दादा..! भाग- २

*दादा..!*

*भाग -२*

  *५ फेब्रुवारी २०११ चा तो 'शनी'वार होता. दादाला औरंगाबादच्या कमलनयन बजाज रुग्णालयात दाखल केलं होतं.* सोबत बालू, काकू आणि पिनू होते. पिनू हे आबांचं शेंडेफळ. त्याचं नाव हरीश, पण सगळे त्याला पिनूच म्हणत...
काकू म्हणजे आमची आई !
दादा थोरले, आबा धाकटे होते. पण आबाला आधी मुलं झाली. दत्ता आणि कृष्णा. ते आमच्या आईला काकू म्हणायचे.. आम्हीही काकू म्हणू लागलो.

"बालू, काय म्हणले डॉक्टर?"
"आम्ही निघावं का?"
मी पुन्हा पुन्हा विचारात होतो.

"अजून रिपोर्ट आला नाही, आला की सांगतो."
बालूचं उत्तर ठरलेलं असायचं.

रिपोर्ट यायला आणि आम्हाला कळायला दिवस मावळला. *तो अणकुचीदार दगड दादांच्या लहान मेंदूत घुसला होता. खूप रक्त वाहिलं होतं. दादा बेशुद्ध होते, कोमात गेले होते !*

काकुला फोन केला...
तिनं सांगितलं,
*"पडल्यानंतर झाकलेले डोळे त्यांनी अजूनही उघडले नाहीत."*

  मला काही सुचेनासं झालं. सोनवणे गुरुजीकडे गेलो. अमृत सोनवणे.. जिवाभावाचा मित्र. त्याला सगळं सविस्तर सांगितलं, विलास शिराळ, देवेंद्र जाधवर या जिवलग मित्रांनाही कल्पना दिली. पैशांची थोडीफार तजवीज केली. सकाळी पहिल्या गाडीनं एकट्यानंच जायचं ठरवलं...

  घरी आलो. पुन्हा एकदा फोन केला. *दादा डोळे उघडत नव्हते आणि आमचा डोळ्याला डोळा लागत नव्हता. एकमेकांच्या गळ्यात पडून मोठ्यानं ओरडावं असं वाटत होतं. पण घरात लेकरं होती ! सौरवला सगळं कळत होतं, गौरव तसा लहानच होता. पोरं आमच्याकडं बघत होती.. आम्ही त्यांच्याकडं. त्यांना खाऊ-पिऊ घालून झोपवलं.. दोघंच गच्चीवर गेलो.. सर्वत्र सामसूम झाली होती.. दुरदूरपर्यंत अंधार दिसत होता.. आम्ही शांतपणे बसून होतो.. कितीतरी वेळ !*

*क्रमशः..*

              *श्री राजेंद्र गिते, बार्शी.













Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य