दादा..! भाग- २९
*दादा..!*
*भाग - २९*
*पावसाचा लहरीपणा आमच्या मराठवाड्याला नवा नाही !* शेतकरी उन्हातान्हाची पर्वा न करता शेत नांगरतो, मोगडा, पाळी करतो आणि आगुट मोहरण्याची वाट बघत बसतो. पण *पाऊस काही वेळेवर येत नाही, आलाच तर इतका की, एका रात्रीत सगळ्या नद्या, नाले एक करतो. म्हणजे 'असून अडचण.. नसून खोळंबाच की' !*
पाऊसकाळ चांगला झाला की, नाहोलीचा ओढा महाशिवरात्री पर्यंत वाहायचा, गुढीपाडव्यापर्यंत त्याच्या डोहात पाणी राहायचं. मी इकडून म्हशी घेऊन जायचो, फुलचंद तिकडून त्यांची गुरं घेऊन यायचा. फुलचंद म्हणजे भामाआत्याचा मुलगा. आत्याला दोन मुलं आणि दोन मुली. थोरली ताराआक्का, ती दादा, आबांची खूप लाडकी भाच्ची होती. चांगली मोठी होईपर्यंत ती आमच्याकडेच राहायची. ती आमच्या सगळ्यांपेक्षा बरीच मोठी होती. लहानपणी तिनं आम्हाला खूप सांभाळलं. तिच्या नंतरचा फुलचंद, त्याला आम्ही नाना म्हणायचो. नाना मोठा करामती होता, आणि आहे, लहान असताना त्याचा एक हात उसाच्या चरख्यात गेला...
त्याचं असं झालं, *त्यावेळी आमच्या भागांत साखर कारखाने खूप कमी होते. गावोगावी गुऱ्हाळं असत. देशमुखांच्या गुऱ्हाळावर चरख्यात ऊस घालाण्याचं काम नाना करी. पहाटेच्या सुमारास झोपेच्या तंद्रीत उसासोबत त्याचा डावा हात चरख्यात कधी अडकला, हे त्याचं त्यालाही कळलं नाही. मनगटापर्यंतच्या हाताची अक्षरशः सोतरी झाली. एक हात गेला, पण नानानं हार मानली नाही. तुटक्या मनगटाला त्यानं कायम रुमाल बांधलेला असतो. त्याची मदत घेवून, उजव्या हातानं तो शेतीची, गुराढोरांची सगळी कामं करतो, कुठलंही कारण न सांगता !*
गुरं नह्यारात दात घासत बसायची, आणि आम्ही खेळत ! अरुण, जगू, संजू हे जवळपासचे गुराखीही खेळायला येत. विटी दांडू हा आमच्या आवडीचा खेळ. कधी कधी आम्ही आट्यापाट्या आणि गोट्याही खेळायचो. आट्यापाट्याला आमच्याकडं 'लोंपाट' म्हणत. खेळून झालं की गुरं घेऊन आम्ही ओढ्याकडं निघत. ऊन उतरेपर्यंत ओढ्यात गुरंही पोहत आणि आम्हीही !
खरंच, *ओढा म्हणजे ओढ लावणारं सौंदर्य ! नाजूक वळणं घेत.. अल्लडपणे मंजुळ हासत.. खळखळून वाहणारं त्याचं निळंशार पाणी दोन्ही हात पसरुन खुणवायचं, तेव्हा त्यात मनसोक्त डुंबण्याचा मोह आम्हाला आवरता यायचा नाही. पाणी इतकं नितळ असायचं की त्यातले लहानमोठे, रंगीबेरंगी वाळूचे कण दुपारच्या उन्हात मोत्यासारखे चमकताना दिसत. त्याच्या नखरेल पाण्यात हातपाय पसरुन, डोळे मिटून उताणं पडून राहिलं की स्वर्गीय सुखाचा आनंद मिळे !*
*पोहून झालं की बायांनी धुणं धुण्यासाठी ठेवलेल्या दगडावर आम्ही पाण्यात पाय सोडून बसायचो. छोट्या छोट्या चिंगळ्या पायाजवळ गर्दी करायच्या, पण हातानं पकडायला गेलं की निसटून जायच्या. कधी कधी कडेला, मोठ्या दगडाच्या आड दडून बसलेला एखादा खेकडा दिसला की मात्र काळजात धस्स व्हायचं !*
*क्रमशः..*
*श्री राजेंद्र गिते, बार्शी.*