दादा..! भाग-१४

*दादा..!*

*भाग -१४*

  दत्तूबप्पानं भिंतीला बाहेरून टांगलेला नळा काढला, त्यात तेल असल्याची खात्री केली. गाडीच्या आकाला वंगण केलं, 'कुण्या' दगडानं थोड्या खाली ठोकल्या. आबानं 'माचोळी' खालची 'खिळी-जोती' काढली, खुंटीवरचा चाबूक घेतला. आबा निघाल्याचं बघताच बालूनं तोंडाला लावलेला दुधाचा ग्लास खाली ठेवला, डाव्या हाताच्या बाहीनं तोंड पुसलं.. पळत जाऊन गाडी गाठली.. आणि गाडीत बसून 'खुटला' धरला.

  *लहानपणी बालू आबांचा खूप लाडका होता. त्याला बैलगाडीचं तर प्रचंड वेड होतं. गाडीत बसायला मिळालं की तो तहानभूक विसरुन जाई.* गाडीवानाच्या डाव्या बाजूचा खुटला ही त्याची ठरलेली जागा. खिळी, जोती काढलेली दिसली की तो गाडी गाठायचा.
आता कितीही समजावून सांगितलं तरी तो गाडीतून उतरणार नाही, हे सगळ्यांनाच माहीत होतं. ग्लासात उरलेलं त्याचं दूध काकूनं त्याला गाडीत आणूनच पाजलं.

  मी घरात जाऊन देव्हाऱ्यावर डोकं टेकवलं, हात जोडले, "देवबाप्पा, खुशाल ठेव ! चांगली बुद्धी दे !! असं साकडं घातलं. मोठ्या माणसांच्या पाया पडलो. सगळ्यांनी आशीर्वाद दिले. *सगळ्यांचा आशीर्वाद ठरलेला असायचा. म्हातारी बाई गालावरुन हात फिरवायची, दोन्ही हाताची बोटं डोळ्यांच्या आणि कानाच्या मध्ये दुमडून कडाकडा मोडायची आणि म्हणायची, "म्हातारंss व्हा!, इठुबाला पावू द्या !!"*
*काकू आंबाळून, चोंबाळून गालाचा मुका घ्यायची.*
*आई म्हणायची, "लवकर मोठ्ठं व्हा !"*
*दादा, आबा पाठीवर हात ठेवून थोपटायचे...*

  *आम्ही चौथी बोर्डच्या परीक्षेला जाणार म्हणून आमचं केवढं कौतुक चाललेलं ! सगळ्याच मुलांच्या घरची माणसं वाटं लावायला आली होती.* 'एका मागं एक' पाच गाड्या निघाल्या होत्या. दोन गाड्यांत मुली, तीन गाड्यांत मुलं होती. आमची गाडी सगळ्यांच्या पुढं होती. काळेगाव तसं जास्त लांब नाही, पण आडवळणी होतं. बैलगाडीनं दीड दोन तास लागत. नाहोली पर्यंत कच्ची सडक होती. छोटी छोटी दगडं उघडी पडली होती. *बैलाच्या अंगाला नुसतं टिपरू लावलं तरी गाडी टणाटण उडायची, आणि गाडीसोबत आम्हीही !* तरीही आम्ही दोन तीन वेळा "आबा गाडी पळवा.. आबा गाडी पळवा की" म्हणालो, पण आबानं काही ऐकलं नाही.

  नाहोलीच्या पुढं आबानं गाडी मधल्या वाटानं घेतली. या रस्त्याला दगडं नव्हती, पण गाड्या जाऊन जाऊन दोन्ही बाजूंनी मातीत चकाऱ्या पडल्या होत्या. चकारीतली माती पांढरी झाली होती. गाडीची चाकं त्या पांढऱ्या मातीत रुतत होती. चाकाच्या आऱ्यांत बसलेली माती वरपर्यंत येत होती, वाऱ्याच्या झुळकेनं डोळ्यात जात होती. तरीही आम्ही पुन्हा एकदा आबाला 'गाडी पळवा' म्हणून सांगितलं.
आबा म्हणाले, "आपुन गाडी पळविली तर फुफुटा उडल का नाही?"

आम्ही म्हणालो, "हो..."

"मग मागच्या गाडीतली पोरं, त्यांचं सामान सगळं मळून जाईल का नाही?"

"हो..."*

*आपल्यामुळं दुसऱ्याला तरास होणार नाही, हे बी आपुन बघितलं पाहिजे."*

आम्ही गप्प बसलो...

*क्रमशः..*

               *श्री राजेंद्र गिते, बार्शी.*



Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य