दादा..! भाग- २६

*दादा..!*

*भाग -२६*

कवयित्री इंदिरा संत एका कवितेत लिहितात...

अस्सल लाकूड, भक्कम गाठ,
*ताठर कणा, टणक पाठ !*
वारा खात, गारा खात,
*बाभूळ झाड उभेच आहे !!*
*बाभूळ झाड उभेच आहे !!*

  विहीर खडकापर्यंत गेली, पाणी लागलं की ती बांधणं गरजेचं होतं. बांधली नाही तर काळी माती ढासळून विहीर गाळानं बुजण्याची भीती होती. *त्यावेळी दगडी चिऱ्यांनी किंवा सिमेंट काँक्रीटनं विहीर बांधण्याची आमची ऐपत नव्हती.*

दादा, आबांना एक कल्पना सुचली...

मोरवंडीच्या बाजूला आमची थोडी शेती होती. त्याला आम्ही 'खालचा उरा' म्हणत असू. त्या उऱ्यातलं बराचसं शेत जनावरांना चरण्यासाठी नह्यार (कुरण) म्हणून राखून ठेवलं होतं. *त्या नह्यारात हरळी आणि 'मारवेल' गवत अधिक उगवायचं. ते दुभत्या जनावरांसाठी पोषक मानलं जायचं. तिथं बाभळीची मोठी मोठी खूप झाडं होती. 'बाभळीचं बन'च होतं म्हणा की !*

  बाभळीचं लाकूड कठीण असतं. दादा, आबांच्या डोक्यात विचार आला. बाभळी तोडून लाकडाच्या ओंडक्यांनी विहीर बांधली तर.. विहीरही बांधून होईल आणि उरलेल्या लाकडाचं भट्टीला सरपण होईल. ठरलं ! *एकदा दादा, आबाचं ठरलं की पुन्हा कुणाचं काही चालत नसायचं !*

  बाभळी तोडण्याचं, चांगल्या सरळ लाकडाचे ओंडके तयार करण्याचं आणि उरलेल्या सरपणाचे 'फास' रचण्याचं काम दादांनी काही गड्यांवर सोपवलं.

मग काय !
वाळसऱ्याला विहीर खोदण्याचं अन खालच्या उऱ्यात बाभळी तोडण्याचं काम एकाच वेळी सुरु झालं...

  त्यावेळी दत्तूबप्पा आठवीला, कृष्णा पाचवीला आणि मी सहावीला होतो. बालू, आशा आणि पिनू चौथीच्या खालीच होते. आमची शाळा, खव्याची भट्टी, विहीरीचं काम आणि बाभळीची तोड.. सगळीकडं कामाची घाई चालू होती ! *आई, काकुला स्वयंपाक, पाणी आणि घरातलं सगळं आवरुन विहिरीवर सगळ्यांसोबत झुंजावे लागत असे. आबाला जनावरांच्या चारा, पाण्याची व्यवस्था बघून विहिरीतल्या मातीशी दोन हात करावे लागत. भट्टीची आग आणि धुरासोबतचा सामना संपल्यावर, जिथं गरज असेल तिथं लढायला दादा तयार असत.* म्हाताऱ्या बाईचे गुडघे दुखत, म्हणून ती शेतात जात नव्हती, पण घराच्या राखणीला ती खंबीर होती.

*या हव्याहव्याशा हातघाईचीच्या लढाईत आम्हीही मागं नव्हतो...*

*क्रमशः..*

               *श्री राजेंद्र गिते, बार्शी.*

 

  

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य