दादा..! भाग- ७

*दादा..!*

*भाग- ७*

  *सुगीच्या दिवसांत काढणीला आलेली पिकं काढून एका ठिकाणी गोळा केली जातात. गोळा करुन ठेवलेल्या पिकांची राखण करण्यासाठी शेतकरी शेतातच मुक्काम करतो. त्याला आमच्याकडं जागल म्हणतात...*

   त्यावेळी आम्ही खूप लहान होतो. सुगीच्या दिवसांत दादा, आबांसोबत आमचाही मुक्काम जागलीवर असायचा. आमची जागल मोरवंडीला असायची. मोरवंडी म्हणजे गावाच्या पूर्वेला असलेली आमची काळी, कसदार जमीन. *पेरलेलं एकदा उगवलं की पीक पदरात पडलंच म्हणून समजा, इतकी भरवशाची मोरवंडी !* गावाच्या पश्चिमेला जराशी हलक्या प्रतीची, काही प्रमाणात दगडगोटे असलेली दुसरी जमीन आहे, त्याचं नाव माळरान.

   पिकं कुठंही पेरली, तरी काढून ती एका ठिकाणी आणली जायची. *आधी गहू, हरभऱ्याची काढणी व्हायची. मोरवंडीला अमराईच्या खालच्या तुकड्यात दादा, आबा त्यांचे गोल, आटोपशीर ढीग रचत. सावकाश पण चांगलं काम करण्यावर त्यांचा भर असायचा.* खरा घाम निघायचा ज्वारी काढताना. रोजंदारीवर लावलेल्या बायांच्या मदतीनं आई, काकू ज्वारी काढत. *ज्वारीची धाटं विळ्यानं कापून न काढता उपटून काढली जात. बिनपाण्याची ज्वारी सहज उपटायची, पाणी दिलेली ज्वारी उपटत नसे. बाया थकून, भागून जात. हाताला फोड येत, फोड फुटले की रक्त येई, बोटांना चिंध्या बांधून ज्वारी काढत काढत त्या भलरी म्हणत...*

नवरा बायकोची जोडी,
काढितीss जवारी !
हात उचला राया,
मी म्हणते भलरी !!

भलरी.. भलरी,
भलरी दादा भलरी..!
भलरी.. भलरी,
भलकडी दादा भलरी..!!

भलरी म्हणत म्हणत ज्वारी काढताना त्यांचा थकवा कुठल्या कुठं पळून जाई...

जागलीवर आमचं पहिलं काम असायचं, झोपायला जागा करणे. खडबडीत माती बाजूला सारून आम्ही मऊ मातीची गादी तयार करायचो. मातीचीच उशी बनवायचो. *चांदण्या रात्री, निसर्गाच्या कुशीत, त्या मऊ मातीच्या गादीवर, गोधडी टाकून झोपण्यातला आनंद काय वर्णावा !*

पण *आम्हाला खरी मज्जा यायची ती 'खोल्या'त दुधकाला खाताना...*

*क्रमशः..*

               *श्री राजेंद्र गिते,बार्शी.*






Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य