दादा..! भाग- ९

*दादा..!*

*भाग- ९*

  जागलीवर जेवणानंतर आम्ही आकाशातल्या गमतीजमती बघत बघत झोपायचो. *चंद्र, चांदण्या, ध्रुव तारा, एका रेषेतले तीन तारे, सात तारकांचा पुंजका हे सगळं ठळकपणे दिसे.* गाण्यात ऐकलेली 'चांदोबाची गाडी' दिसते का? त्या गाडीला हरणाची जोडी आहे का? याची उत्तरं शोधताना मात्र कठीण जाई.

   दादा, आबांना पुराणकथा ऐकण्याचा छंद होता. खास करुन आबांना. कधी कधी ते आम्हाला त्यातल्या कथा सांगत. *दादांचं गणित पक्कं होतं. पाढे पाठ होते. ते तोंडी हिशोब पट पट करत, पण एकदा त्यांनी आम्हाला ध्रुव बाळाची कथा सांगितली.* तशी ती आम्ही अनेकदा ऐकिली होती.
कथा सांगून झाल्यावर दादा म्हणाले,
"सांगा, ध्रुवबाळाच्या आईचं नाव काय होतं?"

"सुनीती..." आम्ही उत्तर दिलं.

"सुनीती म्हणजे काय?" त्यांनी विचारलं.

आम्ही गप्प....
मग दादाच म्हणाले, *सुनीती म्हणजे 'चांगलं वागणे'. सुनीतीचा मुलगा ध्रुव चांगलं वागला, म्हणून अशा ठिकाणी पोहोचला.. जिथून त्याला कोणीही हलवू शकत नाही.*

  काढणी, खुडणी नंतर सगळ्यात महत्त्वाचं काम असायचं मळणी. *मळणीसाठी त्यावेळी मळणीयंत्र नव्हती. खळं केलं जाई. मळणीयंत्र आली आणि खळी बंद झाली !* गहू, हरभरा, ज्वारी, तूर, करडई यांचे ढीग घातलेले असत, त्याच्या जवळपासच खळं करत.

खळ्यासाठी जागा साफसूफ केली जाई. दोन - तीन वेळा पाणी मारून सपाट दगडानं किंवा फळीनं ती जागा धोपटली जाई. शेणानं सारवून घेवून मध्यभागी एक मजबूत गोल लाकूड रोवलं जाई. त्याला 'तिवडा' म्हणत. वाळलेली कणसं त्या खळ्यात पसरली जात. तिवड्याला ओळीनं जनावरं बांधून त्या कणसांवरुन फिरवली जात, त्यांच्या नख्यांमुळे कणसातलं दाणं वेगळं होत, मग उफणणी करुन धान्याची रास लावली जायची. गहू आणि हरभरा अशाच पद्धतीने मळाला जाई.

    आमच्यात करडई आवर्जून पेरली जायची. तूर आणि करडईला मात्र काठीने बडवावे लागायचे. करडईच्या  पानांना टोकदार काटे असल्याने ती काढणं, बडवणं आणि उफणणी करणं जिकरीचं काम असे. कितीही काळजी घेतली तरी हाताला काटे टोचत, मोडत आणि काढताना दिसतही नसत. *लाकडी घाण्यातून करडईचे तेल काढून आणले जाई. ज्वारीची गरम गरम भाकरी, शेंगदाण्याची चटणी, त्यावर करडईच्या तेलाची धार आणि तोंडी लावायला कांदा असला की बेत कसा फक्कड व्हायचा !*

*क्रमशः..*

               *श्री राजेंद्र गिते, बार्शी.*

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य