चहा..!

चहा...!!
   ~~~~~~

   चहा म्हणजे तरतरीतपणा, चहा म्हणजे फ्रेशनेस, चहा म्हणजे शिणवटा, मरगळ घालवणारा, चहा म्हणजे भांडण मिटविणारा, चहा म्हणजे नाती दृढ करणारा, चहा म्हणजे काम फत्ते करणारा.

अशा माणसां - माणसांगणिक चहाच्या हजारो व्याख्या करता येतील, एवढा चहा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे. 

चला, तर मग...
आज आपण "चाय पे चर्चा" करुयात...

    सामान्य माणसाचा उत्साह, आत्मविश्वास वाढविणारे पेय म्हणून चहाकडे पाहिलं जातं. कोणीही आणि कधीही चहाचा आस्वाद घेण्याची ऑफर टाळत नाही, यातच चहाच्या "नंबर एकचं पेय" या अढळ स्थानाचं गुपित लपलेलं असावं.

    जगात सर्वप्रथम चहाचा "पेय" म्हणून आस्वाद घेण्यात आला तो चीनमध्ये. चिनी लोकांनी कित्येक वर्षे चहा बनविण्याची पद्धत, कला जगापासून लपवून ठेवली होती. कोणीही चिनी व्यक्ती इतर लोकांसमोर चहा बनवत नसे. ब्रिटिशांनी चिनी लोकांना अफूची सवय लावून व त्यांना व्यसनाधीनतेच्या खाईत लोटून चहाची आयात सुरु केली. परिणामी चीनमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाल्यावर ब्रिटिशांनी आपला मोर्चा भारताकडे वळवला.

   ब्रिटिशांनी भारतात चहा लागवडीला प्रोत्साहन दिलं आणि व्यापारी पद्धतीनं चहाची लागवड करायला शिकवलं. ईस्ट इंडिया कंपनीनेही आसाममध्ये मोठ्या प्रमाणावर चहाची लागवड केली.

  भारतात चहा लोकप्रिय व्हावा म्हणून ब्रिटिशांनी खूप प्रयत्न केले. 1840 मध्ये आसाम टी कंपनीने व्यावसायिक तत्वावर चहाचे उत्पादन, ब्रँडिंग, आणि विक्री करण्यास सुरुवात केली. त्यावेळी चहाचे ब्रँडिंग ब्रिटनच्या राणीकडून करण्यात आले. त्याचाच परिणाम म्हणून 1850 च्या दशकात भारतामध्ये चहा विक्रीचे प्रमाण झपाट्याने वाढलं. 

भारतातील चहा व्यवसायाला 172 वर्षांची परंपरा आहे.

    जगातील असा एकही देश नाही, जिथे भारताचा चहा घेतला जात नाही. उत्तम दर्जाच्या चहाचे उत्पादन भारतासोबत व्हिएतनाम, नेपाळ, बांग्लादेश, इंडोनेशिया, केनिया, मलेशिया, टांझानिया, आफ्रिका, चीन आणि श्रीलंका या देशात मोठ्या प्रमाणात होतं. 

   जगाच्या तुलनेत भारतात सर्वाधिक म्हणजे 13 हजार चहाचे मळे आहेत. त्यात 20 लाखांहून अधिक लोकांना रोजगार मिळाला आहे. चहा व्यवसायाची उलाढाल 11 हजार कोटींची आहे. यातून देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन प्राप्त होतं. चहाचे सर्वाधिक उत्पादन आसाममध्ये घेतले जातं.

आज १५ डिसेंबर,
   आंतरराष्ट्रीय चहा दिन.

   त्यानिमित्ताने हे "चहापुराण" तुम्हाला ऐकवलं जातंय, तेव्हा.. एक कप "फक्कड चहा" करा आणि तो चहा घेत घेत चहापुराण वाचा...

 चहा भारतीयांच्या जीवनात दुधात साखर मिसळावी तसा मिसळून गेला आहे! *चहा फक्त एक पेय नसून, माणसांना एकमेकांशी जोडून ठेवणारी संस्कृती आहे.* अबोल्याचे रूपांतर जवळीकीत करणारी, अनोळखी लोकांना मैत्रीत बांधणारी, श्रम परिहार करणारी अशी ही संस्कृती आहे.

 चहा करणे हे एक काम नसून तो एक सोहळा असतो! उत्तम, चविष्ट चहा करता येणं हे येऱ्यागबाळ्याचं काम नाही!! जो चहा पिताच मेंदू खडबडून जागा होतो, ब्रह्मानंदी टाळी लागते, असा चहा करण्याची कला फक्त काहीच लोकांच्या हातात असते.

    ह्या चहाच्या साथीने अनेकांना आपल्या आयुष्याचे जोडीदार सापडतात, टपरीवर "स्पेशल कटिंग" मारता मारता दुःख हलकी होतात आणि आयुष्यातल्या समस्यांवर उपाय सापडतात. चहा बहुसंख्य लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे.

     चहाने ऍसिडिटी होते, वगैरे सगळ्या अंधश्रद्धा आहेत! अस्सल चहाप्रेमी व्यक्तीला चहाने कधीच त्रास होत नाही. चहाने आपलं सगळं जग व्यापून टाकलंय आणि आपल्याला जगाशी जोडून ठेवलंय, असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.

    जगात पेयांमध्ये पाण्यानंतर चहाचा क्रमांक लागतो. आतातर चहा निव्वळ पेय राहिलं नसून चहाची तुलना अमृताशी केली जाते आहे. 'अमृततुल्य' म्हणून चहाप्रेमींची दादही मिळते आहे.

 पाणी, साखर घालून उकळत्या पाण्यात चहापावडर पडताच दरवळणारा चहाचा सुवास आपली सकाळ प्रसन्न करतो.

  वाफाळलेल्या चहाचा कप हाती आला की, नवा दिवस सुरु झाल्याची उभारी मिळते, आणि पहिला घोट घेताच सगळा आळस कुठल्या कुठे पळून जातो.

 आपण सगळे जो चहा पीत पीत मोठे झालो, तो ब्लॅक टी! हा चहा स्ट्रॉंग चवीचा असतो. आपल्याला हाच "कडक चहा" आवडतो. कडाक्याची थंडी असो की मरणाचा उकाडा, दूध व साखर घालून केलेला गरमागरम चहा बहुसंख्य लोकांच्या आवडीचा आहे. वूलाँग टी हा चिनी चहा आहे. व्हाईट टी, ग्रीन टी, हर्बल टी, ब्लूमिंग टी असे चहाचे आणखी काही प्रकार आहेत. अनेक प्रकारचे चहा एकत्र करून एक उत्तम चवीचा प्रीमियम चहा तयार करतात, त्याला "टी ब्लेंडस" म्हणतात. कट्टर चहाप्रेमी मात्र कडक चहाशिवाय दुसरं काही मिळमिळीत सहनच करु शकत नाहीत.

 मग राजेहो,
    वाट कसली बघताय?
ठेवा चहाचं आधण, आणि मित्रमंडळी किंवा कुटुंबाबरोबर घ्या फक्कड चहाचा आस्वाद!!

आंतरराष्ट्रीय चहा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..!

        ◆◆◆◆◆
        श्री. राजेंद्र गिते, बार्शी.
                 आधार - इंटरनेट.

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य