दादा..! भाग- ३०

*दादा..!*

*भाग - ३०*

  *नाना चांगला माणूस आहे, पण लहानपणी त्यानं मला दोनदा 'तारे' दाखवले.. तेही भरदुपारी !*

  मला चांगलं आठवतंय, त्या दिवशी रविवार होता. ऊन मी म्हणीत होतं. नह्यारात जनावरांना खायला काही उरलं नव्हतं, तरीही ती काडी काडी शोधीत होती. मी, जगू आणि महादू एका खुरट्या झुडपाजवळ अंग चोरून बसलो होतो. रेडिओवर 'आपली आवड' चालू होती...

*"ये.. चला, इटी दांडू खेळू",* पाठीमागून नानानं आवाज दिला.

हो, नाही करता करता खेळायचं ठरलं. गडी वाटून घेतले. माझ्या बाजूनं जगू होता, नानाकडून महादू.

जगू म्हणाला, *"करा 'उन्हाळी-पावसाळी'."*

नानानं एक दगडाचा छपरा शोधला, त्याच्यावर एका बाजूनं थुकला आणि अंगठ्यानं वर उडवला. मी पावसाळी मागितली, पण नेमकी उन्हाळी पडली. *गल आधीच केलेली होती. जगू आणि मी तयारीत उभा राहिलो. महादूनं विटी कोलली, जगूनं वरच्यावर झेलली. महादू आउट झाला...*

  *नाना खेळायला आला. त्यानं आमच्या डोक्यावरुन विटी कोलली. आम्ही उडी मारुन पकडायचा प्रयत्न केला, पण हाताला आली नाही. त्यानं गलीवर आडवा ठेवलेला दांडूही मला नेम धरुन मारता आला नाही. नानानं दांडू घेतला. हवेतल्या हवेत दोनदा विटी उडवली, आणि फिरुन जोराचा फटका मारला...*
*मी त्याच्या मागं उभा होतो, पण त्यानं मला बघितलं नव्हतं. विटी हुकली आणि दांडूचा जोरदार फटका माझ्या उजव्या भुवईवर बसला. अर्धी भुवई तुटली.. रक्ताची धार लागली.. मी हातानं दाबून धरलं.. पण रक्त थांबता थांबेना.*

नाना म्हणाला, *"तरी बरं, दांडू भुवईवर लागला.. थोडा खाली लागला असता तर डोळा गेला असता !"* 
तो कितीतरी वेळ जखमेवर फुंकर मारीत होता, मग त्यानं काळी माती आणली, हातावर चोळून बारीक केली आणि बोटानं जखमेवर बसवली. गमजानं डोळा आणि डोकं बांधलं, ठणका थोडा कमी झाला.
आता माझ्यापुढं प्रश्न होता, घरी काय सांगायचं? दादा, आबा काय करतील? *जखम झाकता येत नव्हती, खरं सांगण्याची भीती वाटत होती आणि आबा तर पुढंच दिसत होतं !*

संध्याकाळी कुणी विचारण्याच्या आधीच मी सांगून टाकलं.. *लाडकी धानाला पडली होती, तिची वळती करण्यासाठी पळत गेलो, पाय घसरला आणि नेमकं दगडावर पडलो.*

*खोटं पचलं होतं...*

  *त्या जखमेची माझ्या उजव्या भुवईवर अजूनही छोटीशी खूण आहे. जेव्हा जेव्हा मला 'ती' खूण दिसते, तेव्हा तेव्हा मला 'ते' खोटं बोललेलं आठवतं. "तुम्ही जगाला कितीही खोटं बोलू शकता, पण तुमचं मन तुम्हाला सतत खऱ्याची आठवण करुन देतं असतं !*

*क्रमशः..*

               *श्री राजेंद्र गिते, बार्शी.*

  

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य