रस्तापूरची शाळा..!!

       रस्तापूरची शाळा

   27/2 च्या जी.आर.नुसार 2018 ला माझी रस्तापूर ला बदली झाली. मे महिन्याच्या अखेरीस काशीद सरांसोबत शाळेला हजर व्हायला निघालो. बार्शीहून जेमतेम पंधरा किलोमीटरवर, निसर्गाच्या कुशीत आणि पानगावच्या मुशीत रस्तापूर वसलेलं आहे. भोवतालच्या लहान-मोठ्या टेकड्यांत लपलेलं गाव अगदी जवळ जाईपर्यंत दिसलं नाही. रस्त्याच्या डाव्या बाजूला दिडशेच्या वर पक्की घरं, मधूनच वळणं घेत सुर्डीकडं जाणारा डांबरी रस्ता, आणि उजव्या बाजूला मोठी टेकडी सपाट करुन उंचावर बांधलेली शाळा गावच्या सौंदर्यात भरच घालते. रस्त्यानं येणारे-जाणारेही शाळेचं हे देखणं रुप पुन्हा पुन्हा वळून पाहतात.

     शाळेसमोर मुलांना मुक्तपणे खेळता येईल, हुंदडता येईल एवढं भव्य मैदान. शाळेच्या पाठीमागे आणि मैदानाच्या सभोवती असलेली जंगली झाडं  सगळ्यांना सावली देतात तर पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला लावलेली फुलझाडं शाळेत येणाऱ्यांचं मोकळ्या मनानं स्वागत करतात. आधीच्या शिक्षकांनी जपलेलं आणि वाढवलेलं हे सौंदर्य डोळ्यात साठवीत मी शाळेत प्रवेश केला आणि औपचारिकपणे हजर झालो. शाळेचं बाह्यांग जसं आकर्षक होतं तसंच अंतरंगही सुंदर होतं. शाळा द्विशिक्षकी होती. दुसऱ्या शिक्षिका श्रीम.सुवर्णा चव्हाण मॅडम आठवडाभर आधीच शाळेला हजर झाल्या होत्या.

   उन्हाळ्याची सुट्टी संपली. नवीन शाळेतील पहिला दिवस. मुलंही अनोळखी असली तरी चुणचुणीत आणि बोलकी होती. साफ-सफाई झाली. परिपाठ चालू होता, अचानक गावची पंधरा-वीस कर्ती सवरती माणसं शाळेत आली. आमचा यथोचित सत्कार केला. श्रीकर काका म्हणाले, "आपली शाळा *अ* श्रेणीत आहे, शाळेतील मुलांची गुणवत्ताही चांगली आहे, ती टिकवण्याची जबाबदारी आता तुमची आहे." अध्यक्ष सचिन बरबडे यांनीही, "शाळेचा लौकिक वाढेल असं काम करण्याचं आवाहन केलं. आम्ही शंभर टक्के योगदान देण्याचं आणि शाळेची गुणवत्ता कायम ठेवण्याची ग्वाही दिली.
शाळेला गावाचा आधार
  गावाला शाळेचा अभिमान
असंच काहीसं चित्र जाणवत होतं.
  
   जुलै महिना उजाडला. अधूनमधून पाऊस बरसत होता, टेकड्यांच्या अंगाखांद्यावरुन पाणी खळखळत खाली येत होतं. सगळ्या टेकड्या हिरव्यागार झाल्या होत्या आणि झाडांनाही नवी पालवी फुटली होती. सगळा परिसर सौंदर्यानं नटला होता. आपण कोकणात तर नाही ना? असंच वाटत होतं.
शाळा आमची आहे किती छान
    आम्ही रोज शाळेत जाणार
सगळं कसं गाण्याच्या या ओळीप्रमाणे चालू होतं.

