दादा..! भाग-१५

*दादा..!*

*भाग - १५*

  *पिंपरीच्या उत्तरेश्वर मंदिराचे कळस लांबूनच दिसले. चिंचेखाली बैलगाडी सोडून आम्ही सर्वांनी महादेवाचं दर्शन घेतलं.* बाजूलाच माऊली महाराजांचं निवासस्थान होतं, त्यांचाही आशीर्वाद घेतला. प्रसाद घेऊन आम्ही निघालो. तिथून काळेगाव जवळच आहे, शाळेच्याच एका खोलीत आमची राहण्याची सोय केली होती. आम्हाला तिथं सोडून आबा माघारी गेले. रोज दोघेजण गावाकडून सगळ्यांची जेवणं घेऊन येत. एकदा दादाही येवून गेले.

*पिंपरीत उत्तरेश्वराचं जागृत देवस्थान आहे. तिथं ह.भ.प. माऊली महाराजांचं अनेक वर्षे वास्तव्य होतं. कीर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधन केलं. संसार करुनही परमार्थ करता येतो, हे त्यांनी स्वतःच्या आचरणातून सिद्ध केलं. माऊलींचा शब्द अवघ्या मराठवाड्यात 'प्रमाण' मानला जाई. लोक लांबून लांबून येत, भक्तिभावानं महादेवाचं दर्शन घेत. माऊलींच्या चरणांवर नतमस्तक होत. त्यांना संसारातल्या अडीअडचणी सांगत, त्यांचा सल्ला घेत. आनंदानं प्रसाद घेवून समाधानानं माघारी फिरत.*

*माऊलींच्या चमत्काराच्या कथा आजही गावोगावी सांगितल्या जातात, त्यांची समाधी चाकरवाडी येथे आहे...*

  महाशिवरात्रीला पिंपरीत मोठी यात्रा भरायची. यात्रा जवळपास तीन दिवस चालायची, पण आठवडाभर आधीपासूनच उत्साह असायचा. सुगीची कामं उरकल्यानं शेतकऱ्यांनाही थोडी उसंत असायची. आसपासच्या खेड्यातून आबालवृद्ध उत्साहानं येत. *यात्रेनिमित्त उत्तरेश्वर महादेवाचं मंदिर फुलांच्या माळा आणि रंगीबेरंगी पताकांनी सजवलं जाई. देवाचं दर्शन घेण्यासाठी लोकांची झुंबड उडे. लहान मुलं गर्दीत चेंगरण्याची भीती असायची. मोठ्यांच्या कडेला बसूनच त्यांचं दर्शन व्हायचं.* आम्ही बैलगाडीनं यायचो. मंदिराच्या आजूबाजूला नारळ, फुले, हार, प्रसाद आणि मूर्त्यांची दुकानं थाटलेली असत, पण गावाच्या खालच्या बाजूला नदीच्या पात्रात मोठी यात्रा भरायची. नाहोलीचे मोहनमामा, भामाआत्या, ताराअक्का, सातेफळची जनाआत्या आधीच आलेले असत. फुलचंदनाना, संजू, बाळू ही आत्याची पोरं आमची वाट बघत बसलेली असत.

  *उत्तरेश्वर पिंपरीची यात्रा म्हणजे नातेवाईकांना भेटण्याचं, नवीन नाती जोडण्याचं हक्काचं ठिकाण होतं.* पुरुष मंडळी चहापाणी, पान तंबाखू आणि गप्पागोष्टीत रमून जात. महिला मंडळ ऊन उतरेपर्यंत गाडीच्या सावलीत हितगुज करीत बसत. एखादी घटना किंवा प्रसंगातून निर्माण झालेले गैरसमज, त्यातून पोटात साठलेली मळमळ, मनातले हेवेदावे, धुसफूस या सगळ्यांवर तिथंच इलाज व्हायचा.
 
यात्रेत आमचा पायाला पाय लागत नसे. आकाश पाळणा, गोल चक्र, जादूचे खेळ, झटपट फोटो, भारी सिनेमा.. सगळीकडे फिरुन व्हायचं. नाही नाही म्हणत एखाद्या तरी प्लास्टिकच्या वाहनाची खरेदी व्हायची. सापवाले, डोंबारी यांचे खेळ बघायला जास्त गर्दी जमायची.

*तरुण मुलं आणि पुरुष मंडळींचं मात्र 'तमाशाच्या फडाकडं' लक्ष असायचं !*

*क्रमशः..*

               *श्री राजेंद्र गिते, बार्शी.*




Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य