बोली भाषेतील खजिना..!
मा.अरुण स्वामी सर, नातेपुते..
एक व्यासंगी आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व. बोली भाषेत वापरात असलेले शब्द, वाक्प्रचार आणि म्हणी यांची व्युत्पत्ती कशी झाली? याबद्दल सखोल अभ्यास करुन 'दैनिक तरुण भारत' मध्ये 'बोली भाषेतील खजिना' या नावाने लेखन करतात. त्यांच्या १०० भागांना एकत्र गुंफण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न...
बोली भाषेतील खजिना..!!!
नातेपुतेच्या 'पंचक्रोशी' त,
अरुणोदय झाला..!
बोली भाषेतील खजिना,
'चव्हाट्या' वर आला..!!
"अडगळीतील शब्द" ,
झाले होते 'फरार'.
"मूग गिळून गप्प" होते,
'हुद्देदार' 'मामलेदार'.
'पाखंडी' च्या "मुसक्या आवळून",
"थंडा फराळ" केला..!
बोली भाषेतील...
'पांढरपेशां' ची "मोट बांधून",
"दुःख वेशीला टांगले".
'कफल्लक', 'पाताळयंत्री' च्या,
"दारात हत्ती बांधले".
'डांबरट', "सोम्या - गोम्या" ला,
"कात्रजचा घाट दाखवला"..!
बोली भाषेतील...
"गंजीवरचा कुत्रा",
"रसातळाला गेला".
'मलिदा' खाणारा,
"जेरबंद केला".
'अंगणात' 'सुंदोपसुंदी',
पण शाबूत 'बालेकिल्ला'..!
बोली भाषेतील...
"बाजार बुणग्यांचे",
"कपाळ पांढरे झाले".
'काबाडकष्ट' करणारांचे,
"उखळ पांढरे झाले".
"घोडा मैदान मारणारा",
"वखार लुटून" गेला..!
बोली भाषेतील...
"गावातल्या ढ" चे,
"तेल गेले, तूप गेले".
'अतिशहाण्या' चे,
"दिवाळे निघाले".
'अवडंबर माजविणाऱ्यांना",
"शालजोडी" तून हाणला"..!
बोली भाषेतील...
"शिंक्याचे तुटले की,
बोक्याचे फावते".
"मांजर आडवे गेले" की,
अफवांचे "पेव फुटते".
"शेंडी तुटो वा पारंबी",
"पेच नाही" त्याला..!
बोली भाषेतील...
"बाजारात तुरी" तरी,
'घिसाडघाई' करतो.
"गुडघ्याला बाशिंग" बांधून,
का "जीव भांड्यात पडतो"?
"सासर' वास करणाराचा,
सुफडा साफ झाला..!
बोली भाषेतील...
'टवळा' आणि 'टवळी',
"थेरडा आणि थेरडी".
'मणेरी' 'तांबोळी' ला,
घातली "अंगडी टोपडी".
'इरसाल', 'पोतराज',
"पाप्याचं पित्तर" झाला..!
बोली भाषेतील...
'कडदोरा', 'जिरेटोप',
"पुराणातील वांगी".
'बंडी' ची झाली,
कशी 'बाराबंदी'.
"भालदार - चोपदारांनी",
"गाशा गुंडाळला"..!
बोली भाषेतील...
'डबोलं', "घे वाजवून",
'पिपाणी' झाली दीन.
'खुर्द' असो की 'बुद्रुक',
"पळसाला पाने तीन".
"पेडगावचा शहाणा",
'काशी' ला गेला..!
बोली भाषेतील...
"कानामागून आली,
अन तिखट झाली".
"झाकली मूठ,
सव्वा लाखाची झाली".
"भ्रमाचा भोपळा",
आता फुटून गेला..!
बोली भाषेतील...
'गौडबंगाल' कळेना,
"श्रीखंड कुठून आले".
"जानवस घरी", भरलेले,
'भगुणे', "छप्पन पाहिले".
"रान उठवले" तर,
'सुक्काळीचा' भ्याला..!
बोली भाषेतील...
"पायरी ओळखून वागले",
तर 'रहाटगाडगे' चालते.
"बाजीराव म्हणा" च्या थाटाने,
"शुक्लकाष्ठ मागे लागते".
"लंकेच्या पार्वतीचा",
त्यांनी 'दाखला' दिला..!
बोली भाषेतील...
'टांकसाळ' दिसताच,
"डोळ्याचे पारणे फिटते".
"अठरा विश्व दारिद्र्याची",
"घटका भरते".
'निरक्षीरविवेकाने',
'डोलारा' उभा केला..!
बोली भाषेतील...
◆◆◆◆◆
शब्दांकन - राजेंद्र गिते,बार्शी.