   एके दिवशी प्रकाशनाना पालकर सर्व मुलांसाठी छत्र्या घेऊन आले. छत्र्या वाटप केल्या आणि 15 ऑगस्टला 'शाळेला टी. व्ही. देतो', असं म्हणाले. नाना निरक्षर असले तरी शिक्षणप्रेमी आहेत, मुलांचा त्यांना खूप लळा आहे. ते पुण्यात रहायचे, मिळेल ते काम करायचे, मिळालेल्या पैशातून पोटाला चिमटा घेऊन थोडेफार पैसे शिल्लक ठेवायचे आणि काही कामानिमित्त गावी येताना मुलांसाठी काहीतरी आणायचे. नाना रिकाम्या हातानं शाळेकडं कधीच आले नाहीत.

   रस्तापूर तसं धार्मिक गाव. दररोज पहाटं मंदिरात मोठ्या आवाजात लावलेली भक्तीगीतं प्रत्येकाच्या मनाला ताजंतवानं करतात तर तिन्हीसांजेचे अभंग भक्तीभाव निर्माण करतात. एकादशीला रात्रभर हरिनामाचा जागर होतो आणि द्वादशीला भजनी मंडळींसाठी पंगत असते.

    श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा तर गावानं 25 वर्षांपासून जपली. हा सप्ताह म्हणजे सगळ्या गावाचा उत्सवच. काकडा आरती, ज्ञानेश्वरी पारायण, भजन-कीर्तन आणि टाळ-मृदुंगाच्या गजरानं गावातलं सगळं वातावरण मंत्रमुग्ध होतं. सगळे एकत्र येतात, चर्चा करतात, एकत्र झटतात आणि एकत्र जेवतात. लोकांची ही एकी आणि आपुलकी पाहून रस्तापूर एखाद्या अभेद्य किल्ल्यासारखं भासतं. त्यात विद्यार्थी आणि शिक्षकही सामील असतात. भक्तीचा आणि आनंदाचा हा सोहळा कधी संपूच नये, असं सगळ्यांनाच वाटतं.

    सप्ताहाच्या काळात चहा वाटपाचं काम नानाकडं असतं. एका हातात भला मोठा चहाचा थर्मास आणि दुसऱ्या हातात कप घेऊन नाना दिवसभर सगळ्यांना चहा वाटतात. चहा घेऊन नाना शाळेकडं येताना दिसल्यावर मुलं ना...ना, ना...ना असा घोष करतात, तेव्हा नाना चहा वाटतात का आनंद हेच कळत नाही.

   गेल्या वर्षी आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी आम्ही पालखी सजवली. मुलामुलींची वारकऱ्यांच्या रुपात गावातून दिंडी काढली. सगळ्या गावात उत्साह संचारला. गावकऱ्यांनी नेटकं नियोजन केलं. रुक्मिणी झालेली नम्रता साजिरी दिसत होती, तर विठ्ठल झालेला ओमराज गोजिरा दिसत होता. टाळ, मृदुंगाचा ताल आणि अभंगाचे बोल ऐकून "पाऊल खेळणं" सुरु झालं तेव्हा केंद्रप्रमुख पवार साहेबांनाही वारकरी होण्याचा मोह आवरला आला नाही.

   मुलांना व्यवहारज्ञान व्हावं म्हणून आम्ही बाल आनंद बाजार भरवला. मुलांनी आपापल्या शेतातील फळं, भाज्या, भाजीपाला विक्रीसाठी मांडला. ज्यांच्या शेतात काहीच नव्हतं त्यांना पालकांनी भजी, भेळ, मिसळ, वडापाव, पाणीपुरी असे पदार्थ बनवून दिले. लोकांनी उत्स्फूर्तपणे खरेदी करुन मुलांना प्रोत्साहन दिलं. आपल्या मुलांचं कौतुक आधी आपण करावं मग जग करतं. आपल्या गावचा बाजार पहायला नाना पुण्याहून आले. किती ही गावाची ओढ. "जन्म दिला त्या भूमीचा आणि शिक्षण दिलं त्या शाळेचा अभिमान बोलून नाही तर कृतीतून दिसायला हवा," नाही का?

