म्हाताSSरं व्हा..!!
म्हाताSSरं व्हा..!!
सगळ्या दिल्लीची तहान भागवून यमुना नदी अलाहाबादेत गंगेला मिळते, आमची यमुना आजीही तशीच. दोन मुलं आणि दोन मुलींची लग्न होईपर्यंत आजोबांनी आजीला साथ दिली, आणि आजोबा अचानक गेले, पण आजी डगमगली नाही. दादा आबांच्या संसाराचा वेल व्यवस्थित गगनाला लावला, आणि मगच तिनं डोळे मिटले.
2013 ला आम्ही बार्शीतच राहात होतो. आजी गेल्याचा निरोप रात्री उशिरा मिळाला. मग सकाळी सकाळीच गावी निघालो. डोळ्यांपुढं आजी दिसत होती आणि मनातही आजीचेच विचार होते...
आजीला आम्ही सगळे 'बाई' म्हणायचो. 2011 ला दादा गेल्यापासून बाईनं हायच खाल्ली होती. मधल्या काळात तिची एक लेक म्हणजे आमची जनाआत्या गेल्याचं दुःख ही तिनं पचवलं, पण दादा गेल्यानं तिचा धीर सुटला. आतल्या आत ती झुरणी लागली. शरीरानं आणि मनानं खचत गेली,
"कुठं लपलास?..
"तुझा मुडदा बशीवला..!"
"मला का नेलं नाहीस?"... असं म्हणून देवाला शिव्या दयायची.
अखेर देवानं तीचं ऐकलं, आणि तिला घेऊन गेला.
बाई लेकीबाळींना जसं जपायची तसंच सूना आणि नातसूनांनाही जपायची. आम्हा सगळ्या नातवंडांवर तर तिचा लई जीव.
मंगळवारी नांदूरचा आठवडी बाजार भरायचा, तो आजही भरतो. दादा, आबा दर आठवडी बैलगाडी घेऊन बाजाराला जायचे. नागू भोयाच्या हॉटेलातून शेवचिवडा, जिलेबी, भजी आणायचे. केळीही न चुकता आणायचे. बाई जेवताना सगळ्यांना थोडा थोडा खाऊ दयायची, जे जेवायला नाहीत त्यांच्यासाठी काढून गाडग्यात घालून ठेवायची.
आम्ही सख्खे, चुलत भाऊ बीडला शिकायला असताना घरी काही चांगलं चुंगल खायला केलं की बाई आमच्यासाठी काढून ठेवायची. आठ पंधरा दिवसांनी आम्ही गावी आलो की आम्हाला द्यायची.
बाईजवळ एक पिशवी असायची, कमरेला खोचलेली. त्या पिशवीला तीन-चार कप्पे असायचे. घराच्या चाव्या, चार चार घड्या करुन ठेवलेल्या पाच-दहा रुपयांच्या नोटा, एखादा-दुसरा बिब्बा, सुईदोरा, तपकिरीची डब्बी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेटीची चावी. इतकं सामान तर पिशवीत हमखास असायचं.
घरात एक मोठी पेटी होती. तिला जाडजूड कुलूप. पेटीची चावी पिशवीत असल्यानं बाई पिशवीला कुणाला हात लावू देत नसे. एकदा बाईच्या जवळ बसून विचारलं,
"बाई, पेटीत काय आहे ते सांगकी?"
बाई म्हणायची,
"काही नाही राजा, माझं किडूक मिडूक अन शे-पाचशे रुपये असतील."
मी पेटी उघडून बघण्याचा हट्ट धरला, बाईनी पेटी उघडून दाखवली. त्यात घराचे, जमिनीचे कागद, दोन नवी लुगडी, एक इरकल, थोडे दागिने होते, त्यात महत्वाचा दागिना म्हणजे तिची बोरमाळ. बाईचा बोरमाळीवर लई जीव .त्याकाळी बोरमाळ स्त्रियांचा महत्वाचा दागिना होता. नाकात नथ, कानात फुलं आणि गळ्यात बोरमाळ असलेल्या बाईचा रुबाब काही वेगळाच असायचा.
एकदा काही प्रापंचीक अडचणीमुळे दादांनी बाईची बोरमाळ मोडली. बाईचा जीव कशातच लागेना. महिन्या पंधरा दिवसाला दादाला म्हणायची,
"भिमा, माझी बोरमाळ कधी करतो? सांग??"
