दादा..! भाग- १९

*दादा..!*

*भाग -१९*

   *आमच्या शेतात मोठी आमराई होती. सगळे तिला 'गित्याची आमराई' म्हणत.* उन्हाळा सुरु झाला की, आमचा दिवस अमराईतच जायचा. ठरावीक अंतरावर लावलेली सुंदर, डेरेदार आणि मोठी झाडं होती. त्यांची सावली दूरपर्यंत सलग पडायची. असं वाटायचं जणू ए सी लावलाय ! जेवणं करुन दुपारी झोपलेल्या माणसांना घरी जाताना हलवून उठवावं लागायचं.

  खोडं दिसायची पाच पण त्यात झाडं होती अकरा. आजोबांनी लावली की पणजोबांनी माहिती नाही, पण झाडं लावताना एका एका जागी तीन तीन वेगवेगळ्या आंब्याच्या कोया लावल्या. त्यामुळं कुठं दोन तर कुठं तीन झाडं जगली. त्यांची खोडं एकजीव होऊन वाढली, सख्ख्या भावासारखी ! त्यांच्या फांद्या एकमेकीत गुंतल्या.. माणसांच्या नात्यासारख्या !!*

  दादा, आबांना एक सावत्र भाऊ होते. त्यांना आम्ही भाऊ म्हणायचो. ते वेगळं राहात. शेतीच्या वाटण्या झाल्या होत्या, पण आंबे समाईकच होते. आमच्या म्हणजे दादा-आबाच्या शेतात दोन खोडं, त्यात पाच आंब्याची झाडं. भाऊंच्या वाटणीतल्या तीन खोडांत आंब्याची सहा झाडं होती. *झाडं वेगळी तसा त्यांच्या फळांचा आकार, वास आणि चव वेगळी होती. चवीनुसार त्यांना नावंही वेगवेगळी होती.*
*तीन तीन झाडं एकजीव होऊन वाढली, मोठी झाली. झाडांना जमलं पण माणसांना नाही !*

   आमच्या शेतातल्या पहिल्या खोडात साखऱ्या, खारक्या आणि गोटी ही तीन झाडं होती. साखऱ्या साखरेसारखा गोड. रसाला नंबर एक ! खारक्या खारकासारखा लागायचा. त्याचा रस कधी खायलाच मिळाला नाही. त्याला मोजकेच आंबे येत. जेवणं करताना सगळे आवर्जून त्याच्या कैऱ्या तोडून खात. तिसरी होती गोटी. तिला साखऱ्यातली गोटी म्हणायचे. ती जरा अशी-तशीच होती.

  दुसऱ्या खोडात दोन झाडं होती. गेळ्या आणि काळू. गेळ्याच्या रस एकदम मधासारखा घट्ट. गोडही तसाच. अकरा आंब्यात आवर्जून रस खावा असे जे तीन आंबे होते त्यात हा दुसरा. काळू आकाराने सगळ्या आंब्यात मोठा. रंगानेही जरासा काळाच, चवीलाही जेमतेमच.

भाऊंच्या शेतातील पहिल्या खोडात तीन झाडं होती. चपऱ्या, नांगऱ्या आणि गोटी. चपऱ्या जरा चपटा, म्हणून त्याचं नाव चपऱ्या ठेवलं असावं. रसासाठी चपऱ्या खास. नांगऱ्या मध्यम आकाराचा पण त्याचा खालचा भाग पोपटाच्या चोचीसारखा दिसे. त्याचे आंबे शक्यतो लोणचं घालायला वापरत. तिसरी गोटी, ही चपऱ्यातली गोटी. आकाराने जरा लहानच. चोखून खायला भारी वाटायची. *आंबे चोखून खाण्याची मजा काही औरच असते, आता ज्यांना आंबे चोखून खायला मिळतात ते भाग्यवानच !*

दुसऱ्या खोडात दोन झाडं. छोटा काळू अन लाल्या. काळूत काही विशेष नव्हतं पण लाल्या देखणा दिसे. वरील अर्धा भाग लालसर होता, देठापर्यंत. त्यामुळं बघताक्षणी नजरेत भरायचा. नुसताच दिसायला देखणा, चवीला मात्र जेमतेम. शेवटचं झाड एकटंच होतं, भाऊंसारखं ! झाड गोल, डेरेदार आणि देखणं होतं. खूप सुंदर दिसायचं. त्याला आंबेही खूप येत, पण आंबे आकारानं लहान आणि चवही आंबट. त्याचं नावही गोटीच.

*क्रमशः..*

               *श्री राजेंद्र गिते, बार्शी.*

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य