आमची आमराई..!

     आमची आमराई..!
                 (भाग - १)
   
  परवा सकाळी सकाळीच मित्राचा फोन आला. आंबे आणायला यायचं का? हापूस आलाय गांधी स्टॉपला, साढेचारशे रुपये डझन....
   अक्षय तृतीयेला घरोघरी आमरस आणि पुरणपोळीचा बेत असतो. पुरणपोळी म्हणजे शाकाहारींची मेजवानीच. मी दोन दिवस आधीच तजवीज केली होती. दोन किलो लालबाग आणला होता. पण म्हणलं चला, हापूस आहे तर घ्यावा एक डझन.
  आम्ही गेलो, लोकांची बऱ्यापैकी गर्दी होती. एक एक डझनाचे बॉक्स पॅकिंग केलेले होते. आमचा नंबर येईपर्यंत मी आणखी दोन मित्रांना फोन करुन विचारलं. त्यांच्यासाठीही दोन बॉक्स घेतले.
     मिक्सरमध्ये रस बनवला. रस गोड व्हावा म्हणून पिठी साखर मिसळली.... आई, आजी रस करायच्या तेंव्हा कुठं होता मिक्सर. त्या आंबे धुवून घ्यायच्या. हातानं पुन्हा-पुन्हा पिळायच्या. चरख्यात ऊस पिळावा तसं. जीव ओतला जायचा. रसही गोड व्हायचा..! 

  गावाकडे शेतात आमची आमराई होती. एका ओळीत पाच मोठी मोठी झाडं होती. झाडं इतकी मोठी होती की आसपासच्या दहा गावात अशी झाडं नव्हती. ठरावीक अंतरावर खोडं असल्याने झाडांची दूरपर्यंत सावलीच सावली. झाडं मोठी आणि डेरेदार असल्यानं सावली अशी पडायची की जणू ए सी लावलाय. जेवण करुन दुपारी झोपलेल्या माणसाला घरी जायच्या सुमारास हलवून उठवावं लागायचं. 

  खोडं दिसायची पाच पण त्यात खरी झाडं होती अकरा. आमच्या आजोबा-पणजोबांनी झाडं लावताना एका एका जागी तीन तीन वेगवेगळ्या कोया लावल्या. त्यामुळे कुठं दोन तर कुठं तीन झाडं जगली त्यांची खोडंही एकजीव होऊन वाढली, सख्ख्या भावासारखी. झाडं एकमेकांच्या आधाराने मोठी झाली, उंच गेली. फांद्या एकमेकांत गुंतल्या आपल्या नात्यासारख्या..!
  पण झाड वेगळं तसा फळाचा आकार वेगळा, गंध वेगळा, चवही वेगळी आणि चवीनुसार नावही वेगळी. तीन तीन झाडं एकजीव होऊन वाढली आणि मोठीही झाली. झाडांना जमलं ते माणसांना जमेल?

   आम्ही वडिलांना दादा म्हणायचो. चुलत्यांना आबा म्हणायचो. दादा-आबा सख्खे भाऊ. राम लक्ष्मणासारखी जोडी. साठी ओलांडली, तरी भाऊ-भाऊ एकत्र रहायचे. घरात लहानमोठी दहा बारा माणसं. सगळं गाव नाव घ्यायचं.
   वडिलांना आणखी एक सावत्र भाऊ होते. सगळे त्यांना भाऊ म्हणायचे. ते वेगळे राहत. त्यामुळं शेतीच्या वाटण्या झाल्या, पण आंबे समाईकच राहिले. त्यात आमच्या म्हणजे दादा-आबाच्या शेतीच्या वाटणीत दोन खोडं आली. त्यात पाच आंब्याची झाडं. एकात तीन दुसऱ्यात दोन. भाऊंच्या शेतात तीन खोडं गेली त्यात आंब्याची सहा झाडं.
   आमच्या शेतातील पहिल्या खोडात तीन झाडं होती. साखऱ्या, खारक्या आणि गोटी. साखऱ्या साखरेसारखाच गोड. रसाला नंबर एक. खारक्याचा कधीच रस खायला मिळायचा नाही. त्याला मोजकेच आंबे येत. न्याहरी करताना सगळे आवर्जून त्याच्या कैऱ्या खायचे. तिसरी होती गोटी. तिला साखऱ्यातली गोटी म्हणायचे. ती गोटी जरा अशी-तशीच होती.
  दुसऱ्या खोडात दोन झाडं होती. गेळ्या आणि काळू. गेळ्याच्या रस एकदम मधासारखा घट्ट. गोडही तसाच. अकरा आंब्यात आवर्जून रस खावा असे जे तीन आंबे होते त्यात हा दुसरा. काळू आकाराने सगळ्या आंब्यात मोठा. रंगानेही जरासा काळाच, चवीलाही जेमतेमच.

  भाऊंच्या शेतातील पहिल्या खोडात तीन झाडं होती. चपऱ्या, नांगऱ्या आणि गोटी. चपऱ्या जरा चपटा, म्हणून त्याचं नाव चपऱ्या ठेवलं असावं. रसासाठी चपऱ्या खास. नांगऱ्या मध्यम आकाराचा पण त्याचा खालचा भाग पोपटाच्या चोचीसारखा दिसे. त्याचे आंबे शक्यतो लोणचं घालायला वापरत. तिसरी गोटी, ही चपऱ्यातली गोटी. आकाराने जरा लहानच. चोखून खायला भारी वाटायची.

 आंबे चोखून खाण्याची मजा काही औरच असते, आता ज्यांना आंबे चोखून खायला मिळतात ते भाग्यवानच..!

   दुसऱ्या खोडात दोन झाडं. छोटा काळू अन लाल्या. काळूत काही विशेष नव्हतं पण लाल्या देखणा दिसे. वरील अर्धा भाग लालसर होता, देठापर्यंत. त्यामुळं बघताक्षणी नजरेत भरायचा. नुसताच दिसायला देखणा, चवीला मात्र जेमतेम.
  शेवटचं झाड एकटंच, भाऊंसारखं. झाड सगळ्यात गोल आणि डेरेदार. खूप सुंदर दिसायचं. त्याला आंबेही खूप यायचे. पण आंबा आकाराने लहान आणि चवही आंबट. त्याचं नावही गोटीच.

              ◆◆◆◆◆

              ... राजेंद्र गिते, बार्शी.
              
    

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य