    दैनंदिन अध्यापनाबरोबरच शालेय आणि सहशालेय उपक्रमही आम्ही राबविले. पहिलीच्या मुलांनी शाळेत प्रवेश घेतले, तेंव्हा आम्ही त्यांना बैलगाडीत बसवलं. ढोलताशांच्या गजरात त्यांची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढली, तेव्हा जन्मदात्या आईवडीलांच्या अंगावर मूठभर मांस चढलं. संक्रांतीनिमित्त महिला मेळावा आयोजित केला. शाळेतील मुलामुलींबरोबरच महिलांच्या विविध स्पर्धा घेतल्या. प्रजासत्ताकदिनी सर्वांना बक्षिसं दिली. त्यासाठी सरपंच, उपसरपंच, तंटामुक्तीचे अध्यक्ष, पोलीस पाटील यांनी मोठं योगदान दिलं.

    स्वातंत्र्यदिन असो की प्रजासत्ताक दिन. मुलांसाठी खाऊ किंवा शैक्षणिक साहित्य घेऊन गावातील लोकांची पाऊलं आपसूकच शाळेकडं वळतात. रिकाम्या हातानं शाळेकडं कुणीही येत नाही. स्टेजवर मुलांनी गाणं, डान्स किंवा नाटक सादर केल्यानंतर टाळया वाजवून प्रेरणा दयायला व बक्षीस देऊन कोडकौतुक करायला कुणालाही सांगावं लागत नाही.

   मेजर आजिनाथ मगर सीमेवर ड्युटी करत होते तरी त्यांनी पत्नीला सांगून शाळेसाठी खुर्च्या भेट दिल्या. आपल्या मुलाची खाजगी शाळेची फी वाचली म्हणून मनोज पालकर यांनी शाळेला अँड्रॉइड टी. व्ही. भेट दिला. प्रत्येक वर्गातील पहिल्या तीन विद्यार्थ्यांना सरपंच दादासाहेब बरबडे यांनी रोख बक्षिसं दिली. नानांनी अजून स्वतः साठी घरी साधा रेडिओ घेतला नाही परंतु मुलांना शिकता यावं म्हणून शाळेला स्मार्ट टी.व्ही. घेऊन दिला. अभ्यास करुन थकवा आल्यावर मुलांना मनाच्या हिंदोळ्यावर झुलता यावं यासाठी नानांनी मैदानात लोखंडी झोके बसविले. आता मुलं झोके घेतात, का नानांचं मन? हेच समजत नाही. शाळेतील बाळगोपाळांच्या आनंदात आपला आनंद शोधणाऱ्या नानांनी पत्नीची आठवण म्हणून मैदानात घसरगुंडी बसवून घेतली,  तेव्हा नानांची आर्थिक परिस्थिती किती घसरली ते नानांनाच ठाऊक. आपल्या आयुष्याचं गाणं कितीही भेसूर झालं तरी चालेल पण आपल्या शाळेतील मुलांचे सूर जुळले पाहिजेत यासाठी नानांनी ब्लूटूथ ने अटॅच होणारा साऊंड शाळेला दिला.

   शनिवारचा दिवस होता. सकाळची शाळा होती. जेवणाची सुट्टी झाली होती. मी आणि नाना व्हरांड्यात बसलो होतो. नाना म्हणाले, "गुरुजी, मला मैदानातल्या त्या वारुळाजवळ 5×5 ची जागा देता का?" मी त्यांना कारण विचारलं तर म्हणाले, "एक बोअर घेतो मग मुलांना पिण्याचं पाणी मिळेल आणि पाण्यावाचून झाडं जळतात ते ही थांबेल.
   मी म्हणालो, "नाना, आता तुम्ही थांबा, शाळेतील मुलांसाठी तुम्ही खूप केलं, तुमची कमाई तरी किती? आता तुमच्या मुलांसाठी काहीतरी करा."
    आपल्या दोन्ही मुलींच्या गुणांचं कौतुक करताना न थकणारे नाना भावूक झाले. त्यांच्या दोन्ही डोळ्यांत पाणी तरळलं. मी नानांकडं पहात होतो, नाना काहीच बोलत नव्हते.
    गावोगावी कितीतरी नाना असतील, परंतु "आमच्या रस्तापूरचे नाना लाखात एक आहेत."

      ...श्री.राजेंद्र गिते,बार्शी.
===================

   
    

          

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य