दादा..! भाग- ३७
*दादा..!*
*भाग -३७*
त्या काळात खेड्यापाड्यात जे सी बी मशीन्स नव्हत्या, सगळी कामं मजुरांकडून करून घ्यावी लागत. गावात पांढरी माती (शाडू) खूप, त्यामुळं घरासाठी पाया खोदणं मोठं कष्टाचं काम होत. पाया खोदून निघालेल्या मातीच्याच विटा पाडून भिंती बांधल्या जात.
*१७ खणाचं माळवदाचं घर बांधण्याचा प्लॅन ठरला. प्लॅन म्हणजे 'दादा,आबांचं ठरलं' !* समोर पाच खणाची बैठक, त्यामागं दोन खण स्वयंपाकासाठी त्याच्या बाजूला जेवणासाठी खुला चौक आणि सगळयात मागं दहा खणाचं घर. *बैठक आणि स्वयंपाकासाठी असलेल्या सात खणांच्या वर माडी बांधायचंही त्यांनी ठरवलं. माडी हे श्रीमंतीचं लक्षण समजलं जाई. त्यावेळी गावात फक्त चार जणांकडं माड्या होत्या.* सात खणाचं, माडीचं बांधकाम पक्क्या विटांत आणि दहा खण मातीच्या विटांत बांधण्याचं काम विलास कोळ्याला दिलं..
'दोन फूट रुंद आणि सहा फूट खोल' असं पाया खोदण्याचं काम सुरू झालं, पण सगळ्यात जिकिरीचं काम होतं पायाभरणी.
माळावरच्या शेतात छोटे छोटे खूप दगड, गोटे होते. ते वेचून ढीग घालण्यासाठी रोजंदारीवर बायका लावल्या. त्यांच्यासोबत आई, काकूही असत. शाळेला सुट्टी असली की नाइलाजानं आम्हालाही जावं लागे. आम्हाला लाज वाटायची. ही बायकांची कामं आहेत, असा आमचा समज होता. दादांनी एकदा चांगलंच खडसावलं. *ते म्हणाले, "काम हे काम असतं, ते हलकं, भारी, गड्याचं, बायकांचं असं काही नसतं. त्यामुळं कोणतंही काम करताना लाजायचं नाही."*
घरचं सगळं उरकून माळाकडं निघायला बायकांना उशीर व्हायचा. दिवस चांगलाच वर यायचा. दिवस जसजसा वर यायचा, तसतशी दगडं तापायची. हात लावला की पोळायची. बोटांना फोड येत, ते फोड टर्रर्र फुगत आणि फुटत. सगळ्या बायकांनी हाताच्या बोटांना चिंध्या बांधल्या होत्या. वरून सूर्य नारायण आग ओकायचा, लांबून लांबून आलेल्या उष्ण हवेच्या झळा हातातोंडावर वार करायच्या. *सतत दोन महिने, रणरणत्या उन्हात आई, काकूनं दगडगोटे वेचले. ऊन, वारा झेलला, गरम वाऱ्याच्या माऱ्यानं त्यांची तोंडं खापरासारखी झाली, पण त्याची कुणालाही पर्वा नव्हती.*
आबानं अन मोहनमामानं बैलगाडीनं माळवरची दगडं वाहून आणली, पाया भरला. खरं तर, *मोहनमामा आमच्या घरचे जावई होते, पण त्यांनी कधीही 'जावयाचा रुबाब' केला नाही. गरजेच्या वेळी एकमेकांच्या घरी जाऊन, राहून कामं केली जात.*
जोतं बांधण्यासाठी नांदूर फाट्याच्या पलीकडे सानपवाडीच्या डोंगरातून चिऱ्याचे दगड आणावे लागले. पहाटे तीनच्या सुमारास गाड्या निघत. सकाळी न्याहरीच्या वेळी तिथं पोहोचत. चिरे घेऊन परत यायला दिवस मावळून जाई. तेव्हाही मामांची गाडी होतीच.
माळवदाचं काम पिंपरीच्या राम सुताराला दिलं होतं. त्यांना लाकडावरची कलाकुसर चांगली यायची. सर आणि खांब रंध्याने घासून त्यांनी मऊ केले होते. त्यावर सुंदर सुंदर नक्षी काढली होती. सराच्या पुढच्या तोंडाला केलेलं कोरीव काम लक्ष वेधून घ्यायचं. माडीही आकर्षक बनवली होती. *राम सुतार सावकाश पण चांगलं काम करायचे.*
*ते कट्टर शिवभक्त होते. 'शिवबाबा की याद आ गयी..' असं म्हणत चालू काम सोडून ते उठत. मांडी घालून, डोळे मिटत. ध्यान लावून शिवबाबाची याद करत जे बसत ते मनाला वाटेपर्यंत !*
*क्रमशः..*
*श्री राजेंद्र गिते, बार्शी.*