दादा..! भाग- १०

*दादा..!*

*भाग- १०*

  आमच्या गावात कुंभार, चांभार, सुतार, कोळी हे बलुतेदार होते, त्यांनी बलुत्यासाठी शेतकऱ्यांची घरं वाटून घेतलेली होती. त्यांच्याशी निगडित असलेली शेतकऱ्यांची कामं ते वर्षभर करुन देत, त्यांचं बलुतं ठरलेलं असे. *मळणी झाली की बलुतेदार खळ्यावर येत. दादा त्यांना खळ्यावरच 'ठरलेलं धान्य आणि कडबा' देत...*

  गावात कुंभाराची चार घरं होती. त्याला सगळे 'कुंभारवाडा' म्हणत. कुंभारवाडा आमच्या घरासमोरच होता, मध्ये फक्त रस्ता. किसन कुंभार, विष्णू कुंभार आणि मनोहर कुंभार हे तिघे कुंभारकाम करत. शिवमूर्ती कुंभार मारुतीच्या मंदिरात झाडलोट, दिवाबत्ती, पूजाअर्चा अशी कामं करत. *संक्रांत, गणेशोत्सव, दिवाळी या सणांसाठी लागणारी मातीची भांडी, मूर्त्या यांच्या तयारीला कुंभारं खूप आधीपासून लागत.* मातीत लीद मिसळणे, ती एकजीव होईपर्यंत मळणे, फिरत्या चाकावर मातीच्या गोळ्याला सुंदर आकार देणे, मूर्त्या करताना माती बोटांनी दाबून साच्यात भरणे आणि तयार झालेली भांडी, मूर्त्या वाळवून 'आव्यात' भाजणे. ही सगळी नाजूक आणि जोखमीची कामं ! पण कुंभारं अगदी सफाईदारपणे करत. आम्ही तासंतास बघत बसायचो. *रंग देऊन मुर्त्यांमध्ये जिवंतपणा आणताना त्यांचं कौशल्य पणाला लागे.* थोडं कमी जास्त झालं तर सगळी मेहनत वाया जात असे.

एकदा आमच्याकडून मोठी चूक झाली...

   माझ्या आणि कृष्णाच्या वयात फारसं अंतर नव्हतं. तो माझ्यापेक्षा अकरा महिन्यांनी मोठा होता. आम्हा दोघांना एकाचवेळी शाळेत घातलं. दुसरीत असताना उपस्थितीचं कारण देत गुरुजींनी त्याला नापास केलं, त्यामुळं तो थोडा मोठा असूनही एका वर्गाने मागं राहिला. पण आमची छान गट्टी होती. तसं पाहिलं तर लहानपणी आम्ही दोघं बऱ्यापैकी खोडकर होतो. दादा, आबा नसताना तर आमच्या खोड्या बहरुन येत.
आमच्या घराचं बलुतं मनोहर कुंभाराकडं होतं. पण एकदा विष्णू कुंभारानं आमच्या दारापुढं, रस्त्याच्या कडेला मडकी वाळायला घातली. नजर चुकवून आम्ही मडक्यांची अख्खी एक ओळ तुडवली. सगळी मडकी फुटली. *कुणीतरी काडी टाकली, आणि भडका उडाला. विष्णू कुंभार लालेलाल झाले. संध्याकाळी त्यांनी दादा, आबांना सांगितलं. "एखाद्याला मदत नाही करता आली, तर त्याचं नुकसान तरी करु नये" ! दादांनी तोंडानं समजावून सांगितलं, तर आबांनी हातानं !*

*क्रमशः..*

               *राजेंद्र गिते, बार्शी.*

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य