दादा..! भाग- ६

*दादा..!*

*भाग -६*

  *वक्त से पहले, और किस्मत से ज्यादा किसिको कुछ नहीं मिलता !* असं म्हणतात ते काही खोटं नाही.

   दादा चौथीपर्यंतच शिकले, आबा शाळेतच गेले नाहीत. लग्न झालं की थोरले सावत्र भाऊ बाबुराव वेगळं राहिले. *एकट्याला कुळव उचलत नव्हता, तेव्हा दोघा भावांनी मिळून कुळव उचलायचा, आणि वसन काढायचं. इतक्या लहान वयापासून शेती केली. आपल्या शेतीची कामं लवकर उरकून दादांनी दुसऱ्याच्या शेतात मोलानं नांगरणी, पेरणी, कुळवणी केली. २७ वर्षे खव्याची भट्टी घोटली. वाहतुकीची सोय नव्हती तेव्हा त्या खव्याची कळंबपर्यंत डोक्यावर वाहतूक केली.*

*आयुष्यभर फक्त कष्ट ! कष्ट !! आणि कष्टच !!!*
*हलाखीत दिवस काढले, दुःख पचविले, पण कधी हार मानली नाही. परिस्थितीपुढे गुडघे टेकले नाहीत आणि नशिबालाही दोष दिला नाही...*

आता चांगले, सुखाचे दिवस आले.
पण नशीब???
ते सुख त्यांना भोगता आलं नाही, तो आनंद त्यांना पचविता आला नाही !

*कुणाला हृदयविकाराचा झटका येतो, कुणाला अर्धांगवायुचा झटका येतो, दादाला हर्षवायुचा झटका आला !*

  चारच्या सुमारास आशा आणि भाऊजी आले. त्यांना घेऊन मी वर गेलो. आशाला पाहून काकुला हुंदका आवरता आला नाही. आम्ही धीर देत होतो, पण...

  दुसऱ्या दिवशी दादांना बघायला आबा, कृष्णा आणि शांता येणार होते. शांता म्हणजे बालूची बायको. दवाखान्यात इतक्या माणसांची सोय होणं शक्य नव्हतं. बालू, आशा आणि भाऊजी बीडला गेले. मी, पिनू आणि काकू दवाखान्यात थांबलो. रात्रीच्या वेळी पेशंटजवळ फक्त एकालाच थांबता येत होतं. तिथं काकू थांबली. नातेवाईकांना थांबण्यासाठी खाली एक हॉल होता, उन्हाळा असल्यानं आम्ही हॉलच्या बाहेर, एका बाजूला सतरंजी टाकली. दिवसभर दगदग झाली होती. उशाला चादर घेऊन अंग टाकलं. सहज वर लक्ष गेलं, *आकाश निरभ्र होतं. टिपूर चांदणं पडलं होतं. चंद्रप्रकाशात चांदण्या न्हाऊन निघाल्या होत्या. मला लहानपण आठवलं. उन्हाळा सुरु झाला की, दरवर्षी आमची शेतात 'जागल' असायची...*

*क्रमशः..*

               *श्री राजेंद्र गिते,बार्शी.*









Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य