दादा..! भाग- ३१

*दादा..!*

*भाग - ३१*

  *'रानचा वारा अन घरचा भारा' अशी एक म्हण आहे. याचा साधा, सोपा अर्थ असा की, घरातल्या बंदिस्त वातावरणात भाराभर खाल्लेलं आणि रानातल्या मोकळ्या हवेत चार घास खाल्लेले सारखेच ! उलट रानात हिंडून, फिरुन खाल्लं तर जास्त 'अंगी' लागतं, असं मला वाटतं. मग ती माणसं असोत की जनावरं !*

  गुराख्याच्या सोबत धोतराचा किंवा लुगड्याचा 'तडूप' असायचा, त्याला दोन बाजुंनी धरुन आम्ही ओढ्यातल्या पाण्यात मासे धरायचो. तीन दगडांची चूल केली जायची. *'असेल ते' तिखट, मीठ घालून भाजी करायचो. त्याला ना 'वाटण' असायचं, ना कुठला मसाला ! तरीही भाजी चवदार व्हायची. एकमेकांच्या खोड्या काढत, चिडवत, झाडाच्या सावलीत आणि मित्रांच्या संगतीत जेवण्यात वेगळाच आनंद मिळायचा.*

  *थोडीशी वाळू उकरून 'हिरा' केला जायचा. सुरुवातीचं गढूळ पाणी दोन, तीन वेळा हातानं बाहेर काढून टाकलं की मग वाळूतून फिल्टर होऊनच पाणी बाहेर यायचं. त्यात ना कुठले जंतू असायचे ना केरकचरा ! पण पाणी प्यायला काहीच नसायचं. मग आम्ही हिऱ्याच्या बाजूला हात टेकवून, वाळूवर पालथं झोपत, पाण्यात तोंड बुडवून, शांतपणे डोळे मिटून ते अमृताचे घोट घ्यायचो.*

  पाडव्यानंतर उन्हाळा अधिक तीव्र होत जायचा. ओढ्याला डोह पडायचे. तासंतास म्हशी डोहात डुंबत राहायच्या. दुपारनंतर अचानक ढग जमत, सोसाट्याचा वारा सुटे आणि बघता बघता जोराचा पाऊस सुरु होई. अशा अवकाळी पावसानं आम्हाला अनेकदा झोडपलं होतं.

   १९८४ साल असेल, एके दिवशी आम्ही नह्यारात 'कोप' करायचं ठरवलं. जवळच नानाचा ऊस होता. त्याला निर्गुडीच्या झाडाचं कुंपण होतं. निर्गुडीच्या फोकाची कोप करायची आणि ती उसाच्या पाचटानं शाकारायची, असं नियोजन होतं.

   नाना आवसुती होता, काम करताना नेहमी घिसाडघाई करायचा. त्यानं कुऱ्हाड आणली, आणि एका हातानंच निर्गुडीच्या फांद्या तोडू लागला. त्यानं तोडलेले फांद्या मी ओढून बाजूला घेत होतो. एका फांदीवरुन कुऱ्हाड सटकली ती थेट माझ्या उजव्या पायाच्या नडगीवर ! कुऱ्हाडीच्या घावानं नडगी चांगलीच तुटली. पाय रक्तबंबाळ झाला. काही कळायच्या आत.. "तुंड्या, तुझ्या तर..." अशा माझ्या तोंडून एकदम शिव्या बाहेर पडल्या.

  नाना काहीच बोलला नाही. त्यानं जखमेवर कुऱ्हाडीच्या पाल्याचा रस पिळला, गमजानं पाय गच्च बांधला आणि गुरं घेऊन निघून गेला. मीही तिथून पुढं नानाची संगत कमी करायचं ठरवलं, घरीही सगळं खरं खरं सांगितलं. 'अधिक उद्योग' केल्याबद्दल चांगलीच बोलणी खावी लागली. *नानाला शिव्या दिल्याचं सांगितल्यावर दादा म्हणाले, "घटना घडून गेल्यावर वाईट बोलून काय उपयोग? धारदार वस्तू वापरताना आपण जशी काळजी घेतो, तशीच वाईट बोलतानाही घेतली पाहिजे !"*

खरंय दादा, *शब्द सुद्धा शस्त्रच आहेत की !*

*कुऱ्हाडीच्या घावानं नडगी तुटल्याची 'मोठी खूण' माझ्या पायावर अजून आहे, माझ्या अपशब्दांची खूण नानाच्या मनावर असेल का?*

*क्रमशः..*

               *श्री राजेंद्र गिते, बार्शी.*

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य