दादा..! भाग- ३८

*दादा..!*

*भाग -३८*

  *लई भारी नसलं तरी त्यावेळच्या मानानं आमचं घर 'भारी' झालं होतं. सगळीकडं जागाच जागा होती. कुठंही हातपाय पसरुन बसता यायचं, लोळता यायचं आणि मनमोकळं खेळता यायचं.* बाहेरची चार माणसं आली किंवा पाहुणे, रावळे मुक्कामाला राहिले तरी काळजी नसायची. पाहुण्यांनी आपल्याकडं यावं, दोन-चार दिवस राहावं असं दादा, आबांना वाटायचं. *माणसाचं मन मोठं असलं की लोकं जवळ येतात आणि घर मोठं असलं की ती निःसंकोचपणे राहतात !*

दहा खणाच्या माळवदाला आम्ही मोठं घर म्हणायचो. मोठ्या घरात मध्यभागी दोन मोठ्या कणगी होत्या. त्या कणगी घरातच विणून घेतल्या होत्या. त्या कणगीमुळं मोठ्या घराचे दोन भाग झाले होते. *एका एका कणगीत वीस वीस पोती धान्य बसायचं. माल टाकताना आणि काढताना आम्ही कणगीत उतरायचो. लपाछपी खेळताना कधी कधी त्यांच्यात लपूनही बसायचो. खूप मज्जा यायची.*

  घरातलं सगळं सामानसुमान मागच्या पाच खणात बसायचं. *मागच्या भिंतीला बाईनं गाडग्यांच्या उतरंडी लावल्या होत्या. एका उतरंडीत सहा सात गाडगी असत. बाई मोठ्या कलेनं उतरंडी रचायची. खाली मोठं गाडगं.. त्यावर थोडं लहान.. लहान.. अशा पाच उतरंडी होत्या.* ज्वारी आणि गव्हाच्या पीठाचे दोन डबे वगळता सगळ्या प्रकारच्या डाळी, सांडगे, शेवया असा सगळा संसार त्या गाडग्यातच असायचा. कोणत्या गाडग्यात काय ठेवलंय, ते बाईच्या पक्कं लक्षात असायचं.
 
पुढच्या पाच खणात फक्त पाण्याचा एक रांजण आणि भिंतीला लाकडी फळ्याचं एक फडताळ होतं, त्यात सगळी भांडी बसायची. बाकीचा भाग मोकळाच होता.

  बाहेरून आलेल्या माणसांचं चहापाणी, उठबस, बैठकीच्या पाच खणात व्हायची. म्हातारी बाई आणि आम्ही मुलं रात्री तिथंच झोपेत.

स्वयंपाकाच्या दोन खणातून बैठकीत, चौकात आणि मोठ्या घरात सगळीकडं चहापाणी देता यायचं, जेवणं वाढता यायची.

  *खरी मजा होती माडीवर ! तिथं सगळीकडून भरपूर उजेड आणि स्वच्छ हवा यायची. माडीला समोर गॅलरी होती. तिथं उभं राहिलं की अर्धे गाव दिसायचं. गॅलरीत उभं राहूनच आम्ही पावसाचा आनंद घ्यायचो, थोडे हात बाहेर काढून थेट पावसाचं पाणी ओंजळीत घेऊन प्यायचो.*

   सकाळचा चहा किंवा रात्रीची जेवणं झाली की दादा, आबा बाहेर फरशीवर निवांत पान, तंबाखू खात बसत. सकाळ, संध्याकाळ सगळेच चहा पीत, पण त्यांना दोन दोन कप लागे. कप म्हणजे फक्त कप नाही. कप भरून, बशी भरली की एक कप व्हायचा. असे दोन कप ! बाईकडून माप चुकायचं, म्हणून आबा चहा टाकत. निरसं दूध आणि पाणी कपानं मोजून टाकत. तितक्याच चिमटी साखर घालत, चिमूट पाच बोटांची असे. विक्रमची कडक चहा पावडर घालून, चुलीवर चांगला उकळलेला चहा पिताना ब्रम्हानंदी टाळी लागे. *आमच्या घरच्या चहाचं कौतुक सगळेच करत. एकदा रत्नापुरचं चिंतामण मामा गमतीनं म्हणाला होते, "तुमचा चहा पिऊन झोपलेल्या माणसानं सकाळी उठल्यावर ओठांवरून जीभ फिरवली तरी गोड लागेल !"*

*क्रमशः..*

               *श्री राजेंद्र गिते, बार्शी.*

 




Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य