दादा..! भाग-२५

*दादा..!*

*भाग - २५*

   रात्रीची जेवणं झाली होती. दादा, आबा ओट्यावर पान खात बसले होते. पानासोबत गप्पाही चालू होत्या. *'पान खाणं' हे आमच्या घरात कुणी, कधी व्यसन मानलं नाही. ती एक परंपराच झाली होती. दादा, आबा दिवसातून अनेकदा पान खात. आल्यागेलेल्यांचं स्वागतही चहा, पानानंच केलं जाई. एवढंच काय, आमरस, पुरणपोळी असं काही गोडधोड खाल्लेलं असलं की आबा बायांनाही पानं लावून देत.*
फार पूर्वीपासून दर मंगळवारी नांदूरला आठवडी बाजार भरतो. दादा बाजारातून आठवडाभर पुरतील इतकी पानं, सुपाऱ्या, कात, चुना आणत. पानं स्वच्छ पुसून, ओल्या फडक्यात गुंडाळून पानपुड्यात ठेवत. लागतील तशी वरचेवर काढून घेत.
त्यावेळी बहुधा चुन्याच्या डब्या मिळत नसाव्यात. दादा बाजारातून सुट्टा चुना आणत. तो चुना ठेवायला एक गाडगं होतं. त्याला 'चुन्याचं गाडगं' म्हणत. चुना फडक्यात घट्ट बांधून त्या गाडग्यात ठेवत. त्यात अर्ध्यापर्यंत पाणी भरत. मग अनेक दिवस चुना लोण्यासारखा मऊ राहात असे.

दादा, आबा तंबाखू खात. बाजारातून गावरान तंबाखूची जुडी आणत. वाळलेली तंबाखूची पानं एकमेकांना घट्ट चिकटलेली असत. आबा ती पानं अलगद काढत, अडकित्यानं बारीक कातरुन बांधून ठेवत. *मंगळवारी आणलेली पानं, चुना आणि तंबाखूची बुधवारी अशी नीट 'व्यवस्था' लावली की त्यांचीही आठवडाभर चांगली व्यवस्था होत असे. ते म्हणत, "एकदा नीट काम केलं की त्याचा पुन्हा पुन्हा घोर करावा लागत नाही !"*
मटणाचा बेत असला की आम्हालाही पान खायला मिळायचं. *दादा, आबांची 'पाळून पान खाण्याची परंपरा' मीही पुढं चालू ठेवली आहे.*

माझ्या हातात पुस्तक होतं, पण माझे कान दादा, आबांच्या बोलण्याकडं होते...
दादा म्हणाले, "नामदेव, सहा महिन्यात 'आगुट' मोहरल, त्याच्या आधी विहीर लाकडानं बांधून व्हायला पाहिजे."

"काय बोलता, दादा ! वीस हाताचा घेर धरलाय, पाच 'परुस' काळीच हटायची नाही, कशी होईल सहा महिन्यात बांधून?" आबा.

"मी गावात चक्कर मारून येतो, उद्यापासून कामाला माणसं वाढवू." बोलत बोलत दादा उठले.

"मी म्हणीत व्हतो, दिवाळीच्या पाडव्याला टिकाव टाकू. तुमच्या दमा दमात दोन आठवडं वाया गेलं का नाही?" आबा.

दादा काहीच बोलले नाहीत, तडक गावात गेले. *आबा तापलेले असले की दादा शांतच राहत !*

*रोजंदारीवर अंगमेहनतीची कामं करणारे मजूर दादांचा शब्द खाली पडू देत नसत. दादा कधी काम सांगतात? याची अनेकजण वाटच पाहात असत.*

दुसऱ्या दिवसापासून विहिरीच्या खोदकामाला चांगला वेग आला...

*क्रमशः..*

               *श्री राजेंद्र गिते, बार्शी.*


 
 



Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य