दादा..! भाग- ४

*दादा..!*

*भाग -४*

गाडी धावत होती, मनात भूतकाळातल्या आठवणी होत्या....
  *दादा आणि आबाची जोडी राजेगावच्या पंचक्रोशीत प्रसिद्ध होती. आबा तापट, थोडे रागीट, तर दादा कमालीचे शांत आणि संयमी. पण दोघांत राम लक्ष्मणासारखं बंधुप्रेम !* दादा कारभारी होते, पण सगळे निर्णय दोघं मिळून घेत. एकदा दोघांचं ठरलं की सहसा त्यात बदल होत नसे. दादा-काकू आणि आबा-आईनं खूप कष्टानं आम्हाला शिकवलं, मोठं केलं. आता परिस्थिती थोडी बरी होती...

घरात लहानमोठी जवळपास दोन डझन माणसं, पण अजून एकाच चुलीवर स्वयंपाक व्हायचा. अनेकजण प्रयत्न करुन थकले, पण खटलं फुटलं नाही. सगळ्या मुलाबाळांना लेकरंबाळं झाली, तरी 'दादा आबा' एकत्र होते, याचा त्यांना प्रचंड आनंद आणि अभिमान वाटे. कधी कधी ते म्हणूनही दाखवत, *"आमच्या जीवात जीव असेपर्यंत आम्ही वेगळं राहणार नाही."*

  *'बापच एकत्र होते तर आम्ही मुलांनी कुणातून आणि कसं वेगळं राहायचं'?*

  अलीकडच्या काळात नोकरीधंद्याच्या निमित्ताने आम्ही बाहेरगावी राहात असलो, तरी *सुट्ट्या, सणवार, कौटुंबिक सोहळे, सुखदुःखाचे क्षण अशा प्रसंगी सगळे एकत्र यायचो. तेव्हा घर कसं गोकुळासारखं फुलून यायचं, तेव्हा विशेष करुन दादा, आबा आणि म्हाताऱ्या बाईच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसायचा.*

घरी आलेल्या प्रत्येकाला दादा आबा कौतुकानं सांगत...
"हा राजू.. करमाळ्याला शिक्षकय..."
"हा कृष्णा.. चौसाळ्याजवळ हिंगणीला शिक्षकय.."
"बालू.. सरकारी वकील अन पिनू.. कंम्प्युटरची कामं करतो..."
"मुलगी पण शिक्षकालाच दिलीय, तिचं मालक लांब तिकडं परभणीला असतेत..."

*लोकांना माहीत असलं, तरी यांचं चालूच असायचं !*

*दादा तर नेहमी म्हणत,"आमचं किती चांगलं झालं, आता कुणाचीही समसम नाही !"*

*अत्यानंदही पचवता आला पाहिजे, नाही का?*

*क्रमशः..*

                *राजेंद्र गिते, बार्शी.*

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य