निबंध.. मुख्याध्यापक जबाबदारी !
माझ्या शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी..
माझी जबाबदारी !
इरादे नेक हो तो,
सपने भी साकार होते है !
अगर लगन सच्ची हो तो,
रास्ते भी आसान होते है !!
याचे उत्तम उदाहरण म्हणजे सोलापूर जिल्हा परिषदेचे कल्पक व कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी मा.दिलीप स्वामी साहेब !
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद होत्या. ऑनलाइन शिक्षण चालू होते, परंतु ग्रामीण भागात सोई सुविधांचा अभाव होता. तेव्हा 'गृहभेटी' व "पारावरच्या शाळेला" परवानगी देऊन साहेबांनी एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली. जिल्ह्यात "एक पद.. एक वृक्ष" हा उपक्रम राबवून 'पद' धारण करणाऱ्यांना कर्तव्याची जाणीव करून दिली !
चालू शैक्षणिक सत्रात "स्वच्छ शाळा.. सुंदर शाळा" ही अभिनव स्पर्धा आयोजित करुन शिक्षक आणि मुख्याध्यापकांना प्रेरित केले. अल्पावधीतच ही लोकचळवळ बनली, आणि बघता बघता शाळांचे रंगरुप पालटले. या उपक्रमाची राज्यभर चर्चा झाली, प्रसारमाध्यमांनी दखल घेतली. शासनानेही कौतुक केले त्यामुळे भविष्यात हा उपक्रम संपूर्ण राज्याला दिशादर्शक ठरेल !
साहेब,
मनःपूर्वक अभिनंदन..!!
वृक्षारोपण झाले, शाळा स्वच्छ झाल्या, भिंती रंगल्या, नटल्या, सजल्या, बोलू लागल्या...
आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे मागील दीड वर्ष लॉकडाउनच्या अंधारात चाचपडत असलेल्या शिक्षण क्षेत्राला ४ ऑक्टोबरच्या सूर्यकिरणांनी प्रकाशाची वाट दाखविली आहे. शाळेची घंटा वाजली आहे.
शासनाने आणि प्रशासनाने घालून दिलेल्या कोरोना नियमांचे काटेकोर पालन करुन शाळेचा सर्वांगीण विकास करणे ही आता मुख्याध्यापकाची जबाबदारी आहे.
मुख्याध्यापक असेल,
कार्यकुशल आणि खास!
तरच घडेल शाळेचा,
सर्वांगीण विकास !!
"मुख्याध्यापक हा शिक्षक व प्रशासन यांना जोडणारा दुवा असतो !"
मुख्याध्यापक वक्तशीर असेल, शिस्तप्रिय असेल, कर्तव्यनिष्ठ असेल आणि आपल्या आचरणातून समाजापुढे आदर्श निर्माण करणारा असेल तर तो शाळेच्या ज्ञानरुपी रथाचा यशस्वी सारथी होईल !
मी मुख्याध्यापक आहे...
गावातील दाखलपात्र मुलांची '१०० टक्के पटनोंदणी' केली आहे. शाळा व्यवस्थापन समिती व पालकांना विश्वासात घेऊन विद्यार्थ्यांची '१०० टक्के उपस्थिती' टिकविणे, सहकारी शिक्षकांना प्रोत्साहित करुन सुरुवातीला काही दिवस मनोरंजक खेळ, कविता, गाणी, गोष्टी, अवांतर वाचन यांवर भर देऊन विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लावणे आणि शिक्षणाची विस्कटलेली घडी पुन्हा बसविणे याला माझे प्राधान्य राहील.
शिक्षकांनी दैनंदिन अध्यापनात संदर्भ ग्रंथ आणि शैक्षणिक साहित्याचा योग्य वापर करावा तसेच मोबाईल, टॅब, संगणक या आधुनिक शैक्षणिक साहित्याच्या वापराचे तंत्रही शिकवावे. वाचन, लेखन आणि गणिती क्रियांना व्यवहार ज्ञानाची जोड घालावी. पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांचा कवायत, मैदानी खेळ व क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून शारीरिक व मानसिक विकास घडवावा असा माझा आग्रह राहील.
शालेय पोषण आहार, मोफत पुस्तके, गणवेश वाटप, शिष्यवृत्ती, उपस्थिती भत्ता, इत्यादी विद्यार्थी लाभाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, वीज, पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छ आणि सुंदर शौचालय युनिट या भौतिक सुविधा विद्यार्थ्यांना पुरविण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
हस्तकौशल्य, शैक्षणिक साहित्य निर्मिती, निबंध लेखन, चावडी वाचन, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, वनभोजन, परिसर भेट, सहल इत्यादी शालेय आणि सहशालेय उपक्रमांचे आयोजन करणे यासाठी माझा प्रयत्न राहील.
कोव्हीड १९ मुळे किती शैक्षणिक नुकसान झाले, याची खंत न करता 'विद्यार्थी' केंद्रबिंदू मानून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणे ही माझी जबाबदारी आहे !
अंधाराची खंत तू कशाला करिसी रे,
गा प्रकाश गीत..!
दुःख, निराशा दूर सारुनी,
सदा पडावे पाऊल पुढती,
गतकाळाची कशास भीती,
भविष्य आपुले आपुल्या हाती !
भविष्य आपुले आपुल्या हाती !!
वंदना विटणकर यांच्या या प्रेरणादायी विचाराप्रमाणे यापुढील वाटचाल राहील...
-----------धन्यवाद !------------