दादा..! भाग- ३२

*दादा..!*

*भाग - ३२*

सोलापूर, बार्शीकडून - बीड, औरंगाबादकडे जाणाऱ्या सगळ्या बसगाड्या सरमकुंडी फाट्यावर थांबतात. तिथं मिळणारे कुंथलगिरीचे पेढे सुप्रसिद्ध आहेत. *जे हॉटेल मालक ड्रायव्हर, कंडक्टरच्या चहापाण्याची, नाश्त्याची 'सोय' करतात, तिथंच बस थांबते.* प्रवासी उतरतात, नाष्टा, चहापाणी करतात, खवा, पेढे खातात आणि पार्सलही घेतात. *कुंथलगिरीचे पेढे खाल्ले नाहीत, अशी माणसं शोधणं म्हणजे 'तळं राखलं पण पाणी चाखलं नाही' अशी माणसं मोजण्यासारखं आहे !* वाशी, कुंथलगिरी, सरमकुंडी परिसरातील लोकांना या उद्योगानं बरकत दिली आणि मोठी प्रसिद्धीही दिली.

   १९८५ च्या सुमारास पुण्याच्या सुरेश सेठ या व्यापाऱ्यानं आमच्या गावात जागा घेऊन खव्याचं केंद्र उभा केलं. उत्तर प्रदेशातल्या श्रीराम यादव या विश्वासू माणसावर तिथंली सगळी जबाबदारी सोपवली, त्यामुळे खवा उद्योगात स्पर्धा वाढली, त्या स्पर्धेत आमची भट्टी टिकली नाही. *दुष्काळ किंवा नैसर्गिक आपत्तीच्या काळात ज्या भट्टीनं आमच्या घराचा डोलारा सांभाळला ती खव्याची भट्टी दादाला बंद करावी लागली.* 

  भट्टी बंद झाली, पण म्हशी कायम होत्या. दादा-आबांनी कितीतरी म्हशी घेतल्या, मायेनं सांभाळल्या, पिळल्या आणि विकल्याही. पण *आमच्या कायम लक्षात राहिल्या त्या मंगळी आणि लाडकी.* मंगळी भली मोठी होती. तिची शिंगं लांब आणि पीळदार होती पण ती खाली जमिनीकडं वळलेली होती. त्यामुळं मंगळी भुंडी दिसायची. मुलांना किंवा दुसऱ्या म्हशींनाही तिनं कधी मारलं नाही. तिच्या लांबरुंद पाठीवर लहान मुलंही बिनधास्त बसत. एखादेवेळी मंगळी चिडली तर फक्त डोक्यानं हलक्या ढुसण्या दयायची. चरताना किंवा खुराक खाताना तिची शिंगं जमिनीला खरडत. खरं तर, तिच्या शिंगांचा तिला त्रास व्हायचा, पण इलाज नव्हता. *मंगळीला खायला पण खूप लागायचं. कितीही खाल्लं तरी तिचं पोट भरत नव्हतं, पोट भरलं तरी मन कधीच भरत नव्हतं.. हावरट माणसासारखं !* दिवसभर चरुन आली तरी गोठ्यात दावणीला बांधल्यावरही खात राहायची.
*गोठ्याच्या बाजूलाच एक लहान खोली होती. तिला दरवाजा नव्हता. त्या खोलीत आम्ही भट्टीतून निघालेलं कोळसं ठेवलं होतं. अधूनमधून दावं तोडून मंगळी कोळसं खायची, खापरं दिसली तरी खायची. कधी कधी चामड्याच्या वहाणाही चघळायची...*

  लाडकी दिसायला देखणी होती. हाडापेरानं भरलेली आणि मजबूत बांध्याची. तिची शिंगंही डौलदार होती.. खिल्लाऱ्या खोंडासारखी ! बघाताक्षणी मनात भरावी इतकी सुंदर ! लाडाची होती, म्हणूनच तिचं नाव लाडकी ठेवलं असेल?

  *मंगळी आणि लाडकी वेगवेगळ्या घरी जन्मल्या, आमच्या घरात एकत्र आल्या, पण सख्ख्या बहिणींसारख्या राहात होत्या. एक डबा दोन मैत्रिणींनी खावा, तसं एका टोपलीतली पेंड दोघी आनंदानं खायच्या. त्यांचा एकमेकींवार जीव होता. टोपली टोपली खुराक खायच्या आणि बादली बादली दूध द्यायचा.*

  आबा म्हशींना खूप जपत, जीव लावत. त्यांचं बोलणं म्हशींना समजत असावं. त्यांनी बोलावलं की त्या येत, 'बस' म्हंटलं की बसत, 'ऊठ' म्हंटलं की उठत. आबा त्यांच्या मानेला, दोन्ही शिंगांच्या मध्ये खाजवत, तेव्हा त्या तोंडाला फेस येईपर्यंत त्यांना चाटत. 

*मुक्या प्राण्यांना जीव लावला तर ते व्याजासह परतफेड करतात !*

पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं...

*क्रमशः..*

               *श्री राजेंद्र गिते, बार्शी.*


   

      

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य