दादा..! भाग- ८

*दादा..!*

*भाग- ८*

  *दुधापासून खवा तयार करण्याचा धंदा आमच्या गावात फार पूर्वीपासून होता, आजही आहे.* आमच्या घरीही खव्याची भट्टी होती. दादा भट्टी घोटत. आम्हीही त्यांना थोडीफार मदत करायचो...

  'मुरा' जातीच्या म्हशीला त्यावेळी आमच्या भागात चांगली मागणी होती. *थोडा हिरवा चारा, ज्वारीचा कडबा, भरपूर खुराक आणि वेळच्या वेळी पाणी अशी चांगली बडदास्त ठेवली तर मुरा जातीची एक म्हैस अडीच किलोपर्यंत खवा करते.* हा आमचा अनुभव आहे.

  *ज्यांच्याकडे दूध आहे ते 'दुधवाले', दूध भट्टीवर तापवून त्याचा खवा तयार करणारे 'भट्टीवाले', गावोगावचा खवा एकत्र करुन दुकानदारांना पुरविणारे 'व्यापारी' आणि हा सगळा माल विकत घेणारे  'मालक'.* अशी सगळी साखळी आहे. मालक या मालापासून पेढे, मिठाई, बासुंदी, गुलाबजामुन असे अनेक पदार्थ बनवून विकतो. *पुण्याच्या बुधवार पेठेतील मिठाईची अनेक दुकानं आमच्या गावाच्या जीवावर चालतात.*

आमचं गाव खव्याचं केंद्र होतं आणि आजही आहे. दिगंबर कदम, प्रभू मेटे, सुरेश जाधव आणि देविदास जाधव हे गावचेच व्यापारी. ते आसपासच्या गावातील खवाही आमच्या राजेगावात एकत्र करतात. त्या खव्याचे २० -२० किलोचे 'डाग' तयार केले जातात, आणि विशेष वाहनानं रोजच्या रोज पुण्याला पाठवले जातात. मालक व्यापाऱ्याला उचल देतो, व्यापारी भट्टीवाल्याला आणि भट्टीवाला दुधवाल्याला. *ज्याच्याकडून उचल घेतली, त्यालाच माल देण्याचं 'अलिखित बंधन' असतं. हा सगळा आर्थिक व्यवहार वर्षानुवर्षे फक्त विश्वासावर आणि इमानदारीवर टिकून आहे.*

   आमच्यात दुधासाठी म्हशी आणि शेतीकामासाठी कमीत कमी दोन बैलं कायम असत. जागल असली की बैलं जागलीवर बांधली जात, म्हशी मात्र गोठ्यातच. कारण *नवीन जागी म्हैस बांधली तर धार काढताना लाथा मारू शकते !*

   तिन्ही सांजच्या वेळेला दादा आमच्यापैकी एकाला बरोबर घेऊन घरी यायचे. म्हशीच्या धारा काढायचे. तोपर्यंत भाकऱ्या व्हायच्या. तापलेलं निरसं दूध, भाजी, भाकऱ्या, ठेच्याची वाटी, भाजलेल्या पापड्या आणि कच्च्या भुईमुगाच्या शेंगा इतकं सगळं टोपल्यात व्यवस्थित रचलं जायचं. दादाच्या डोक्यावर टोपलं आणि आमच्या हातात बॅटरी असायची. कंदिलाच्या उजेडात गोल पंगत बसायची. *घर असो की शेत सगळ्या गडी माणसांची एकत्र आणि त्यानंतर सगळ्या बायकांची एकत्रच जेवणाची पंगत बसायची, हा जणू काही नियमच होता !*

   आम्ही 'खोल्या' घेऊन बसायचो. खोल्या म्हणजे खापराची मोठी वाटी. एक भाकरी खोल्यात कुस्करायची, त्यात तापविलेलं निरसं दूध ओतायचं, मस्त दुधकाला करायचा आणि ठेचा तोंडी लावत लावत ओरपायचा. खूप मजा यायची...

*क्रमशः..*

Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२