केल्या.

संकटं नेहमीच आपल्या सोबत संधी घेऊन येत असतात..!

   कंपन्या, कारखाने बंद होते.. पण कर्मचारी 'वर्क फ्रॉम होम' करीत होते. झूम, गुगल मीट च्या माध्यमातून बैठका घेत होते. चर्चासत्रे, मेळावे आयोजित केले जात होते. शाळा बंद होत्या.. पण ऑनलाइन शिक्षण चालू होते.
 योग्य ती खबरदारी घेऊन सर्व व्यवहार केले जात होते.

आता.. 
टप्याटप्याने देश अनलॉक होत आहे. जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मोठमोठे कारखाने, कंपन्या सुरु होत आहेत.. उद्योग धंदेही पुन्हा सुरु केले जात आहेत.. त्यांना कुशल कामगारांची गरज आहे. तेव्हा.. 
प्रशिक्षित, सुशिक्षित बेकार, तरुण - भूमिपुत्रांनो..

"हीच वेळ आहे.."

संकटात संधी शोधण्याची.!
आपले नशीब घडविण्याची..!!
आणि आत्मनिर्भर बनण्याची...!!! 

"आपली कला दाखवा.. कौशल्य पणाला लावा.. आणि संधीचं सोनं करा".

   मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक अशा 'मोठ्या शहरात छोटा उद्योग' करणारे परप्रांतीयही आता नाहीत..
 
तिथेही आपला उद्योग-धंदा सुरु करा आणि स्वयंपूर्ण बना".

   लॉकडाऊन मुळे क्षती तर अगणित  झाली, पण अनेक क्षेत्रात रोजगाराच्या संधीही निर्माण झाल्या आहेत. 
भारत 'तरुणांचा देश' म्हणून ओळखला जातो. लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या संधी तरुणांनी शोधायला हव्यात.. तरच देश घडेल..पुढे जाईल आणि डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांनी पाहिलेलं "महासत्तेचं" स्वप्न पूर्ण होईल. यासाठी तरुणांना एकच संदेश द्यावा वाटतो..

खुल जायेंगें सभी रास्ते
 मुश्कीलों से लड तो सही |
  सब होगा हासिल...
   तू जिद पर अड तो सही |

            ■■■■■
            राजेंद्र गिते, बार्शी
   

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य