दादा..! भाग- ११
*दादा..!*
*भाग - ११*
वडाच्या झाडाखाली 'सुतार मेट' होतं. वामन पांचाळ सुतारकाम करत. लोक त्यांना 'वामन सुतार' म्हणूनच ओळखत. बाकीच्या बलुतेदारांचंही असंच होतं. *कुंभारांचं आडनाव परळकर, चांभारांचं शिंदे आणि कोळ्यांचं सोनवणे, पण लोकं त्यांना आडनावानं बोलतही नसत, आणि ओळ्खतही नसत.* लोक 'जसे बोलत.. तसेच लिहीतही', मग ती आहेराची यादी असो नाहीतर मटणाची ! *शाळेच्या दप्तरातही बहुतेक बलुतेदारांच्या नावापुढं जातच लागली !*
वामन सुताराला आम्ही मुलं 'वामन मामा' म्हणायचो. औत, तिफन, डुबं, कोळपं अशी शेतीची सगळी अवजारं त्यांना करता येत. करवत, वाकस, किकरं, पटाशी ही हत्यारं घेऊन ते सुतार मेटावर बसत. ऐनवेळी शेतकऱ्याचं काही अडलं नडलं तर तात्काळ दुरुस्ती करुन देत.
गावात कोळ्यांची पाच सहा घरं होती. *लक्ष्मण सोनवणे यांचा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत सहभाग होता. स्वातंत्र्यानंतर केंद्र आणि राज्य सरकार कडून त्यांना पेन्शन मिळायची. राज्य सरकारने राज्यभर मोफत बस प्रवासाची सवलत देऊन त्यांचा सन्मान केला.* त्यांना तीन मुलं. अभिमान आणि सुरेश परंपरागत कोळ्याचा धंदा करत, तर महादेव सोनवणे देशसेवेसाठी सैन्यात भरती झाले.
*सुरेश सोनवणे हे आमचे 'कोळी' होते. रेड्याच्या पाठीवर पखाल लादून ते त्यांना वाटून आलेल्या घरी पाणी वाढत.* त्यांच्याच गल्लीत एक आड होता, त्याला सगळे 'कोळ्याचा आड' म्हणत. आडाचा घेर कमी, पण खोली जास्त होती. डोकावून पाहिलं तर डोळे गरगरत. आडावर दोन रहाट होते, त्या रहटाच्या साहाय्याने पाणी शेंदून कोळी पखाल भरत. पाणी शेंदताना चाक करकर आवाज करी. गावातील गडी, बाया पोहऱ्याने पाणी शेंदून घागर भरत. बायकांना तर जीव मुठीत धरून पाणी भरावं लागे !
*सुरेश कोळ्याचा रेडा खूप समजदार होता.* आपल्या मालकाकडं असलेली सगळी घरं त्याच्या लक्षात असत. पाठीवर पाण्यानं भरलेली पखाल घेऊन तो डुलत डुलत चालायचा. त्याची जशी चाल होती, तशीच त्याच्या गळ्यातील घुंगरं वाजत !
*भरलेल्या पखालीचं ओझं कितीही असलं तरी रेडा ठरलेल्या घरापुढं येऊन उभा राहायचा, आणि मालकाचा इशारा होईपर्यंत तसूभरही जागचा हालायचा नाही. कोळी सहा घागरीच्या पटीत पाणी वाढायचे. त्या घरचं पाणी वाढून झाल्यावर सुरेशभाऊ "हाल्या की..." म्हणून रेड्याला हातानं हलका धक्का द्यायचे, तो पुढच्या ठरलेल्या घरापुढं जाऊन उभा राहायचा.. न चुकता !* आम्हाला रेड्याच्या या शहाणपणाचं खूप कौतुक वाटायचं.
*उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्टीत आमच्या घरात जास्त माणसं असत. पण सुरेशभाऊंनी कधी कुरकुर केली नाही. लागेल तेवढं पाणी वाढलं. रोज पाणी वाढल्याबद्दल त्यांना रोजच्या रोज भाजी-भाकरी दिली जायची. बलुतं वर्षातून एकदाच दिलं जायचं. खळ्यावर आलेल्या सगळ्याच बलुतेदारांना दादा सढळ हातानं बलुतं देत...*
*क्रमशः..*
*श्री राजेंद्र गिते, बार्शी.*