योगायोगानं त्या वर्षी भावाचं लग्न झालं. दादांनी बोरमाळ केली, तेव्हाच बाईचा जीव भांड्यात पडला.
पिशवीत कुठं काय ठेवलंय ते आपल्याला कधीच सापडायचं नाही पण बाई नेमकं काढून दयायची. कुणाला काही लागलं, सवरलं की बाईचा सुई अन बिब्बा तयारच. लहान मुलं लाडी-गोडी लावायला लागली की बाई पिशवीत हात घालून बरोबर एक किंवा दोन रुपये काढून त्याला देई. काही सामान-सुमान आणायला दुकानाला जायचं असेल तर बाई चाळून चाळून नेमकी नोट काढून द्यायची.
सगळी जिकडं तिकडं आपापल्या कामा-धंद्याला गेली की बाईची आणि तिच्या मैतरणींची मैफिल बसायची. तपकीरीचा एक एक बार व्हायचा आणि मग चर्चा रंगायच्या. एकटं असलं की बाई एकटक शून्यात पाहात बसायची. डोळ्याला पदर लावून एकटीच रडायची. तिनं नवरा आणि लेक गेल्याचं दुःखही गटागटा गिळलं, हिमतीनं संसार करुन दाखविला. पण दादा गेल्याचं दुःख पचवणं तिला जड जात होतं.
आम्हा सगळ्यांना जेवू घातल्याशिवाय बाई जेवत नसे. तिचं जेवण सावकाश असायचं. दातांनी बारीक चावून चावूनच घास पोटात घालायची. नव्वदी पार केली तरी बाईचा एकपण दात पडला नव्हता. बाई दातांना 'दातवन' लावायची, त्यामुळे तिचे दात काळे होते पण मजबूत होते. कानाला बाई अजून जशी तिखट होती तशीच डोळ्यांनीही तिला शेवटपर्यंत साथ दिली. इतकं वय झालं तरी बाईला कधी सलाईन नाही, इंजेक्शन नाही की गोळ्यांचा कोर्स नाही.
खूप दिवस आमचं कुटुंब एकत्रच होतं. त्यामुळं आम्ही सगळी सख्खी, चुलत भावंडं आणि बाई भट्टीच्या घरात झोपायचो. दुधापासून खवा तयार करण्याची भट्टी आमच्यात तीस वर्षे होती. ती भट्टी ज्या घरात होती, त्या घराला आम्ही "भट्टीचे घर" म्हणायचो. ओला सुका दुष्काळ असो की आणखी कुठलं नैसर्गिक संकट आमच्या आमराईनं आणि खव्याच्या भट्टीनंच आम्हाला तारलं.
कधी कधी रागात असलं की आम्ही तिला 'म्हातारे' म्हणायचो. लहान मुलं तर नेहमीच "म्हातारी बाई" म्हणून हाक मारायची. त्याचा तिला लई राग यायचा, मग वैतागून म्हणायची,
"तुम्हीबी व्हताल की म्हातारं, का आसंच राहताल?"
"म्हाताऱ्या माणसाला म्हातारं म्हणलं की राग येतो", हा सगळ्याच म्हाताऱ्या माणसांचा स्वभाव असतो काय?
कुणी कुठंही असलं तरी दिवाळी सुट्टीत एक आठवडा आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत महिनाभर सगळे एकत्र यायचे. सगळं घर गोकुळासारखं फुलायचं. नागपंचमी, महालक्ष्मी आणि पोळा या सणालाही सगळे जमायचे. घरी चार-आठ दिवस राहून परत निघताना आम्ही सगळे मोठ्या माणसांच्या पाया पडायचो, त्यावेळी बाई डोक्यावरुन, गालावरुन हात फिरवायची, तिच्या कानाजवळ हात नेऊन कडाकडा बोटं मोडायची अन आशीर्वाद दयायची, "म्हाताSSरं व्हा..!
ईठुबालाSS पावू दया..!!"
बाई मागच्या वीस पंचवीस वर्षांत शेतातही गेली नसेल. नेहमी घरीच असायची. घरचंच काम करायची. घरातलं किंवा जवळच्या नात्यातल्या कुणाचं लग्न-कार्य असेल तरच घर सोडायची. आज मात्र तिनं कायमचं घर सोडलं आणि ती देवाघरी गेली. पुन्हा परत न येण्यासाठी
...श्री.राजेंद्र गिते,बार्शी.
-------------------------------------------