दादा..! भाग- ३५

*दादा..!*

*भाग - ३५*

   बाई मोठी जिद्दी होती, पण मी एकदा तिच्याकडं पेटी उघडून बघण्याचा हट्ट धरला, बाईनं पेटी उघडून दाखवली. त्यात  घराचे, जमिनीचे कागद, दोन नवी लुगडी, एक इरकल आणि थोडेसे दागिने होते. त्यातला महत्वाचा दागिना म्हणजे तिची बोरमाळ. *बोरमाळ म्हणजे बाईचा जीव की प्राण ! त्याकाळी बोरमाळ स्त्रियांचा सगळयात आवडता दागिना असायचा. दोन्ही हातात डझन डझन बांगड्या, नाकात मोठी नथ, कानात फुलं, गळ्यात बोरमाळ आणि इरकल नेसलेल्या बाईचा रुबाब काही वेगळाच असायचा.*

   एकदा काही प्रापंचिक अडचणीमुळे दादांनी बाईची बोरमाळ मोडली. बाईचा जीव कशातच लागेना. महिन्या पंधरा दिवसाला दादाला म्हणायची, "भिमा, माझी बोरमाळ कधी करतो?" 

योगायोगानं त्या वर्षी चुलत भावाचं लग्न झालं. दादांनी बोरमाळ केली, तेव्हाच बाईचा जीव भांड्यात पडला.

  बाईच्या कमरेच्या पिशवीत कुठं काय ठेवलंय ते दुसऱ्याला कधीच सापडत नव्हतं, पण बाई नेमकं काढून दयायची. *कुणाच्या टाचा उलल्या, बोटाला कापलं की तिचा सुई अन बिब्बा तयारच असायचा. एखाद्याचं डोकं दुखायला लागलं की बाई म्हणायची, "ही सुठ घी, उगाळून, गरम करुन कपाळाला लाव, थोड्या वेळात बरं वाटंल."*

   अशा छोट्या छोट्या अनेक दुखण्यावरचे घरगुती उपाय बाईला माहीत होते. *दातदुखी, घशात खवखव व्हायला लागली की कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या करायला लावायची. सर्दी झाली की पिठाची धुरी घ्यायला लावायची. जखमेवर हळद टाकायची.* दुकानातून काही आणायचं असलं की चाळून चाळून नेमकी नोट काढायची. आम्ही लाडी-गोडी लावायला लागलो की पिशवीत हात घालून एक, दोन रुपये काढून द्यायची अन म्हणायची, "म्हातारपणी संभाळशील का?"

आम्ही म्हणायचो, "बाई, तू आता म्हातारीच आहेस की !"

मग बाई हसत हसत म्हणायची, "तुम्हीबी व्हताल की म्हातारं, का असंच राहताल?"

*म्हाताऱ्या माणसाला म्हातारं म्हणलेलं आवडत नाही, हे मात्र खरं !*

  सगळेजण आपापल्या कामा-धंद्याला गेले की बाईची आणि तिच्या मैतरणींची मैफिल बसायची. एक दोनदा तपकीरीचे बार व्हायचे आणि मग गप्पा रंगायच्या. *एकटं असलं की बाई डोळ्याला पदर लावून बसायची. नवरा आधी गेल्याचं दुःख तिनं गटागटा गिळलं, हार न मानता हिमतीनं उभी राहिली. दोन मुली उजवल्या, दोन मुलांचे संसार फुलविले. पण धाकटी जनाबाई लवकर गेल्यानं तिच्या लेकरांची चिंता बाईला सतावत होती.*

    बाईचं जेवण सावकाश असायचं. दातांनी बारीक चावून चावूनच घास पोटात घालायची. नव्वदीकडं झुकली तरी बाईचा एकपण दात पडला नव्हता. ती दातांना 'दातवन' लावायची, त्यामुळे तिचे दात काळे होते पण मजबूत होते. बाई अजून कानानं तिखट होती, तशीच डोळ्यांनीही तिला शेवटपर्यंत साथ दिली. इतकं वय झालं तरी तिला कधी सलाईन नाही, इंजेक्शन नाही की कधी गोळ्या, औषधांचा कोर्स करावा लागला नाही.

*बाईला नीटनेटकं घर आवडायचं, दिवसभर 'होईल तशी' साफसफाई करीत राहायची.*

*खरंच, बाई आमच्या घराचं घरपण होती आणि दादा घराचं पांघरुण !*

*क्रमशः..*

               *श्री राजेंद्र गिते, बार्शी.*

       

       

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य