दादा..! भाग- ३

*दादा..!*

*भाग - ३*

  कशीबशी रात्र सरली. सकाळी सगळं पटपट उरकलं. तोपर्यंत तिनं डबा बनवला, बांधला. आठची गाडी गाठली. फारशी गर्दी नव्हती. *खिडकीजवळ जागा मिळाली. सकाळची वेळ असल्यानं हवेत हलकासा गारठा होता, त्यामुळं सूर्याची कोवळी किरणं सुखद वाटत होती.*

अर्ध्या - पाऊण तासाचा प्रवास झाला असेल. गाडीनं नगर जिल्ह्यात प्रवेश केला होता. रात्री चांगली झोप झाली नसल्यानं, डोळ्यांवर तंद्री यायला लागली होती.

आशाच्या फोननं सावध झालो, "कुठैस अण्णा?"

"करमाळ्याच्या लांब पुढं आलोय, तू?"...मी विचारलं.

"आम्हीही निघतोय पाथरीहून, थोड्या वेळात."

"कोण कोण?"

"दोघंही.... असं कसं झालं अण्णा?"
तिचा आवाज जड झाला होता...

"निघा लवकर, आल्यावर बोलू..."
असं म्हणून मी फोन ठेवला.

*आशा.. आमची धाकटी बहीण, बालूच्या पाठची. आम्ही दोघं.. चुलत भाऊ तीन, अशा पाच भावांत एकटीच बहीण.* जवळच वाशी तालुक्यातल्या फक्राबादमध्ये तिला दिलं होतं. भाऊजीही शिक्षक, परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यात. त्यांची बहीण मंदाकिनी.. म्हणजे माझी बायको. आमचं साटंलोटं होतं....

  *खिडकीतून आता ऊन यायला लागलं होतं. मी खिडकीच्या गजातून बाहेर डोकावण्याचा प्रयत्न केला. झाडं मागं पळत होती, मन वेगानं पुढं धावत होतं. ते केव्हाच दादांजवळ पोचलं होतं...*
किती घटना?
किती प्रसंग?
किती आठवणी?
*साऱ्यांची माझ्या डोळ्यांपुढं गर्दी झाली होती...*

*क्रमशः..*

              *श्री राजेंद्र गिते, बार्शी.*









Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य